माझी लेखन उमेदवारी – नरहर कुरुंदकर (Narhar Kurundkar’s Effort of His First Writing)

माझे प्रकाशनासाठी पाठवलेले पहिले साहित्य म्हणजे एक कविता होती. मी वयाच्या दहाव्या वर्षी मराठी पाचव्या इयत्तेत शिकत होतो. त्या वयात प्रेमकविता लिहिण्याचे काहीच कारण नव्हते, पण लिहिली. मला तिच्यातील कल्पना आठवते. त्या कवितेत प्रेयसीचे डोळे हिरव्या चाफ्याप्रमाणे आहेत अशी नोंद होती. माझे मामा नांदापूरकर हे मराठीचे हैदराबादमध्ये प्राध्यापक होते. ते नवनवीन कल्पनाविलासाचे उल्हासाने स्वागत करत. त्यामुळे कल्पना नवीन असली पाहिजे हा माझाही आग्रह होता. मामा मराठी कविता विद्यार्थ्यांना शिकवत ती आधुनिक मराठी कविता आहे. ते केशवसुत, बालकवी इत्यादींची चर्चा करताना जुन्या मराठी कवितेपेक्षा आधुनिक मराठी कविता निराळी कशी आहे ते सांगत. नवीन कल्पनाविलास हा त्या विवेचनाचा भाग आहे हे मला त्यावेळी नीटसे कळलेच नव्हते. एक मुद्दा लक्षात आला होता, तो म्हणजे कल्पनाविलास नवा हवा. ज्याला मामा आधुनिक मराठी कविता म्हणतात ती त्यांच्या जन्मापूर्वी पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आहे हेही त्यावेळी मला कळले नव्हते. खांडेकर यांची हिरवा चाफा ही कादंबरी नुकतीच वाचलेली होती. ते एका फुलाचे नाव असून त्या फुलाचा वास मोठा मादक असतो इतके मला माहीत होते. मामांना त्यांच्या भाच्याचे कौतुक फार होते. कारण मी वाचन खूप करत असे. मी मामांना विचारले, स्त्रीच्या डोळ्यांना कल्पना कोणत्या देतात?’ मामा म्हणाले, कमळ ही उपमा देतात, हरीण-शावकाचे डोळे, मासोळी अशा उपमा देतात.मी म्हटले, कमळ ही उपमा देतात, मग शेवंती, गुलाब का नको?’ मामांना मी काय विचारत आहे हे बहुधा त्या क्षणी लक्षात आले नाही म्हणा, त्यांना थट्टेची लहर आली म्हणा; ते म्हणाले, हरकत काहीच नाही. ती नवी कल्पना ठरेल.आणि मी मनाशी पक्का निर्णय घेतला, की कवितेतील माझ्या प्रेयसीचे डोळे हिरव्या चाफ्यासारखे आहेत.

अनुभव नसताना कोणाचे तरी अनुकरण करून काही लिहिणे हा हौशी नवोदित लेखकाचा उद्योग असतो. माझे वय दहा वर्षांचे असले तरी मी हौशी व उदयेच्छु लेखकच होतो. मी यमके जुळवत मोठ्या प्रयत्नाने कविता केली आणि वसंत मासिकाला पाठवली. माझी कविता या अंकात येईल- त्या अंकात येईल म्हणून मी वाट पाहत राहिलो. मी माझे गुपित जतन मोठ्या दृढतेने केलेले होते. मी तीन महिन्यांनंतर मात्र रडकुंडीला आलो. मग दमादमाने मामांना सारे सांगितले. मामा मला आचार्य म्हणत. ते म्हणाले, आचार्य, थोडे दमाने घ्या. परतीचे पोस्टेज होते का कवितेस ते सांगा? पत्ता बरोबर होता का? ते सांगा.मला त्या विषयात अजून खूप शिकणे आहे याची जाणीव झाली. नाकारले गेलेले ते माझे पहिले साहित्य. ती कविता होती.

