डॉ. एकनाथ गोळे – कोकणविकासाचा ध्यास !

0
517

डॉ. एकनाथ मधुसूदन गोळे हे मुंबईच्या दादरचे की दापोली तालुक्यातील हर्णेचे असा प्रश्न पडावा इतके ते या दोन्ही गावांशी एकरूप झालेले होते. त्यांनी रेडिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस मुंबईत केली, परंतु त्यांनी हर्णे-दापोलीच्या विकासाचा ध्यास आयुष्यभर घेतला. तसे अनेक उपक्रम त्यांनी त्या तालुक्यात केले.

त्यांचे बालपण गावात गेले. प्राथमिक शिक्षण हर्णे येथे, पुढील शिक्षण दापोलीत व कॉलेजचे शिक्षण पुणे येथे झाले. ते वैद्यकीय शिक्षण पुण्यात घेत असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळे त्यांना त्यांची आई व पाच भावंडे यांचा सांभाळ करावा लागला. तो त्यांनी आस्थेने व जबाबदारीने केला. त्यांनी एक्स रे चा दवाखाना मुंबईत ऑपेरा हाऊस येथे 1953 साली थाटला. त्यांनी त्यांच्या आयुष्याला थोडी स्थिरता आल्यावर साठच्या दशकात गावी हर्णे-दापोली पट्ट्यात फेऱ्या मारून जनहिताच्या कामाला सुरुवात केली- त्यांनी स्वत:ची वैद्यकीय प्रॅक्टिस, घरातील भावंडांची जबाबदारी असे सर्व सांभाळून लोकसेवेचे व्रत घेतले. ते गावातील एस एस सी झालेल्या तरुण मुलांना मुंबईला आणून त्यांच्या राहण्याची-खाण्याची सोय करत. त्यांना एक्स रे काढण्याचे किंवा असेच कोणत्या तरी कौशल्याचे शिक्षण देत. त्यांनी अशा दोनशे तरी तरुणांना शिक्षण देऊन वेगवेगळी हॉस्पिटल व दवाखाने येथे कामाला लावले. ते म्हणत, “माझ्या कठीण काळात मला खूप चांगली माणसं भेटली, त्यांनी मला मदत केली, म्हणून मी आज इथं आहे, मी माझ्या पुढील लोकांना थोडासा हात देऊन त्यांचं ऋण फेडत आहे.”

कोकणात माणूस पडला- त्याचे हाड मोडले, की त्याला अँब्युलन्समध्ये घालून मुंबईत आणले जाई. ते मोठे दिव्य असे. त्याच्याबरोबर येणारे नातेवाईक व इतर या सगळ्यांचे राहणे-खाणे, शिवाय तपासण्या व इतर खर्च खूप येत असे. म्हणून गोळे यांनी दापोली एस.टी. स्डँजवळ डॉ. काणे यांच्या घरात एक्स रे मशीन बसवले. काणे व एक टेक्निशियन असे दोघे पेशंटचा एक्स रे काढून- तो धुऊन, ती प्लेट मुंबईला एस.टी.ने पाठवत. गोळे लगेच त्याचा रिपोर्ट पाठवत. जर काही गंभीर इजा असेल तरच पेशंटला मुंबईला बोलावत. एस.टी.चे वाहक व चालक या कामी मदत करत. स्वत: डॉक्टर गोळे पंधरा दिवसांनी दापोलीला जाऊन विशेष तपासण्या करत असत. डॉ. काणे एक्स रे क्लिनिक दापोली-हर्णे येथे चालवतात. ते रुग्णांना कमी पैशांत उत्तम सेवा देतात.

