रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पाण्याची शेती

0
176

‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ एक प्राचीन संकल्पना आहे. ती पाषाणयुगापासून अस्तित्वात असावी. पावसाचे पाणी गोळा करणे आणि ते विविध भांड्यांमध्ये साठवणे, या केवळ दोन कृतींचा त्यात समावेश आहे. भूपृष्ठजलाशी (Surface Water) निगडित अशी ती संकल्पना आहे. भूपृष्ठजलाला बाष्पीभवन, वाहून येणारा मातीचा गाळ, दूषितीकरण, अल्पायुष्य अशा अनेक अंगभूत मर्यादा आहेत.

पावसाच्या पाण्याचे संधारण (Conservation Of Rainwater) ही संकल्पना रेनवॉटर हार्वेस्टिंग साधनांना पुन्हा बळकटी मिळावी या उद्देशाने राबवली जात आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी जलदगतीने वाढेल अशी साधने निर्माण करणे आणि त्यांचा प्रभावीपणे अवलंब करणे हे जलसंधारण योजनांचे उद्दिष्ट असण्यास हवे. रेनवॉटर हार्वेस्टिंगमध्ये पावसाच्या पाण्याची केवळ साठवणूक होते तर जलसंधारणात पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवून, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. पाण्याची वृद्धी आणि समृद्धी ही भूपृष्ठावरील पाण्याच्या साठ्यापेक्षा भूगर्भातील पाण्याशी निगडित असते.

जलसंधारणाचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न पुढील मार्गांनी केला जातो : पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव, लघु पाटबंधारे तलाव, साठवण बंधारे, कोल्हापुरी बंधारे, माजी मालगुजारी तलाव, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, वळवणीचे बंधारे, धरणे, कालवे, चर, खड्डे… त्या साठी दरवर्षी प्रचंड खर्चदेखील केला जातो. तरीही पाण्याचे दुर्भीक्ष्य दिवसेंदिवस वाढत जात आहे. जमिनीचे वाढते वाळवंटीकरण, नष्ट होणारी जंगले आणि नाश पावणारे पर्यावरण या व्याधी पाहता राज्याच्या जलसंधारण प्रयत्नांना यश आलेले नाही हे स्पष्टपणे दिसते.

सध्याच्या जलसंधारण पद्धतींमध्ये पुढील दोष प्रामुख्याने दिसून येतात : आत्यंतिक खर्चिक व श्रमाभिमुख (Labour Oriented), समूहशक्तीची गरज, उभारणीचा आणि देखभालीचा पुनरावर्ती (Recurring) मोठा खर्च, परावलंबित्व, अभ्यासाअभावी जमिनीच्या मर्यादेपुढे शरणागती, मोठ्या पावसापुढे न टिकणे. अशा प्रकारचे इतरही काही दोष संभवतात. जलसंधारणाची मूळ संकल्पना समजून घेण्यात राज्य यंत्रणा व माणसे कमी पडली आहेत. विविध प्रकारचे तलाव, बंधारे, धरणे, कालवे इत्यादी कालबाह्य झालेली आणि नजीकच्या भविष्यात पूर्णपणे निरुपयोगी ठरणारी साधने अजूनही आंधळेपणाने वापरली जात आहेत. ते थांबवून, बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीला अनुकूल अशा नवीन व्यवस्थेचा आणि साधनांचा शोध घेतला गेला पाहिजे.

पाण्याची शेती

जलसंधारणाच्या एकूण कार्यपद्धतींमध्ये पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याची प्रक्रिया ही अंतर्भूत असण्यास हवी. पण तिचा अभ्यास हेच मोठे अपयश आहे ! सध्या जलसंधारणाची साधने आणि पद्धती यांमध्ये पाणी जमिनीमध्ये जिरण्याची संथगती ही नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे. त्या सर्व मर्यादांचा विचार करून मी ‘पावसाची शेती’ ही संकल्पना विकसित केली आहे. मी गेली अनेक वर्षे ‘पागोळी वाचवा अभियान’ या अंतर्गत तिचा प्रसार करत आहे. निसर्गाच्या ‘जमीन पाणी धारण क्षमतेचा नियम (Rule of water absorption capacity of land) आणि ‘जमिनीमध्ये पाणी जिरण्याच्या वेगाचा नियम (Rule of water percolation)’ या दोन नियमांना छेद देणारी किंवा त्यावर मात करणारी ‘पावसाची शेती’ ही पद्धत किंवा व्यवस्था निसर्गाच्याच ‘गुरुत्वाकर्षणाचा नियम’ (Law of universal gravitation) आणि ‘पाण्याच्या समपातळीचा नियम (Rule of water level)’ या साध्या-सोप्या निसर्गनियमांवर आधारित आहे. ती पद्धत साधीसोपी, अल्पखर्चिक, स्वावलंबी, प्रत्येक व्यक्तीने तिच्या स्वतःच्या आयुष्यात एकदा करण्याची आहे.