मी मासिकांना काही ना काही तेथून पुढे अकरा वर्षे मधुनमधून पाठवतच होतो. मला ते सगळेच लिखाण रद्दी होते असे वाटत नाही. पण फार चांगले असे त्यात काही नव्हते. ते क्वचित बऱ्यापैकी, क्वचित सुमार, पण प्राय: रद्दी असेच लिखाण होते. कविता, कथा, ललित निबंध, ग्रंथपरीक्षण, वैचारिक लिखाण असे विविध प्रकार त्या लिखाणात होते. त्यांपैकी एकही लेख, कविता कधी प्रकाशित झाली नाही. दु:खात सुख असेल तर ते हे आहे, की ज्यांनी माझे लिखाण नाकारले ती फार नामवंत नियतकालिके होती. मी सर्वसामान्यांना लिखाण पाठवत नव्हतो. नामवंत माझे लिखाण छापत नव्हते. ती तपश्चर्या अकरा वर्षे चालली होती.

अनेकदा, मी साभार परतीच्या वाळवंटातून फार दीर्घ प्रवास केलेला आहे, हे माझ्या मित्रांच्या व विद्यार्थ्यांच्या लक्षातच येत नाही. मी वयाची पंचविशी गाठण्यापूर्वीच माझे मुंबई मराठी साहित्य संघात भाषण झाले, सत्यकथेत लेख आले, पुण्याला व्याख्यान झाले, साहित्य संमेलनातून मी परिसंवादाचा वक्ता होतो आणि हे घडले तेव्हा मी पदवीधर नव्हतो, प्राध्यापकही नव्हतो. मी मराठवाड्यातील लेखकांच्यामध्ये अल्पवयातच प्रतिष्ठा मिळालेला लेखक. तेव्हा मलाही साभार परतीचे धक्के वर्षानुवर्षे खावे लागले असतील हे कोणाच्या ध्यानीमनी नसते. अठराव्या-विसाव्या वर्षी लेखनारंभ करणारी मंडळी बाविसाव्या वर्षी त्यांचे लिखाण कोणी छापत नाही म्हणून संतापतात-वैतागतात. तेव्हा मी त्यांना अकरा वर्षांची माझी पायपीट समजावून सांगतो, त्यांचे दु:ख दूर करण्याचा तोच एक मार्ग मला उपलब्ध असतो.

माझ्या जीवनात अति उत्साहावर पाणी ओतणारे गुरूजन मला लाभले, हे मी माझे भाग्य समजतो. पराभवाने नाउमेद न होणारे आणि विनयाने बेताल न होणारे मन संपूर्णपणे मला मिळालेले नाही. ती दशा स्थितप्रज्ञाची म्हणायची. पण काही प्रमाणात ते मन मजजवळ आहे, ही कृपा गुरुजनांची. माझा पहिला लेख प्रकाशित झाला डिसेंबर 1953 मध्ये. ते एक ग्रंथपरीक्षण होते. माझे एक गुरू न.शं. पोहनेरकर यांनी विरलेल्या गाराया नावाचे व्यक्तिचित्रांचे पुस्तक लिहिले होते. नांदापूरकर हे प्रतिष्ठान या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्राचे संपादक होते. गुरुवर्य भालचंद्र महाराज कहाळेकर यांनी विरलेल्या गाराया पुस्तकावर परीक्षण लिहिण्यास सांगितले. ते मी लिहिले. कहाळेकर यांनी ते तपासून दिले. त्यानंतर प्रतिष्ठानमध्ये नांदापूरकर यांनी ते छापले. लेखकाला लेख छापला गेलेला पाहण्यात एक आनंद असतो. नवीन लेखकांना तर तो आनंद फार असतो. आनंद मलाही खूप झाला. पण कहाळेकर म्हणाले, लेख छापून आला, बरे झाले, वाचणार कोण?” जे जे छापले जाते ते ते वाचले जातेच असे नाही. माझी भावना माझा लेख अनेकांना वाचण्याजोगा वाटला पाहिजे. जर कोणी वाचणारच नसेल तर मग लेख मामांच्या मासिकात छापला जातो याचे महत्त्व तरी किती? कहाळेकर यांनी असे आनंदावर पाणी ओतले! आज असे वाटते, की तसा उतारा नव्या लेखकांना फार आवश्यक असतो. प्रसिद्धीची नशा फार लवकर चढते. ती लेखकाचा नाश करते.

