हेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले! (Herwad Village is charged with reforms for better treatment to widows)

0
295

समाजाच्या चौकटी मोडणे सहजशक्य नसते. परंतु संपूर्ण गाव एकत्र आले तर काय करू शकते, याचा आदर्श हेरवाडच्या ग्रामस्थांनी विधवा प्रथा निर्मूलन ठराव संमत करून घालून दिला आहे. त्यांनी विधवांच्या मुक्तीचे दार उघडले आहे. ‘गाव करेल ते राव काय करील’ ही उक्ती हेरवाडकरांनी सार्थ ठरवली आहे…

कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्राम पंचायतीने विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव ग्रामसभेत संमत केला. महिलांशी संबंधित एका संवेदनशील विषयाला त्यामुळे वाचा फुटली. एका अमानवी प्रथेच्या विरुद्ध लढा देणाऱ्या या गावाचे अभिनंदन आणि अनुकरणही केले पाहिजे.

माझे वडील दत्तराज धुमाळ यांचे निधन 2004 साली झाले. त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा प्रभाव  होता. त्यांनी समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्यासोबत काम केले होते. त्यांनी निधनापूर्वी लिहून ठेवले आहे, की माझ्या पत्नीने विधवा प्रथेचे अनुकरण करू नये. कुंकू पुसू नये. बांगडी-चुडा फोडू नये वगैरे… पण समाजाचा दबाव व भीती यांमुळे आम्ही वडिलांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. राजकारणातील माझ्या एका जिवलग सहकारी मैत्रिणीच्या पतीचे निधन काही महिन्यांपूर्वी झाले. त्या वेळी तिच्या बांगड्या, चुडे फोडताना, जोडवी काढताना, कुंकू पुसताना, मंगळसूत्र काढताना माझ्या मनाला वेदना झाल्या. मी हेलावून गेले, पण ते थांबवू शकले नाही. या दोन घटनांचा माझ्या मनावर प्रचंड ताण होता. तो घेऊन मी वावरत होते. हतबलता आतून त्रास देत होती. अशातच, हेरवाडच्या ठरावाची बातमी धडकली आणि मी अतिशय/खूपच आनंदी झाले. त्या आनंदातच हेरवाड गाठले, ठराव कसा घडत गेला? ती प्रक्रिया कशी झाली? हे जाणून घेण्यासाठी…

लताबाई मोहिते, हेरवाडमधील विधवा भगिनी. त्यांच्या पतीचे निधन काही महिन्यांपूर्वी झाले. प्रथेप्रमाणे त्यांच्या अंगावरून टिकली, बांगड्या, मंगळसूत्र काढले गेले. त्या पती गेल्याचे दु:ख पाठीशी सारून रोजीरोटीसाठी बेकरीच्या कामावर बाहेरगावी काही दिवसांनी जाऊ लागल्या, कारण लताबार्इंवर कुटुंबातील त्यांचा मुलगा, सून आणि तीन नातवंडे यांची जबाबदारी आहे. कामाला बाहेरगावी जावे लागते, प्रवास करावा लागतो, कामाच्या ठिकाणी अनोळखी परपुरुषांशी संबंध येतो, तेव्हा लताबार्इंना विधवा महिलेकडे पाहण्याची वाईट नजर छळू लागली. असुरक्षितता व भीती या भावनांनी त्यांच्या मनात घर केले. लताबार्इंना पुरुषप्रधान संस्कृतीत विधवा स्त्री होणे ही जणू संधीच अशा ‘पुरुषी’ नजरांचा सामना करावा लागत होता. त्यातून मार्ग म्हणून त्यांच्या दोन विधवा जावांनी व इतर नातेवाइकांनी ‘टिकली लाव, मंगळसूत्र घाल’ असा सल्ला दिला. त्यांनाही स्वत:ला वाईट नजरांपासून वाचवण्यासाठी ते करणे सयुक्तिक वाटले आणि मग त्यांनी सौभाग्यवतींप्रमाणे टिकली, मंगळसूत्र परिधान करून कामाला जाणे सुरू केले. ती गोष्ट मोठ्या धाडसाची ठरली, गावात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, कोणी हेटाळणी केली, तर कोणी समजून घेतले. मी लताबार्इंशी यांवर संवाद साधला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘सती होण्याच्या दु:खाचे चटके बसले नसतील तेवढे चटके विधवा म्हणून मी अनुभवले. समाज सहजासहजी आम्हाला स्वीकारणार नाही, पण आम्ही थांबणार नाही. आमच्या सोबत आमची ग्राम पंचायत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.’’

