कृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर

0
201

बनबिहारी विष्णू निंबकर यांनी शेळ्या व मेंढ्या यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या त्या अभ्यास व संशोधन कार्यामुळे शेळी-मेंढीपालन करणारे लोक यांची उन्नती साधली गेली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना, उत्पादने आणि ती तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे ते मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती…

बनबिहारी निंबकर यांचा जन्म गोव्यातील मडगाव येथे 17 जुलै 1931 रोजी झाला. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात (प्राथमिक आणि माध्यमिक) भारतात झाली, परंतु त्यांनी पुढील शालेय शिक्षण अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यात (जॉर्ज स्कूल) घेतले, त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण तेथून जवळचे राज्य न्यू जर्सीमधील रटगर्स महाविद्यालयातून मिळवले. त्यांनी कृषी विषयात बीएससी पदवी त्याच महाविद्यालयामधून 1951 मध्ये संपादन केली, तर अमेरिका येथील अ‍ॅरिझोना विद्यापीठातून एम एससी (कृषी) पदवी 1956 साली संपादन केली.

बनबिहारी निंबकर यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर दिनकर (महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव) व इरावती कर्वे यांची मुलगी जाई हिच्याशी लग्न केले. त्यांच्या आयुष्यातील साठहून अधिक वर्षांच्या कालावधीतील पूर्वार्ध शेती संबंधीच्या प्रयोगांमध्ये गेला, तर उत्तरार्ध कोरडवाहू भागासाठी सोयीचे लहान रवंथी प्राणी विकसित करण्यात गेला.

त्यांनी मातृभूमीच्या ओढीने 1956 च्या सुमारास भारतात परतल्यावर प्रथम महाराष्ट्रातील फलटण येथील शंभर एकर जमीन कसण्यास घेतली. ती जमीन दलदलीची होती. तेथे बाभूळ व तत्सम वनस्पती होत्या. त्यांनी जमिनीमधील पाण्याचा निचरा चर काढून केला व ती जमीन लागवडीयोग्य तयार केली. त्यांनी फलटणमध्ये शेती करतानाच परिसरातील अल्पभूधारक शेतकरी, सालगडी, शेतमजूर, धनगर यांचे – शेती व शेतकरी जीवन, पावसाने सतत हुलकावणी देणाऱ्या भागामधील जीवनमान, सततच्या दुष्काळी छायेमुळे होणारी परवड या समस्यांचा सहा वर्षे सातत्याने अभ्यास केला. त्यांनी उत्तम वाणाची व कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची बियाणे जर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली तर त्यांना आर्थिक फटका बसणार नाही या विचाराने 1968 मध्ये ‘निंबकर कृषी संशोधन संस्था’ व 1971 मध्ये  ‘निंबकर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांची स्थापना केली. त्या दोन्ही संस्थांमुळे शेतकऱ्यांनी शेतात उभे राहिलेले पीक पाहिले. त्यांना निंबकर यांच्या वाणाची खात्री पटली. शेतकऱ्यांना पन्नास वर्षे त्या दोन्ही संस्थांचा लाभ झाला व होत आहे.

निंबकर यांनी उत्तम शेती उत्पन्नासाठी कापूस, सूर्यफूल, करडई, ज्वारी, मका इत्यादी पिकांच्या जाती निर्माण केल्या. त्या जाती निर्माण करताना प्रामुख्याने कोरडवाहू व अल्पसिंचन गटांमधील शेतकऱ्यांचा विचार केला गेला. त्यामुळे त्या निर्माण केलेल्या बियाण्यांचा भारतभर प्रसार झाला व खप वाढला.

निंबकर यांची शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योजना व उत्पादने तयार करण्यातील कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी (1978-1984) ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात चालली होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे दोन-तीन नवीन उत्पादने व प्रक्रिया अंमलात आल्या, त्यामुळे मॅफ्को ज्या शेतकऱ्यांना उत्पादने बाजारात आणण्याकरता मदत करत होती त्यांना अधिक मोबदला मिळू लागला. दूध हे त्यातील पहिले उत्पादन होते. निंबकर यांनी ‘एनर्जी’ हे दुधापासून पेय तयार केले. ते पेय मुंबईतील शाळांसमोर गाड्यांमधून विकले जात असे. मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेगाड्यांमध्ये इतर सर्व शीत पेयांना एनर्जी हा पर्याय दोन-तीन दशके ठरला होता. ‘एनर्जी’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. निंबकर यांनी तयार केलेली गोठवलेली भेंडी आखाती देशांमध्ये निर्यात केली जाऊ लागली. आम्रखंड हा खाद्यप्रकार मॅफ्कोने पहिल्यांदा तयार करून बाजारात आणला. मॅफ्कोच्या वतीने विविध रूपांमधील डुकराचे मांस विक्रीला ठेवले जाऊ लागले आणि ते उत्पादन बाजारपेठेत चांगले खपले. निंबकर ‘मॅफ्को’तून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती.

