कमला निंबकर – व्यवसायोपचाराच्या प्रवर्तक (Pioneer of occupational therapy in India)

0
144

व्यवसायोपचाराचे तंत्र भारतातच नव्हे तर आशियातही प्रथम आणले ते कमलाबाई निंबकर यांनी. त्या अमेरिकन जन्माच्या भारताच्या स्नुषा. विष्णुपंत निंबकर यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले. कमलाबाईंनी भारतात येऊन राहायचे आणि त्यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा नव्या देशाला करून द्यायचा हे नवराबायकोंत आधीच ठरले होते. कमलाबाईंनी नवऱ्याबरोबर केलेल्या त्या कराराचे तंतोतंत पालन केले ! त्यांनी त्याही पुढे जाऊन, भारतात गरज कशाची आहे ते पाहून, त्याचे प्रशिक्षण घेऊन त्याचा प्रचार व प्रसार भारतात केला. विष्णुपंतांनी त्यांना त्यांच्या त्या सगळ्या कामांत पूर्ण पाठिंबा कायमच दिला; प्रसंगी स्वत: पदरमोडही केली.

कमलाबाईंनी व्यवसायोपचाराखेरीज फ्रोबेल पद्धतीच्या बालशिक्षणाची सुरुवात भारतात करून दिली (1934). कमलाबाई त्याकरता इंग्लंडला जाऊन त्या पद्धतीचा अभ्यास करून आल्या. त्यांनी त्यांच्या मुलासह पंचवीस विद्यार्थी घेऊन मुंबईतील खार येथे ‘न्यू खार स्कूल’ ही शाळा सुरू केली (बालवाडी अधिक पूर्णवेळ प्राथमिक व माध्यमिक शाळा). साडेचारशे मुलामुलींची मोठी शाळा उभी राहिली (1942). त्यांनी बॉम्बे सबर्बन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून, शाळा त्यांच्या हाती सोपवून त्या तेथून बाहेर पडल्या !

कमलाबाई भारतात येऊन नवी क्षितिजे धुंडाळू लागल्या. त्यावेळी त्यांच्या वाचनात हेलेन विलार्ड यांचा एक लेख आला. हेलेन विलार्ड या फिलाडेल्फिया स्कूल फॉर ऑक्युपेशनल थेरपीच्या प्राचार्य होत्या. भारतात अत्यंत उपयुक्त परंतु अज्ञात असणारे ते क्षेत्र म्हणजे कमलाबाईंसाठी नवे आव्हान होते. त्या तो अभ्यासक्रम शिकण्यास पाठवता येईल अशा व्यक्तीचा शोध घेत होत्या, पण त्यांना तशी व्यक्ती काही ना काही कारणाने मिळेना. कमलाबाईंच्या आई त्याच सुमारास, अमेरिकेत निर्वतल्या. वडील तिकडे एकटे पडले. कमलाबाईंनी त्यांच्याकडे जाऊन राहायचे व जवळच असणाऱ्या फिलाडेल्फियाला व्यवसायोपचाराचे प्रशिक्षण घ्यायचे असे ठरवून टाकले. तेव्हा त्या पंचेचाळीस वर्षांच्या होत्या. व्यवसायोपचाराच्या अभ्यासक्रमाची व्याप्तीही मोठी होती. मानवी शरीराची रचना व कार्य, विविध आजार आणि कमतरता यांच्यामुळे शरीरावर होणारे परिणाम अशा वैद्यकीय ज्ञानाबरोबर विविध व्यवसायांचे व उद्योगांचेही ज्ञान त्या अभ्यासक्रमात दिले जाते. कमलाबाईंनी तो अभ्यासक्रम जिद्दीने पुरा केला. त्यांनी 1946 साली भारतात परत आल्यावर खाजगी प्रॅक्टिस सुरू केली. त्यांचा मानस व्यवसायोपचाराचा प्रसार भारतात होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम सुरू करण्याचा होता. मात्र ती प्रक्रिया फारशी सोपी नव्हती. शासनाने त्यात अनेक अडचणी उभ्या केल्या. अखेर, कमलाबाईंनी के.ई.एम. हॉस्पिटलच्या अस्थिरोग, शस्त्रक्रिया व बालरुग्ण विभागांमध्ये एक वर्षभर प्रायोगिक तत्त्वावर काम करून व्यवसायोपचाराची उपयोगिता दाखवून द्यावी असे ठरले. तो एका वर्षाचा प्रयोग यशस्वी झाला. मात्र के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या व्यवसायोपचाराच्या अभ्यासक्रमाचे औपचारिक उद्घाटन एकवीस वर्षांनंतर, 1971 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रमुख एस.एम. जैन यांच्या हस्ते व डॉ. आर.जे. कत्रक आणि कमलाबाई निंबकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एका मोठ्या समारंभात झाले ! प्रशालेच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या दगडी फलकावर कोरलेली अक्षरे आहेत, ‘First Occupational Therapy School in Asia, Founded by Mrs. Kamala V. Nimbkar in 1950.’