गावातील होतकरू तरुण अमोल पाटील याचे निधन कोविडच्या दुसऱ्या लाटेत झाले. अमोल त्याची ऐन तिशीतील पत्नी अस्मिता आणि दोन मुले एवढ्यांना मागे सोडून मृत्यू पावला. अस्मिताला भेटण्यास तिच्या घरी गेले. दोन चिमुकल्या मुलांना सांभाळत, अस्मिता तिचे साठी ओलांडलेले सासरे व एक विधवा आजी यांच्यासह घरात राहते. तिला पाहताच विधवा कुप्रथेची तीव्रता मला पुन्हा स्पर्शून गेली. मी बोलत होते… अस्मिता शून्यात नजर लावून बसलेली. चेहरा उदास, आसपास घडणाऱ्या घटनांपासून अलिप्त, चालता-बोलता मृतदेहच जणू! सासरे भरभरून बोलले. आजीही बोलल्या, दोन चिमुकली मुले घरात खेळत होती. मी विधवा प्रथा मुक्तीबद्दल बोलत असताना, अस्मिताने काहीही प्रतिसाद दिला नाही. मीच घाबरत घाबरत निघताना तिला विचारले, ‘मला कुंकू लावते का?’ त्या क्षणी, अस्मिता दचकून जणू भानावर आली, विजेच्या वेगाने घरात जाऊन पंचपात्र घेऊन आली, तिने मला हळदी-कुंकू लावले. सासरे म्हणाले, ‘लावा, तिलाही हळदी-कुंकू…’ सोबत, ग्राम पंचायतीच्या विधवा महिला उज्वला भिंगे होत्या, त्या भावूक झाल्या. आम्ही सगळ्यांनी एकमेकींना हळदीकुंकू लावले. अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू उमटले. अस्मिताच्या घराजवळच हेरवाड गावची देवी संतुबाई हिचे मंदिर आहे. तेथे बसून आम्ही सर्वांनी या धाडसाची शक्ती संतुबाई हिचे आभार मानले. भंडारा कपाळावर लावला, ‘आई राजा उदो उदो’चा नारा दिला.

हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितले, की ‘‘कोविड काळात वीसबावीस तरुण अचानक मरण पावले. मागे त्यांच्या विधवा पत्नींचे हाल पाहवत नव्हते. गावातील अनेक घरांत विधवा आहेत व त्या आमच्या लेकी-सुना, आई-आजी-भावजयी यांची या प्रथेमुळे होणारी विटंबना पाहवत नव्हती. म्हणून आम्ही एकमताने विधवा प्रथा बंदीचा ठराव घेतला. जुन्या लोकांना विश्वासात घेण्यास थोडा त्रास झाला, पण तो ठराव विधवा महिलांच्या आणि ग्राम पंचायत सदस्यांच्या पुढाकारातून मंजूर करण्यात आला. आमच्या ग्राम पंचायतीने समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त शाहूराजांच्या विचारांना सलाम म्हणून हा निर्णय घेतला.” सुरगोंडा पाटील हे राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत तयार झालेले आहेत. ते गावातील अल्पसंख्याक समुदायातील आहेत. त्यांनी त्या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी गावातील सर्व गट-तट-विचारधारा यांना सोबत घेऊन केली असल्याचे आनंदाने सांगितले.

सुजाता केशव गुरव यांनी या ठरावाला अनुमोदन दिले आहे. त्या अंगणवाडीची जबाबदारी सांभाळतात. त्यांची बहीण विधवा आहे, त्याच विधवा बहिणीच्या मुलीचे संगोपन, शिक्षण करतात. त्या अंगणवाडीत वाचनालयही चालवतात. त्या माध्यमातून महात्मा फुले, सावित्रीबाई, शाहू महाराज, ताराबाई शिंदे, राजा राममोहन रॉय, विठ्ठल रामजी शिंदे, साने गुरुजी, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांचे साहित्य गावातील युवक-युवतींना वाचण्यास उपलब्ध करून देतात.

सुजाता गुरव यांचे वैचारिक पाठबळ गावातील विधवा महिलांना ही प्रथा मोडीत काढण्यासाठी आहे. त्यांचा गावातील विधवांना या प्रथेच्या विरुद्ध बोलण्यासाठी, कृती करण्यासाठी मनोभूमिका तयार करण्यात मोठा वाटा आहे. त्या बाबा नदाफ, संजय रेंदाळकर या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसोबत सेवा दल विचारांचा प्रसार-प्रचार करत असतात.

