प्रशासनातील पुरुषोत्तम – पुरुषोत्तम भापकर

0
258

पुरुषोत्तम भापकर यांची ख्याती प्रशासनात कर्तव्यकठोर व सर्वसामान्यांच्या कामांसाठी तत्पर अधिकारी अशी आहे. ते विशेषत: तळागाळातील लोकांबद्दल अधिक दक्ष असतात. ते पदाचा बडेजाव मिरवत नाहीत, कामे मार्गी लावतात, स्वाभाविकच आहे ते, कारण ते हळव्या मनाचे संवेदनशील व प्रतिभावंत कवीदेखील आहेत. ती त्यांची ओळख निवडकांनाच माहीत आहे. त्यांचा बाणा शासकीय योजना या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवाव्या हा आहे. त्यांना बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि गाडगेबाबा या त्रयींच्या विचारांचा वारसा चालवण्याची आंतरिक प्रेरणा बळ देणारी वाटते. तो वारसा ते कार्यक्षमपणे राबवतात; म्हणूनच बहुधा त्यांच्या तीस वर्षांच्या सेवेत पंचवीसहून अधिक बदल्या झाल्या आहेत !

त्यांचे प्राथमिक शिक्षण सालवडगावच्या जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण शेवगावच्या बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये झाले. त्यांना अभ्यासाशिवाय ग्रामीण मुलांना तरणोपाय नाही हे बाळकडू तेथेच मिळाले. त्यांनी डी एड ही पदविका मिळवली. त्या परीक्षेत ते पुणे विभागात प्रथम तर राज्यात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ते लगेचच सहशिक्षक म्हणून शेवगावच्या आबासाहेब काकडे यांच्या शिक्षणसंस्थेत रुजू झाले. शेवगाव, कांबी या गावांत सामान्य शिक्षकाची नोकरी केलेला हा तरुण स्वत:च भविष्यात महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्तपदी विराजमान होईल असे कोणाला स्वप्नातसुद्धा त्या वेळी वाटले नव्हते ! परंतु ते आयुक्त झाले आणि त्यांनी प्रगत शैक्षणिक अभियान राबवले.

हा चमत्कार कसा घडला? तर ते सांगतात, की त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनपेक्षित घटनांनी त्यांच्यातील महत्त्वाकांक्षा जागी झाली आणि त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळत असताना संपूर्ण व्यवस्था बदलण्याची असेल तर प्रशासकीय सेवेत जाऊन वंचित आणि कष्टकरी वर्गांच्या प्रश्नांना उत्तरे शोधली पाहिजेत हा विचार मनी आला. त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. दरम्यान, त्यांनी बहिस्थ विद्यार्थी म्हणून अर्थशास्त्रात एम ए ही पदवीही प्राप्त करून घेतली. महाविद्यालयात अध्यापन काही काळ केले. त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश कोणाचे मार्गदर्शन नाही, उपयुक्त पुस्तकांची वानवा अशा प्रतिकूल परिस्थितीत मिळवले हे मुद्दाम नमूद केले पाहिजे.

त्यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेत जळगाव, धुळे, निफाड, मालेगाव या विभागांचे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यक्षम कारभाराचा ठसा परभणी, पुणे, धुळे या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उमटला आहे. त्यांनी औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त व अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त, जलसंधारण सचिव आणि शिक्षण आयुक्त ही प्रशासनातील महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते मराठवाड्याचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या कामातील वैशिष्ट्ये म्हणजे धडाकेबाज निर्णय, निस्पृह बाणा, दुजाभाव नसणे, वंचितांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक धडपड आणि मानवतावादी विशाल दृष्टिकोन अशी सांगितली जातात. म्हणून त्यांना प्रशासनातील पुरुषोत्तम हे बिरूद अनौपचारिक रीत्या बहाल करण्यात आलेले आहे. त्यांनी कामे करताना विघातक सामाजिक प्रवृत्ती, राजकीय दडपणे, उपद्रवी घटकांच्या धमक्या, अदृश्य घटकांचा दबाव या प्रकारांना कधीही जुमानले नाही.

ते मालेगावला असताना जातीय दंगल उसळली. त्यांनी जीव धोक्यात घालून ती आटोक्यात आणली, एका टप्प्यावर चार हजार लोकांचा संतप्त जमाव चालून आला होता, पण भापकर यांनी त्यांना ‘बंधुप्रेमा’ने जिंकले. खरे तर, त्यांची मालेगावहून बदली त्या आधीच झाली होती. पण ते तेथून गेले तर जातीय दंगा भडकू शकतो हे लक्षात घेऊन, त्यांनी दंगल नियंत्रणात आणून नंतरच शहर सोडले ! त्यांनी परभणी जिल्हा परिषदेत राबवलेला प्राथमिक शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाचा प्रकल्प राज्यभर ‘भापकर पॅटर्न’ म्हणून ओळखला जातो. त्याचे अनेक जिल्ह्यांनी अनुकरण केले आहे. त्यांनी गावोगावी स्वत: उपस्थित राहून त्या प्रकल्पात चावडी वाचन उपक्रम राबवला, प्रामाणिक शिक्षकांना जागेवर वेतनवाढ, पुरस्कार दिले तर कामचुकारांना गावकऱ्यांसमोर शिक्षा सुनावल्या.