निंबकर यांनी फलटण परिसरातील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करताना ‘शेळी ही गरिबाघरची गाय’ आहे’ हे गांधीजींचे ब्रीदवाक्य लक्षात घेतले. दारात उत्तम शेळी असेल, तर गृहिणी मीठमिरचीचा खर्च भागवून पैदासीच्या विक्रीमधून चार पैसे बाजूला टाकू शकते हा त्या जीवनशैलीचा मंत्र. निंबकर यांनी शेळीच्या व मेंढीच्या विविध जातींचा अभ्यास केला. उत्तम दूध देणारी, उत्तम पैदास देणारी व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या दारामध्ये अल्पखर्चात सहजगत्या सांभाळता येईल अशी जात निर्माण करण्यासाठी निंबकर कृषी संशोधन संस्थेमध्ये स्वतंत्र पशु-संवर्धन विभागाची स्थापना 1990 मध्ये झाली.

त्या आयोगाच्या अभ्यासातून ‘महाराष्ट्र शेळी-मेंढी संशोधन व विकास संस्था’ या स्वयंसेवी संस्थेची 14 डिसेंबर 1989 रोजी निर्मिती झाली. त्या संस्थेमध्ये शेळी-मेंढी पालनाशी संबंधित सर्व सरकारी व निमसरकारी संस्थांचा समावेश केला गेला. दक्षिण आफ्रिकेमधील ‘बोअर’ या जातीच्या शेळ्यांची आदर्श वाण म्हणून निवड करण्यात आली. भारतात ऑस्ट्रेलियन सरकारच्या आर्थिक सहकार्याने बोअर शेळ्यांचे भ्रूण व वीर्यमात्रा 1993 मध्ये आणले. त्या भ्रूणांचे रोपण स्थानिक ‘सिरोही’ शेळ्यांमध्ये करून संस्थेचा पहिला बोअर शेळ्यांचा कळप 1994 च्या सुमारास निर्माण केला.

सीरिया या  देशामधून दूध व मांस या दोन्हींसाठी उपयुक्त अशा ‘दमास्कस’ शेळ्यांचे गोठित वीर्य तयार करून आणण्यात आले. निंबकर यांनी मेंढीने शेळी प्रमाणे जुळ्या पिल्लांना जन्म दिला तर आपोआप मेंढीपालनकर्त्याचे जीवनमान उंचावेल असा विचार करून मेंढीच्या जातींचा अभ्यास केला. त्यांना पश्चिम बंगालमधील सुंदरबन प्रदेशातील ‘गरोळ’ जातीची मेंढी जुळ्या पिल्लांना जन्म देते असे समजले. म्हणून त्यांनी त्या जातीच्या मेंढ्यांचा जनुकीय अभ्यास करण्यावर भर दिला. तसेच, त्या प्रयोगामधील महत्त्वाचे यश म्हणजे स्थानिक लोणंद येथील दख्खनी मेंढीशी संकर करून नवीन ‘नारी सुवर्णा’ ही जुळ्या पिल्लांना जन्म देणारी मेंढीची जात निर्माण केली गेली. त्या मेंढीची वाढ दख्खनी मेंढीपेक्षा अधिक वेगाने होते आणि तिला जुळे होण्याची शक्यताही दख्खनी मेंढी पेक्षा दुपटीने जास्त असते. साहजिकच पशुपालन कर्त्याला त्या मेंढीपासून भरपूर फायदा होतो.

निंबकर यांचे शेतीमधील महत्त्वपूर्ण संशोधनाचे अनेक लेख, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झाले आहेत. निंबकर हे ‘निंबकर कृषी संशोधन संस्था’ व निंबकर सीड्स यांचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कृषी विभागाचे संचालकपद, ‘मॅफ्को’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र शेळी व मेंढी आयोगाचे अध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत. निंबकर यांचे कृषी क्षेत्रामधील अमूल्य संशोधनात्मक योगदान व तळमळ यांची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन 2006 मध्ये गौरव केला.

भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील शेती विकास आणि संशोधन यांत निंबकर यांचे व त्यांच्या नारी संस्थेचे मोठे योगदान आहे. निंबकर यांनी 1990 पर्यंत नारी संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. त्या संस्थेला जागतिक शाश्वत संशोधन पुरस्कार 2009 मध्ये देण्यात आला.

बनबिहारी निंबकर यांचे निधन 25 ऑगस्ट 2021 रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी जाई, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची कृषी व पशुसंवर्धन विषयातील संशोधनाची परंपरा त्यांच्या मुली नंदिनी आणि चंदा निंबकर या पुढे नेत आहेत. तर मंजिरी निंबकर प्रगत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात नव संकल्पना वापरून दर्जेदार शिक्षण पोचवत आहेत.

– प्रतिनिधी

———————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here