मुंबईत पहिली आगगाडी

0
13
_MumbaitPahili_Aaggadi_1.jpg

भारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून पऴाली ती 16 एप्रिल 1853 रोजी, मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात भारतातील पहिली रेल्वे 22 डिसेंबर 1851 रोजी रुडकी येथे धावली. ती बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आली. मुंबई ते कोलकाता हा सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर लांबीचा लोहमार्ग 1870 मध्ये तयार झाला. भारतात लोहमार्गाचे जाळे सध्या अंदाजे त्रेसष्ट हजार किलोमीटरचे आहे. देशात एकूण सुमारे आठ हजार रेल्वे स्थानके आहेत.

युरोपात आगगाडी धावली ती 1830 मध्ये. नंतर चौदा वर्षांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव मांडला व पाठपुरावा केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणू लागले. ब्रिटिशांनी त्यांचा ठराव मान्यही केला. नाना शंकरशेट यांनी त्यांच्या वाड्य़ातील जागाही रेल्वेच्या पहिल्या कचेरीसाठी देऊ केली.

गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खासगी व्यावसायिकांना रेल्वे सुरू करण्यासाठी 1844 मध्ये परवानगी दिली. त्यानुसार दोन कंपन्यांची स्थापना करण्यात आली. गोऱ्यांचा हा ‘चाक्या म्हसोबा’ हिंदुस्थानातील पहिल्यावहिल्या रेल्वे प्रवासाला बोरिबंदर स्थानकातून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी निघाला तो ठाण्याच्या दिशेने. गाडी साहिब, सिंध आणि सुलतान या इंजिनांनी खेचत नेली. गाडीला तोफांची सलामी देण्यात आली. मुंबई ते ठाणे हे चौतीस किलोमीटर अंतर कापण्यास गाडीने एक तास बारा मिनिटे घेतली. लोकांनी गाडीला चाक्या म्हसोबा असे नावही दिले.

गाडीत पंचवीस व्हीआयपी प्रवासी होते. त्यामध्ये नाना शंकरशेठ स्वत:ही होते. रेल्वे सुरू करण्यात नानांचे योगदान मोठे होते. त्याबद्दल त्यांना पहिल्या वर्गाचा ‘सोन्याचा पास’ देण्यात आला होता.

महाराष्ट्रात रेल्वेची सातशे स्थानके आहेत. त्यांपैकी शंभर स्थानके मुंबई आणि उपनगरांतच आहेत. रेल्वेच्या एकूण उत्पन्नापैकी चाळीस टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.

रेल्वेसदृश्य वाहतुकीचे पहिले पुरावे जुन्या ग्रीसमध्ये सापडतात. नॅरोगेज रेल्वे युरोपातील कोळसा खाणींमध्ये सोळाव्या शतकात वापरात होत्या. त्यांचे रुळ लाकडी असायचे. युरोपात प्रवासी रेल्वे रुळावर आली ती 1830 साली. ती रेल्वे वाफेच्या इंजिनावर पळत असे. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या आरंभी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला गेला. जगातील पहिली आगगाडी इंग्लंडमधील मँचेस्टर ते लिव्हरपूल दरम्यान धावली. रेल्वेसाठी वापरण्यात आलेल्या रुळांमधील अंतर नंतर जगभर मापदंड म्हणून वापरले गेले आहे.

– नितेश शिंदे