विधवा प्रथा मुक्तीचा ठराव मांडणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई पुजारी म्हणाल्या, “विधवा महिला या आमच्याच कुटुंबातील आहेत. आम्ही आमच्याच लेकीबाळींवर, सुनांवर का सूड उगवावा? आम्ही त्यांची आबाळ का करावी? विधवा प्रथेला घरातील ज्येष्ठांनी विरोध केला तर ती समस्या सुटू शकते. आम्ही कोणत्याही महिलेने पतीच्या मृत्यूनंतर सौभाग्यलेणी काढू नयेत आणि समाजानेही सवाष्ण स्त्रियांना मिळणारा सर्व मानपान विधवा महिलांना द्यावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत.” मुक्ताबाई पुजारी यांचे पती संजय पुजारी यांनी सरकार दरबारी विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या मते, हा लढा केवळ प्रतीकात्मक रेटून चालणार नाही. विधवांचे मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. संजय पुजारी हे सुलाबाई वरमाने, सरसालक्ष्मी मोरे आणि सखुबाई कृष्णा कुरवी या वयोवृद्ध विधवांना पेन्शन मिळावे, आरोग्य सुविधा मिळाव्यात, मोफत अन्नधान्य मिळावे म्हणून झटत आहेत. सखुबाई कृष्णा कुरवी या वयोवृद्ध आजीचे पती व मुलगा दोघेही निवर्तले आहेत, सूनही नाही. एकटी आजी तीन नातवंडांचा सांभाळ कशी करणार? संजय पुजारी यांना असे प्रश्न अस्वस्थ करतात. विधवांचे प्रश्न केवळ सौभाग्यलेणी आणि मान-सन्मानापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या उपजीविकेचे, वारसाहक्काचे, सुरक्षिततेचे आणि आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. त्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना आखून अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

गावाने चांगल्या कामात गट-तट, राजकीय पक्षभेद, निवडणुका या गोष्टींचा अडथळा येऊ द्यायचा नाही असे ठरवले आहे. हेरवाड ग्राम पंचायतीने बाळगोंडा पाटील या विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण 26 जानेवारी रोजी केल्याची माहिती सुकुमार पाटील यांनी दिली. सुकुमार पाटील हे ग्राम पंचायत सदस्य आहेत. सुरगोंडा पाटील आणि सुकुमार पाटील यांनी, करमाळ्याच्या महात्मा फुले सामाजिक संस्थेचे प्रमोद झिंजाडे, साने गुरुजी विद्यालयाच्या माणिक नागावे, अंजलीताई पैलवान, आटपाडीच्या विधवा विकास संस्थेच्या लतादेवी बोराडे यांच्या प्रबोधनाचा चांगला परिणाम हेरवाडवर झाला असे सांगितले.

वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनमध्ये काम करणारा, गावातील शेतकरी मुकुंद पुजारी हा संवेदनशील तरुण. त्याच्या मित्राचे कोविडमुळे निधन झाले. त्यावेळी तेथील इतर महिलांनी त्या विधवा युवतीबद्दल जे उद्‌गार काढले, त्याने तो व्यथित झाला. त्याने एक क्रांतिकारक पाऊल उचलले. गावातील शेतकरी शेतातील सर्व कामे विधवांकडून करून घेतात, मात्र धान्याची रास होते तेव्हा ते विधवेला टाळतात- अपशकुन होईल, पीक कमी होईल अशी भीती दाखवतात. मुकुंदने स्वत:च्या शेतातील धान्याची रास एका विधवा भगिनीच्या हस्ते करण्याचा निर्णय धाडसाने घेतला. कुटुंबातील, गावातील काही मंडळींनी विरोध केला, नाराजी दाखवली; पण मुकुंदने सगळ्यांची समजूत घालून विधवेच्या हातांनी धान्याची रास केलीच!

हेरवाडकरांनी विधवा प्रथा सतीप्रथेसारखी लवकरच इतिहासजमा होईल हा विश्वास दिला आहे. त्यांनी विधवांच्या मुक्तीचे दार उघडले आहे.

सोनाली मारणे, 9545538844 sonalimarneinc@gmail.com

(साधना, 28 मे 2022 वरून उद्धृत)

—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here