औरंगाबाद मनपाचे आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द राज्यात गाजली. त्यांना औरंगाबादेत ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाते, तर त्या शहरातील नागरिकांनी त्यांचा अनोखा सन्मान करताना शहरातील एका मोठ्या रस्त्याला त्यांचे नाव दिले आहे ! मुलकी सेवेतील अधिकाऱ्याचा असा सन्मान क्वचितच कधी घडला असेल. त्यांनी मनपामधील टक्केवारी राज आणि ‘टेंडर राज’ निग्रहाने संपुष्टात आणताना, राजकीय दबावाला भीक घातली नाही. त्या मोहिमेत त्यांनी एका अर्थाने स्वत:लाच पणाला लावले होते !

महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्तपदी काम करताना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानातून शिक्षण व्यवस्थेचे वास्तवचित्र समोर आणून आवश्यक बदल केला. त्यांनी शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेत औरंगाबादेत अवघ्या दोन महिन्यांत सर्व यंत्रणा सजगतेने कामाला लावली आणि चार हजार सातशेअकरा तसे विद्यार्थी शोधून काढले; त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ‘भाऊ-दीदी’ असा प्रयोग साकारला. हुशार विद्यार्थ्यांकडून ‘अप्रगत विद्यार्थ्यांचा विकसन प्रयोग’ महाराष्ट्रात प्रथमच यशस्वी करून दाखवला. या प्रकल्पाचे फलित म्हणजे यातील अनुभवावर आधारित ‘शोध मुलांच्या मनाचा’ हे पुस्तक होय ! त्यांनी त्याच काळात वेद प्रकल्प राबवत सातत्यपूर्ण मूल्यमापन करून शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवून आणली. त्यांनी अवघ्या काही महिन्यांत नंदुरबार, धुळे, गडचिरोली या जिल्ह्यांच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा अथक प्रयत्नाने डिजिटल करून आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने केले.

त्यांनी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना गुटखा व मावा बनवणाऱ्या माफियांविरूद्ध मोठी धाडसी कारवाई केली व चारशेपेक्षा जास्त गुन्हे दाखल केले. कामचुकार अधिकाऱ्यांवर विक्रमी संख्येने निलंबनाची कारवाई केली, कार्यक्षम अधिकाऱ्यांना पाठबळ दिले.

प्रामाणिकपणे काम करत असताना येणारे संघर्षाचे प्रसंग, वैफल्य, निराशा यांतून बाहेर पडण्यासाठी त्यांचे मन शब्दांतून व्यक्त होते आणि ‘मनातल्या उन्हात’ सारखा सुंदर कवितासंग्रह आकारास येतो. अतुल दिवे या संगीतकाराने त्या कवितांना संगीतबद्ध केले आहे. त्यांच्या जीवनसंघर्षावर माहितीपट आहे.

त्यांचे शेवगाव या त्यांच्या मूळ गावावर निस्सीम प्रेम आहे. त्यांनी तेथील युवकांनी स्पर्धा परीक्षांतून पुढे यावे यासाठी शेवगावच्या महात्मा सार्वजनिक वाचनालयाला एक लाख रुपयांची देणगी दिली. त्या रकमेतून वाचनालयाने ‘डॉ. पुरुषोत्तम भापकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका’ सुरू केली आहे. त्यांनी शेवगावच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाला तीन लाख रुपये देणगी देऊन ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गौरवपर पारितोषिके जाहीर केली आहेत. तर त्यांनी त्यांच्या भापकर वस्ती या छोट्या भागातील जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांनाही शहराच्या तोडीचे व उच्च दर्ज्याचे शिक्षण मिळावे या हेतूने ती शाळा डिजिटल करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची देणगी दिली आहे.

पुरुषोत्तम भापकर यांना मिळालेले पुरस्कार – जनगणनेतील कार्यासाठी राष्ट्रपती सिल्व्हर मेडल 1991, महाराष्ट्र शासन सर्वोत्कृष्ट अतिरिक्त जिल्हाधिकारी पुरस्कार – 2002-03, भारत ज्योती अॅवॉर्ड 2005, भारतीय दलित अकादमी अॅवॉर्ड – 2006, मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार – 2006, महात्मा गांधी शांतता पुरस्कार – 2008 (मालेगाव दंगल शमवण्यासाठी केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल), युगंधर पुरस्कार – 2012 (औरंगाबाद मनपा आयुक्त म्हणून केलेल्या धडाकेबाज कामाबद्दल औरंगाबादच्या जनतेकडून)

डॉ. पुरुषोत्तम भापकर dr.purushottambhapkar.ias@gmail.com

– उमेश घेवरीकर 9822969723 umesh.ghevarikar@gmail.com

——————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here