प्रमोद झिंजाडे – विधवा प्रथा निर्मूलनाचे प्रवर्तक (Pramod Zinjade – Modern day social reformer)

0
379

प्रमोद झिंजाडे ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती. ते परिवर्तनवादी आहेत. त्यांनी समाजातील अनिष्टतेवर दंड उगारला आणि न्याय्य गोष्टी घडवून आणल्या. त्यांच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या संकल्पनेने विधवा महिलांना आनंदी जीवनासाठी आशेचा किरण दाखवला आहे…

विधवा प्रथा निर्मूलन मोहिमेला महाराष्ट्रात चालना देणारे प्रमोद झिंजाडे हे करमाळ्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना सामाजिक क्षेत्रातील लोक आदराने ‘बाबा’ या नावाने संबोधतात. त्यांनी ‘महात्मा फुले समाज सेवा मंडळ’ या नावाने एनजीओ 1982 साली स्थापन केली. तिच्या माध्यमातून प्रमोद यांनी अनेकविध काम केले आहे. अन्याय, अत्याचार रोखला आहे आणि न्याय प्रस्थापित केला आहे. प्रमोद यांचे शिक्षण अगदी वेगळ्या विषयात चित्रकलेत झाले आहे. त्यांचे शिक्षण त्यांचे गाव पोथरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांमध्ये झाले. त्यांचे अकरावीनंतरचे शिक्षण ‘प्रगत कला महाविद्यालया’त (अहमदनगर) झाले. तेथे त्यांनी दोन वर्षांची ड्रॉर्इंग आर्टची पदविका संपादन केली. त्यांनी कलाशिक्षक म्हणून काही काळ नोकरीही केली.

झिंजाडे यांच्या कामाची सुरुवातच रूढी-परंपरांना विरोध अशा स्वरूपात झाली. त्यावेळी गावात पोतराजांची संख्या जास्त होती. त्यांच्यामध्ये शाळेत जाण्याचे वय असलेली लहान मुलेही बरीच होती. परंतु मुलेही पोतराजांच्या कडक लक्ष्मीच्या कर्मकांडात अडकलेली होती. ती गोष्ट प्रमोद यांना सहन झाली नाही. त्यांनी गावातील पोतराज कुटुंबांचे प्रबोधन करून, त्यांना समजावून सांगितले व त्या मुलांचे केस कापण्यास लावले. पुढे जाऊन, त्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पालकांना प्रवृत्त केले.

शेजारच्या मांगी गावातून येणाऱ्या तळ्यातून त्यांच्या गावाला उजवा आणि डावा या दोन कॅनॉलद्वारे शेतीसाठी पाणी दिले जाते. त्यांतील एका पॅनेलवर झिंजाडे यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 14 नंबर चारीचे काम करण्यासाठी पाठपुरावा केला. तेथील शेतकऱ्यांसह शासन दरबारी अर्ज दिले. त्यांच्या प्रयत्नांनी ढेकळेवाडी या भागाला पाणी मिळाले. दोनशे एकर शेतजमिनीला त्या तळ्याच्या पाण्याचा लाभ मिळू लागला. त्यामुळे प्रमोद यांच्या कामाची ओळख गावातील लोकांमध्ये निर्माण झाली.तसेच, त्यांच्या संस्थेशीही लोक जोडले जाऊ लागले. गावातील महत्त्वाचे प्रश्न पुढाऱ्यांशिवाय मार्गी लागू लागले. प्रमोद धानोरा (जिल्हा नगर) या गावी एके दिवशी गेले होते. तेव्हा तेथे रोजगार हमी योजनेचे दुष्काळी परिस्थितीमध्ये काम सुरू होते. त्याकामावरलोकांना कष्ट खूप पडत, पण त्या मानाने त्यांना मेहनताना मिळत नव्हता.त्यामुळेअधिकारी व मजूर यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू होती. प्रमोद हे तेथून जातअसताना, त्यांनी तो प्रसंग पाहिला व ते तेथे थांबले. त्या खोदकामात अतिशय कठीणखडक निघालेले होते. ती खडकाळ जमीन फोडण्यासाठी मजुरांना खूप मेहनत घ्यावी लागली होती ही गोष्ट प्रमोद झिंजाडे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्या खडकांचे तुकडे सोबतघेऊन, तशा कामाचे दर पत्रकामध्ये किंवा मजुरी वाढीसाठी तेथील मजुरांच्या सहकार्याने निवेदन तयार केले आणि ते निवेदन जिल्हाधिकारी यांची कचेरी व इतर काही ठिकाणी पाठवून दिले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे, तत्कालीन नेते विधान परिषदेचे अध्यक्ष सदानंद वर्दे; तसेच, मंत्री रोहिदास पाटील यांच्यापर्यंत तो विषय गेला. शासनाने ते निवेदन विचारात घेऊन त्यासाठी एक सदस्य कमिटी निर्माण केली. ती एक सदस्य कमिटी कामाची पाहणी करण्यासाठीकलेक्टर यांच्यासोबत कामावर आली. त्यावेळी अर्जदार प्रमोद झिंजाडे यांनाही बोलावण्यात आले होते. त्यांच्या त्या मागणीची योग्य ती दखल घेतली गेली आणि शासनाने मजुरांच्या पगाराच्या दरपत्रकात वाढ करण्याचे ठरवले. अशा प्रकारे प्रमोद झिंजाडे यांचे तळागाळातील कष्टकरी लोकांसाठी काम सुरूच होते.

ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून विविध संस्था व कार्यकर्त्यांच्या संपर्कात येऊ लागले. असेच एक पुण्याचे मधुसूदन साठे यांची ‘डेव्हलपमेंट ग्रूप’ म्हणून एक एनजीओ होती. त्या एनजीओचे काम मोठे होते. त्या संस्थेच्या संपर्कात झिंजाडे आले. साठे यांनी प्रमोद यांच्या अंगी असलेले कार्यकर्त्याचे गुण- चिकाटी, संघटन कौशल्य आणि हजरजबाबीपणा पाहून त्यांच्या ‘डेव्हलपमेंट ग्रूप’ एनजीओसोबत प्रमोद यांना जोडून घेतले. त्यासाठी त्यांनी झिंजाडे यांना दीडशे रुपये मासिक मानधनावर नोकरीवर घेतले. त्या मानधनावर झिंजाडे रोजगार हमी योजनेबाबतच्या कार्यशाळा महाराष्ट्रभर घेत असत. पुढे, मानधन सातशे रुपयांपर्यंत वाढत गेले. ‘डेव्हलपमेंट ग्रूप’ संस्थेचे काम वाढले. प्रमोद यांना इंग्लंडमधील ‘ऑक्सफॅम’ या संस्थेने 1986-87 साली कामासाठी सोबत घेतले. प्रमोद यांचे काम महाराष्ट्रभर वाढू लागले. विशेषतः त्यावेळी विदर्भात खूप लोकांच्या हातांना काम मिळाले. दुष्काळातही लोकांना रोजगार मिळाला. अन्नधान्य मिळाले. प्रमोद जर्मनी, अमेरिका येथील एनजीओंच्याही संपर्कात आले व त्यांच्या कामाचा व्याप वाढत गेला. अनेक ठिकाणचे कार्यकर्ते जोडले गेले.

महात्मा फुले समाज सेवा मंडळ’ हे त्यांनी लावलेले छोटेसे रोपटे वाढू लागले. त्या रोपट्याने अनेकांना सावली दिली. त्यामध्ये भटक्या, विमुक्त अशा अनेक कुटुंबांचा समावेश आहे. त्यांच्यामुळे उघड्यावर राहणाऱ्या, पालात राहणाऱ्या अनेक लोकांना घरे मिळाली. ‘राजीव गांधी फाउंडेशन’ या दिल्ली येथील संस्थेच्या माध्यमातून शंभर वाचनालये सुरू करण्यात आली. त्यांतील ऐंशी वाचनालये सुरू आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यांत ‘वाचन चळवळ’ वाढू लागली. दुष्काळात खेड्यापाड्यांतील लोकांना अन्नधान्य मिळू लागले. विविध योजनांचा लाभ मिळू लागला. करमाळा तालुक्यातील अनेक छोट्यामोठ्या गावांत ‘महात्मा फुले समाज सेवा मंडळा’चे कार्य पसरले आहे.

एक काम मौजे वडाचीवाडी किंवा वाघाचीवाडी येथे सुरू झाले. त्यावेळी ‘श्रमशक्ती द्वारे ग्रामविकास’ ही योजना शासनाने सुरू केली होती. त्यातून गावात विकास कामे होणार होती. त्यासाठी प्रमोद यांनी त्या गावात त्यांच्या काही सहकारी कार्यकर्त्यांसोबत जाऊन, काही दिवस बैठका घेऊन प्रबोधन केले. 1992-93 सालच्या काळात घडलेला एक प्रसंग मोठा रंजक आणि अविस्मरणीय आहे. त्या गावात ग्रामसभा घ्यायची होती. पूर्वी लोक दवंडी दिल्याशिवाय एकत्र येत नसत. दवंडी देणारा गावचा कोतवाल बाहेरगावी गेलेला होता. दवंडी तर द्यायची होती. दवंडी कोणी द्यायची हा प्रश्न सर्वांपुढे पडला. दवंडी दिल्याशिवाय लोक तर बैठकीला येणार नाहीत. तेव्हा प्रमोद यांनी गावातील तरुण मुलांना दवंडी देण्याची आवाहनवजा विनंती केली. त्यावेळी ते त्या तरुण मुलांना पटले नाही. ते काम त्यांना कमीपणाचे वाटले. दवंडी ही विशेषतः मातंग समाजातील लोक देत असत. त्यामुळे त्यांनी प्रमोद यांना सांगितले, “आम्ही तुमच्या मदतीला आलोत व तुम्ही आम्हाला दवंडी द्यायला सांगता काय? तुम्ही तुमच्या गावात दवंडी द्याल का?” तेव्हा प्रमोद यांनी दवंडी देणाऱ्या कोतवालाच्या घरचे डफडे आणले व स्वतः त्या उपक्रमाबाबत दवंडी दिली. लोकांना एकत्रित येण्याचे आवाहन केले. त्या प्रसंगाने लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला व शासनाची योजना त्या गावात सफल झाली. अशा प्रकारे प्रमोद हे स्वतः पुढे होऊन काम करतात. लोकांना त्यांच्या स्वत:च्या कृतीने त्या कामात सहभागी करून घेण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय आहे. त्यांनी ‘विधवा प्रथा निर्मूलन अभियाना’ची सुरुवातही स्वतःपासून केली आहे. शासन दरबारी त्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्रही लिहून दिले आहे. ‘विधवा प्रथा निर्मूलन अभियाना’त त्यांच्यासोबत सर्व स्तरांतून कार्यकर्ते जोडले जात आहेत. त्यांच्या त्या कार्याची दखल शासनाने घेतली आहे.

 हरिभाऊ हिरडे 8888148083 haribhauhirade@gmail.com

———————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here