कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा जन्म

0
175

दापोली तालुक्याच्या कोळबांद्रे गावात शंकराची पिंडी एका ढिगातून वर आली. ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला. त्यामुळेच त्या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले. ब्रिटिश कालीन ह्या मंदिराचा 2015 साली जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात असलेला नक्षीदार घुमट, मंदिरासमोरील त्रिपुर यामुळे मंदिरा भोवतीचे वातावरण तेजोमय वाटते…

दापोली तालुक्याच्या कोळबांद्रे गावात शंकराचे ‘डिगेश्वर मंदिर’ हे प्राचीन देवस्थान आहे. त्या मंदिराच्या जागेत मूळ शेती केली जात असे. कहाणी अशी, की त्या जमिनीत नांगरणी सुरू असताना नांगराचा फाळ जमिनीत एका ढिगामध्ये खोलवर रुतून बसला. नांगर अडकल्याच्या त्या जागेतून शंकराची पिंडी वर आली ! ही गोष्ट गावात पसरली. तेथून पाण्याचा प्रवाह सुरू झाला. तो प्रवाह वाहत जाऊन नजीकच्या तळीला मिळाला. त्या तळीतील पाणी आजतागायत कधीही आटलेले नाही. त्या पिंडीची मंत्रपठण करून शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करण्यात आली. मंदिराची स्थापना 1811 साली झाली. शंकराची ती पिंडी एका ढिगातून वर आली. ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला असावा. त्यामुळेच त्या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले.

गावकऱ्यांनी इतर देवदेवतांच्या मूर्ती मंदिरात यथाकाल बसवल्या. त्यांत समावेश गणपती, नंदी, चंडीका देवी, कोटेश्वरी देवी, झोलाईदेवी, काळकाई देवी, भैरी भवानी देवी, वाघजाई देवी, मानाई देवी यांचा आहे. डिगेश्वरासह सर्व देवदेवतांची पूजा गावाचे ‘पाटील’ करत होते, परंतु तेथे शंकराची स्वयंभू पिंडी असल्याने शंकराच्या पिंडीची स्थापना करण्यासाठी लिंगायत ब्राह्मण लागतात असे ग्रामस्थांचे मत पडले. त्यामुळे तेव्हापासून तेथे गुरव पूजा करत आहेत. त्याआधी तेथे मंत्रपठण, होमहवन करून मूर्तींचे शुद्धिकरण केले गेले. प्रत्येक गुरवाचा पूजेचा कालावधी एक वर्षाचा असतो. डिगेश्वराच्या गाभाऱ्यात फक्त गुरव समाजातील व्यक्तींना प्रवेश दिला जातो.

देवस्थान ब्रिटिश काळातील आहे. मंदिराच्या भिंती पूर्णतः मातीच्या होत्या. मंदिराचा जीर्णोद्धार 2015 साली झाला. तो सोहळा 25 मे रोजी पार पडला. महाशिवरात्रीला डिगेश्वरावर दुधाचा अभिषेक वाहिला जातो. रात्री लहान मुलांचे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात; तसेच, भजन-कीर्तन सादर होत असते. नवरात्रीत चंडिका देवी, कोटेश्वरी देवी, झोलाई देवी, काळकाई देवी, भैरी भवानी देवी, वाघजाई देवी, मानाई देवी या देवींचे उत्सव त्याच मंदिरात साजरे होत असतात. कोळबांद्र्याची कोटेश्वरी आणि सडवलीची कोटेश्वरी या दोन देवींच्या पालख्यांचे मिलन दर तीन वर्षांनी अधिक महिन्यात सडवली-कोळबांद्रे येथील नदीवर होते. त्याचे कारण त्या दोघी एकमेकींच्या सख्ख्या भगिनी मानल्या गेल्या आहेत. फुलांचा हार करून पालख्या सजवतात, देवींना रूपे चढवली जातात, दोन्ही गावचे मानकरी पालख्यांसह नदीवर जातात. देवींची खणा-नारळाने ओटी भरली जाते, गुरव नैवेद्य दाखवतात. नदीच्या काठावर पालख्यांचे नाचवणे-खेळवणे होते. हे उत्सव कोळबांद्रे गावाच्या बारा वाड्यांतील ग्रामस्थ साजरे करतात. मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. मंदिरात असलेला नक्षीदार घुमट, मंदिरासमोरील त्रिपुर यामुळे मंदिरा भोवतीचे वातावरण तेजोमय झाले आहे !

– संकलित

——————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here