ती प्रशाला व्यवस्थित चालू लागली. परंतु कमलाबाई के.ई.एम. हॉस्पिटलमधून निवृत्त होऊन 1957 साली तेथून बाहेर पडल्या. त्यानंतर मुंबईच्या त्या व्यवसायोपचार प्रशालेतील अभ्यासक्रमाची गुणवत्ता वेगाने घसरणीला लागली. त्यामुळे कमलाबाईंनी त्यांचा के.ई.एम.शी संबंध विषण्ण मनाने तोडून टाकला ! पण त्या गोष्टीला वर्षसुद्धा होण्याआधी महाराष्ट्राचे त्या वेळचे आरोग्यमंत्री मा.स. कन्नमवार यांनी त्यांना पाचारण केले व विचारणा केली. त्यांना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये व्यवसायोपचार विभाग सुरू करण्याची संधी आली (जुलै 1958). नागपूर व्यवसायोपचार विभागाची कीर्ती देशभर पसरली. विद्यार्थी शिक्षणासाठी तेथे वेगवेगळ्या प्रांतांमधून येऊन दाखल होऊ लागले. नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात आशियातील पहिला व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रम 1963 साली सुरू झाला. जगात फार कमी ठिकाणी त्या विषयातील पदवीचा अभ्यासक्रम आढळतो.

भारतात कुष्ठरोग्यांसाठी व्यवसायोपचाराचा वापर प्रथमच 1953 साली करण्यात आला. कमलाबाई त्यांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबईतील ‘बेगर्स होम’मध्ये गेल्या. तेथे त्यांना तीस पेशंट्स सापडले. कमलाबाईंनी बेगर्स होममध्ये शरद्चंद्र गोखले यांच्या सल्ल्याने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आणि कारागिरांच्या सहाय्याने अतोनात कष्ट करून कुष्ठरोग्यांसाठी विविध प्रकारची उपकरणे बनवली. त्यांच्यामुळे रुग्ण हाताचा तळवा व बोटांची उरलीसुरली पेरे वापरून दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनू शके. त्या बेगर्स होममध्ये एक प्रौढा होती. तिला दोन्ही हातांच्या अंगठ्यांचे केवळ एक-एक पेर उरले होते. तिला जेवण्यासही घालावे लागे. कधी कधी, ती हाताच्या मागच्या बाजूला अन्न घेऊन चाटून खात असे. तिला स्वत:ची वेणीही घालता येत नसे. परंतु तिच्यापाशी डोक्यावरील केस ही एकच गोष्ट आत्मसन्मान देणारी उरली असल्याने ती केस कापूही देत नव्हती. कमलाबाई व त्यांचे विद्यार्थी यांनी तिच्यासाठी चमचा पकडण्याचे एक उपकरण, कंगवा पकडण्याचे एक उपकरण अशी काही उपकरणे बनवून तिला दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनवले !

त्यांनी भाजलेल्या लोकांच्या, मतिमंदांच्या व मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठीही व्यवसायोपचाराचा प्रयोग केला. या तिन्ही प्रकारच्या रुग्णांमध्ये व्यवसायापेक्षा मानसिक व भावनिक अंगांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण त्यांना व्यायामापेक्षा मन गुंतवण्यासाठी उपचार हवा असतो. कमलाबाईंसमोर एकदा एक विशेष आव्हान आले. एका रुग्णाला छातीवर भाजले होते. जखम लवकर बरी होण्यासाठी त्यांच्याच मांडीची त्वचा काढून त्या जखमेवर रोपण केले होते. त्वचारोपण म्हणजे त्वचेचा पापुद्रा काढून छातीवरील जखमेवर नुसता चिकटवणे. हळूहळू जखम झालेल्या भागातून रक्तवाहिन्या वर ठेवलेल्या त्वचेमध्ये वाढतात आणि त्वचा छातीला चिकटते. हे होईपर्यंत छातीची फार हालचाल झाली तर वरच्या वर ठेवलेल्या त्वचेची साल निसटते. याउलट अजिबात हालचाल झाली नाही तर रक्ताभिसरण हळूहळू होते आणि जखम भरून येण्यास वेळ लागतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कमलाबाईंना परिस्थिती समजावून दिली आणि योग्य तो व्यवसाय सुचवण्यास सांगितले. कमलाबाईंच्या ‘टीम’ने विविध व्यवसाय करून पाहिले. प्रत्येक व्यवसाय करताना छातीवर हात ठेवून छातीच्या हालचालींचा अंदाज घेतला. शेवटी, क्रोशाच्या विणकामाची निवड झाली. क्रोशाच्या विणकामामुळे हाताच्या बोटांना सर्वात अधिक व्यायाम होतो. परंतु त्या बरोबर छातीच्या स्नायूंचेही सूक्ष्मसे आकुंचन-प्रसरण होते. त्या रुग्णाला क्रोशाचे विणकाम शिकवले गेले. त्याला मन रमवण्याचे सृजनशील साधन मिळाले आणि त्याच्या शरीराला मर्यादित व्यायाम झाला. त्यामुळे त्याची जखम वेगाने भरून आली. त्याला नुसतेच शून्यात बघत पडून राहण्यापेक्षा एक व्यवसाय व त्यातून आर्थिक प्राप्ती मिळाल्याने त्याचे मनोबल वाढले.