दापोलीजवळ गव्हे नावाचे गाव आहे. तेथे घरांच्या छपरांसाठी लागणारी कौले तयार करण्याचा कारखाना डॉक्टरांनी काढला. तोपर्यंत कौले मंगलोरहून येत. कोकणातील लोक कामासाठी मुंबईत येत असत, त्यांना रोजगाराच्या संधी कोकणातच उपलब्ध झाल्या, तर त्या लोकांचे लोंढे शहरात येणे थांबेल हा गोळे यांचा विचार. त्यांनी तेथे नाना उद्योग सुरू व्हावेत म्हणून चालना दिली. त्या कामी, त्यांना त्यांचे मामा श्रीकृष्ण खाडिलकर व धाकटे बंधू इंजिनीयर विजय गोळे या दोघांनी मदत केली. ते मुंबई सोडून गव्हे गावी राहण्यास गेले. त्यांनी लोखंडी नांगर व बैलगाडीची लोखंडी चाके यांची निर्मिती केली (त्यांनी बनवलेले बैलगाडीचे चाक मुंबईमध्ये राणीच्या बागेत (जिजामाता उद्यान) ठेवलेले आहे).

त्यांनी दापोलीत डोळ्यांच्या शस्त्रक्रियांचे पहिले शिबिर दादरच्या गोखले या नेत्रतज्ज्ञांच्या सहकार्याने 1960 साली घेतले. तो तशा शस्त्रक्रियांचा आरंभकाळ होता. त्यांनी सिट्रोनेला गवत गावी लावले- ते सुगंधी असते. त्याचे तेल काढून साबणात वापरतात. भाकड म्हशी पाळणे, उत्तम प्रतीच्या सिंगापुरी नारळाची, जायफळ व मिरी यांची लागवड व त्यांचे उत्पादन, मधमाशा पालन असे अनेक उद्योग त्यांच्या भागातील लोकांना उपलब्ध करून दिले. त्यासाठी स्वत:चा वेळ व पैसा खर्च केला. परंतु त्यांना या गोष्टींत म्हणावे तसे यश मिळाले नाही. कारण ते काळाच्या पुढील विचार करत होते ! ते म्हणत, “मी चांगल्या उद्देशाने आंब्याचे कलम लावले आहे. पुढील पिढीतील मंडळी त्याची फळे खातील. आपण आपले काहीही मागे न ठेवता बाजूला व्हावं.” त्यांचा विचार असा उदात्त असे.

त्यांनी धन्वंतरी रुग्णालय (दादर) ब्राह्मण सहाय्यक संघाच्या मदतीने 1967 साली सुरू केले. त्यांनी विविध कार्यक्रमांतून निधी गोळा केला. गोखले, टिळक, साने, इरावती घाणेकर-भिडे असे मान्यवर डॉक्टर ‘धन्वंतरी’शी जोडले गेले. त्यांनी त्याच बरोबर ‘पुअर फंड’ – गरिबांसाठी निधी ही योजना संस्थेचे ज्येष्ठ सभासद अनंतराव परांजपे यांनी दिलेल्या देणगीबरोबर इतर अनेक छोट्या देणग्या एकत्र करून राबवली. त्या योजनेतून गरीब रुग्णांना अत्यावश्यक तपासण्या विनामूल्य करून मिळू लागल्या. घारपुरे कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीमुळे त्या योजनेला पुढे त्यांचे नाव दिले गेले. डॉ. गोळे हे स्वत: आजारी असताना त्याच हॉस्पिटलमध्ये जात. ते म्हणत, “मी स्वत: जर माझ्या हॉस्पिटलवर विश्वास दाखवला नाही तर इतर लोक त्यावर विश्वास कसा ठेवतील?” डॉ. एकनाथ गोळे यांनी शेवटचा श्वास 11 जून 2011 रोजी त्याच हॉस्पिटमध्ये सोडला.

डॉ. गोळे यांच्या पत्नी सुधा यांचा सामाजिक-सांस्कृतिक कार्यात सहभाग असे. त्या हिंदू कॉलनीमधील दादर भगिनी समाजाच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी होत्या.

प्रतिभा गोळे 9821346747, आशा गोखले 9821465828

सुरेश चव्हाण 9867492406  sureshkchavan@gmail.com

—————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here