वागदरी येथील सूर्यनारायण मंदिर (Wagdari’s SuryaNarayan Temple)

 

वैशिष्ट्यपूर्ण सूर्यनारायण देवालय हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या वागदरी येथे पाहण्यास मिळते. ते वास्तवात आहे शिवमंदिर, पण उगवत्या सूर्याची किरणे मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडत असल्यामुळे मंदिराचे सूर्यनारायण असे नाव पडले आहे. ते मंदिर वागदरीचे ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिराच्या खूप आधीपासून आहे. मंदिरात पुरातन शिवलिंग असून भलामोठा नंदी आहे. ते मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याची नोंद नाही. नेमके कोणी, कधी व कसे बांधले त्याबद्दलही माहिती मिळत नाही. मंदिराची रचना व बांधकाम संपूर्ण काळ्या दगडामधून केलेले आहे. मंदिरात एकाच दगडातून बनवलेले कोरीव खांब आहेत. त्यावरील शिलालेख मोडी लिपीत आहेत. मंदिरात स्तंभांवर विविध देवी-देवतांची कोरीव चित्रे, शिलालेख दिसतात. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरे यांचा देवळाच्या बांधकामावर प्रभाव दिसतो.

 

महादेवाची पिंड

वागदरी हे गाव वसले नव्हते तेव्हापासूनचे ते मंदिर आहे असे सांगतात. वाघाची दरी ते वाघदरी असे ते गाव वसत गेले. सूर्यनारायण देवालय गावात पूर्वेला, बाहेरच्या बाजूला आहे. त्याच्या आजुबाजूला जंगम यांची व स्वामी यांची घरे होती. ती मंडळी मंदिराची देखभाल करत असत. त्यांतील एक माडरय्या हिरेमठ.

 

         

 

वागदरी येथील जाणकार घाळय्या मठपती यांनी 1980 च्या दरम्यान मंदिरातील स्तंभ व शिलालेख यांचे अभ्यास व वाचन करण्यासाठी एका जाणकाराला बोलावून आढावा घेतला. अक्कलकोट संस्थानचे राजा (नरेश) वागदरी परिसरात शिकारीसाठी आल्यानंतर या सूर्यनारायण मंदिरात देवाचे दर्शन घेऊन शिकारीसाठी पुढे जात असे जुनी मंडळी सांगतात. वागदरी गाव मंदिरामागे कालांतराने वसले. गाव वाढल्यामुळे मंदिर गावाच्या मध्यभागी आले आहे. वागदरी येथील प्रसिद्ध पंचागकर्ते सूर्यकांत स्वामी यांचे नाव त्याच मंदिरावरून ठेवले गेले आहे.

 

          वागदरीयेथील जंगम स्वामी मठपती परिवाराची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. त्यांचा परिवार एकशेऐंशी वर्षांपासून मंदिराची देखभाल करत आहे. त्यांचे पूर्वजही तेच कार्य आधीच्या काळापासून करत होते. दगडी बांधकामामुळे इतक्या वर्षांतही पावसाळ्यात मंदिरात वगैरे गळती लागलेली नाही. सूर्यनारायण मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा विचार असून मूळ मंदिराला धक्का न लावता मंदिराची डागडुजी करणे व पुन्हा मंदिरातील कोरीव शिलालेखांचे वाचन करणे व त्याचे जतन करणे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
धोंडप्पा मलकप्पा नंदे 9850619724

 

लेखक परिचय – धोंडप्पा मलकप्पा नंदे हे वागदरी येथे राहतात. त्यांनी मराठी विषयात बीए केले आहे. त्यांना लेखन, फोटोग्राफीचा छंद आहे. त्यांनी विविध विषयांवर लेखन दैनिके, साप्ताहिके व दिवाळी अंक यांतून केले आहे. त्यांचे सहा हजार लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना ग्रामीण संस्कृतीबद्दल विशेष आवड आहे.
———————————————————————————————————-

7 COMMENTS

  1. लेख आवडला. दुरुस्ती करायची झाल्यास आर्किऑलॉजिकल सर्वेचि मदत घ्यावी परस्पर करू नये  ही  विनंती 

  2. खूपच छान माहिती मिळाली पण जेथे तुम्ही भेट देतात त्या ठिकाणाला गुगल मॅप वर पिन करून ठेवलं तर इतरांना शोधण्यासाठी सोप्प होईल