डॉ. के.के. दाते व कमलाबाई या दोघांनी मिळून एक संशोधन प्रकल्प हाती घेतला. त्यातील एक मुद्दा होता हृद् रोग्याचे व्यवसायोपचाराच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पुनर्वसन कसे करता येईल हा ! त्या अनुषंगाने केलेल्या संशोधनातून उपयुक्त माहिती जमा झाली. मात्र हृद् रोगांचे प्रमाण प्रचंड वाढले असले तरी दाते आणि कमलाबाई यांनी विकसित केलेला, टप्प्याटप्प्याने जाणारा पुनर्वसनाचा कार्यक्रम राबवला जात नाही.

कमलाबाईंनी व्यवसायोपचाराचा उपयोग आणखी एका अपारंपरिक क्षेत्रात केला, तो म्हणजे तुरुंगामध्ये. अनेक कैदी तुरुंगात त्यांच्या ‘केस’चा निकाल लागण्यासाठी थांबलेले असतात. तर इतर अनेक गुन्हेगार म्हणून शिक्षा झालेले असतात. ते सारे कैदी एकत्र ठेवलेले असतात. त्यांच्या हाताशी वेळच वेळ असतो आणि हाताला व डोक्याला काही काम नसते. कमलाबाईंनी कैद्यांना विविध व्यवसाय देऊन त्यांना गुंतवून ठेवण्याची कल्पना मांडली. शिवाय, कैद्यांना तुरुंगातून सुटल्यावर करण्यासाठी व्यवसायांचे प्रशिक्षणही त्या निमित्ताने मिळत होते. ही कल्पना काही अधिकाऱ्यांनी स्वीकारली, तर काहींनी नाकारली.

कमलाबाई प्रखर बुद्धिमान, अत्यंत स्वाभिमानी व स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. त्या कोणामुळे भारावून जाऊन त्या कोणाच्या भक्त बनल्या असे कधी झाले नाही. कमलाबाई गांधीजींच्या साबरमती आश्रमात राहूनही (1930) गांधीजींच्या शिष्या बनल्या नाहीत. कमलाबाईंच्या पूर्वजांचा अमेरिकन स्वातंत्र्यलढ्यात व समतेच्या लढ्यात सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्यांना काही विशिष्ट विचारांचा वारसा लाभला होता. त्या अमेरिकेत असतानाही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्यांच्या संपर्कात होत्या. कमलाबाई महत्त्वाकांक्षी होत्या. पण त्यांची महत्त्वाकांक्षा लोकांसाठी, देशासाठी होती- स्वत:ला नाव, पैसा, मानमरातब मिळावा म्हणून नव्हे. कमलाबाई व विष्णुपंत यांचे त्यांच्या समाजकार्यामुळे व औद्योगिक क्षेत्रातील कामामुळे बऱ्याच बड्या व्यक्तींशी संबंध व ओळखी होत्या. परंतु त्यांचा उपयोग त्या दोघांनीही कधी त्यांच्या वैयक्तिक उन्नतीसाठी केला नाही.

कमलाबाईंना प्रचंड लोकसंपर्क, प्रवास, निरीक्षण, अभ्यास व वाचन यांतून नवनवीन कार्यक्षेत्रे मिळत गेली. पुढे काय समस्या आहे आणि तिच्या निरसनासाठी काय करावे लागेल हे लक्षात येणे या क्षमतेची एक देणगी जणू कमलाबाईंना होती ! त्यांनी विजापूरच्या दुष्काळापासून अपंगांच्या परावलंबी आयुष्यापर्यंत प्रत्येक समस्येला चिरस्थायी पूर्तता देण्याचा प्रयत्न केला. त्या रुग्ण व्यक्तीला मदत करून पंगू किंवा परावलंबी बनवण्याच्या पूर्ण विरुद्ध होत्या. त्यांना ‘दया’ या शब्दाचीच चीड येई. त्यांची धडपड अपंगांना अपंगत्वावर मात करण्यास शिकवून त्यांना स्वावलंबी व मानाचे नवे जीवन देण्यासाठी होती.

डॉ.मंजिरी निंबकर 9822040586 manjunimbkar@gmail.com

—————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here