जमिनीच्या पोटात वेगाने जाणाऱ्या पाण्याला पृष्ठभागावर येऊन इतरत्र वाहण्यास प्रतिबंध केला तर ते कोंडले जाऊन गुरुत्वाकर्षणाने जमिनीच्या वर-वर येणाऱ्या पाण्याचा प्रवास वेगाने भूगर्भातील पाण्याच्या पातळीच्या दिशेने सुरू होतो. ‘पावसाची शेती’ या संकल्पनेच्या, पद्धतीच्या किंवा व्यवस्थेच्या मूळाशी गुरुत्वाकर्षणाच्या आणि पाण्याच्या समपातळीच्या नियमांचे तत्त्व आहे. पावसाची शेती कशी करावी? तर त्यासाठी एक घनमीटर म्हणजे एक मीटर (लांबी) × एक मीटर (रुंदी) × एक मीटर (खोली) आकाराचा, आतून पूर्णपणे मोकळा असलेला खड्डा खणावा. खड्डा जितका खोल खणता येईल तितका खणावा. केवळ जमिनीच्या वर चहुबाजूंच्या सीमेवर एक फूट उंचीचे वीट बांधकाम करावे आणि त्यात घराच्या किंवा इमारतीच्या छपरावरील पाणी उंचीवरून वेगाने पडेल अशी व्यवस्था करावी. त्याच प्रकारे पर्वत, डोंगर, टेकड्या आणि जमिनीचे पृष्ठभाग यांवर पडणारे आणि एरवी वाहून जाणारे पावसाचे पाणी गोळा करून किंवा दिशादर्शित करून एक घनमीटर खड्ड्यात वेगाने सोडण्याची व्यवस्था करावी. तीच पाण्याची शेती होय.

‘पावसाच्या पाण्याची शेती (Rainwater Farming)’ हे तंत्र प्रभावी असून त्यामध्ये भूगर्भातील पाण्याचे साठे वेगाने वाढण्याबरोबरच, पाणीटंचाई संपणे, जमिनीमधील ओलावा कायमस्वरूपी वाढणे, जमिनीमधील जीवसृष्टी पुनरुज्जीवित होणे, वाळवंटीकरणाकडे झुकलेल्या जमिनी पुनरुज्जीवित होणे, गावातील नद्या, नाले गाळमुक्त होऊन बारमाही वाहण्यास सुरुवात होणे, पुनर्जीवित झालेल्या जमिनीमध्ये झाडे-झुडपे आणि जंगले यांची आपोआप निर्मिती सुरू होणे, जमिनीचे तापमान कमी होणे, जमिनींची (मातीची) धूप थांबणे, धरणे-तलाव इत्यादींची ताकद वाढणे, पीकपद्धतीवर हुकूमत मिळणे, अवकाळी पावसापासूनच्या पीक नुकसानीवर नियंत्रण मिळणे, दुष्काळ आणि अवर्षण या दोन्हींपासून संरक्षण मिळणे, महापुरासारख्या गोष्टींवर नियंत्रण मिळणे, पाणी या विषयासाठी नियमितपणे होणाऱ्या वाढत्या खर्चाला आळा बसणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भविष्यात पाण्यासाठी होऊ पाहणारा मानवी संघर्ष टळणे आणि मानवी भविष्य सुरक्षित होणे अशा प्रकारचे अनेक फायदे लपलेले आहेत.

सुनिल प्रसादे  8554883272 pagoli.dapoli@gmail.com

———————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here