त्यानंतर फार आनंददायक असे प्रसंग पुढील दोन वर्षांत आले. त्यांतील प्रमुख दोन प्रसंगांचा ठसा माझ्या मनावर पंचवीस वर्षे अबाधित आहे. कदाचित तो ठसा जन्मभर राहील. मी डिसेंबर 1953 नंतरही लिहित होतोच. एक लेख सप्टेंबर 1954ला लिहिला आणि तो मराठवाडा दिवाळी अंकात दिला. तो लेख शरदश्चंद्र यांच्या कादंबऱ्यांविषयी आहे. तो लेख 1954 सालच्या मराठवाडा दिवाळी अंकात छापला गेला आहे. मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव माझे मामा नव्हते, तसे नातेवाईकही नव्हते. पण माझे कौतुक करणारे आप्तच होते. शिवाय, ते कहाळेकर यांचे मित्र.

आपली माणसे कौतुक करणारच. येथे दर्ज्याचा प्रश्नच काय?’ असे कहाळेकर म्हणणार याची मला खात्री होती. मी नोव्हेंबर 1954 अखेर एक लेख लिहिला आणि तो नवभारतमासिकाला पाठवला. त्यावेळी नवभारतचे संपादक आचार्य शं.द. जावडेकर होते. जावडेकर यांचे पत्र मला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आले. त्यांनी लिहिले होते, तुमचे नाव कोठे वाचलेले स्मरत नाही. अनुमान असे, की तुम्ही तरुण नवोदित लेखक आहात. नवोदित लेखकाला त्याच्या साहित्याचे काय झाले याचा उत्साह फार असतो म्हणून तातडीने कळवत आहे. लेख स्वीकारलेला आहे, यथावकाश प्रसिद्ध होईल.नवोदितांची इतकी चिंता वाहणारे फार दुर्मीळ! जावडेकर यांच्या पत्राने मला फार आनंद झाला. नवभारतचे संपादक म्हणजे मामा नव्हेत की चाहते नव्हेत. शिवाय, ते मराठवाड्यातील मासिकही नव्हे. नवभारतमासिक माझा लेख छापते हे तरी गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानाल की नाही? हा प्रश्न कहाळेकर यांना विचारायचे मी ठरवत होतो. त्यावेळी मी वडिलांकडे वसमतला आणि कहाळेकर हैदराबादला.

त्या काळी मौज साप्ताहिकाला साहित्याच्या दरबारी प्रतिष्ठा फार होती. मौजहे वेगवेगळ्या दिवाळी अंकांमधून आलेल्या लिखाणाचा आढावा घेत असे. जावडेकर यांचे पत्र आले आणि दोन दिवसांनी मौजचा अंक आला. मौजच्या परीक्षणकाराने माझ्या शरदबाबूंवरील लेखाची मनसोक्तपणाने स्तुती करून तो दिवाळी अंकामधील एक अतिशय चांगला लेख म्हणून वाखाणला. पाठोपाठ, मित्रांची अभिनंदने सुरू झाली. सु.शं. कुलकर्णी यांचे अति भलावण करणारे एक पत्र आले. कारण ते प्रिय मित्र.

भेट झाल्यावर कहाळेकर म्हणाले, आपण लिहितो ते छापण्याजोगे, वाचण्याजोगे आहे असे लोक मानू लागले इतकाच या घटनांचा सौम्य अर्थ आहे. कोणी मोकळेपणाने कौतुक करू लागला तर तो त्या माणसाचा मोठेपणा. तो आपण मानावा. स्तुती खरी मानू नये.पण कहाळेकर काहीही म्हणाले तरी मला चढायचे ते बेतालपण चढले होतेच. कहाळेकर स्वत: सुखावले होते. मी फार बेताल होऊ नये यासाठी जपत होते, हे मलाही कळले. या घटना डिसेंबर 1954 मध्ये घडल्या. तेव्हा माझे तेविसावे वर्ष चालू होते. म्हणजे मी अपक्वच होतो. पण मला पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई ही ठिकाणे आपली उपेक्षा करतात, आपल्यावर अन्याय करतात असे पुढील जीवनात कधीही जाणवले नाही. त्याचे कारण आरंभापासून झालेले माझे कौतुक हेच असणार असे मला वाटते. गैरसमज बळकट असावेत यासाठी कारण लागत नाही. वातावरण पुरते. वातावरण असूनही गैरसमज नसावेत याला मात्र कारण लागते असा याचा अर्थ घेता येईल.

(राम देशपांडे यांच्या संग्रहातून)

———————————————————————————————-——————————————————–

About Post Author

Previous articleपंधरावे साहित्य संमेलन (Fifteenth Marathi Literary Meet – 1929)
Next articleसीडी देशमुखांचा मराठी बाणा (Spontaneous Lyrical Response by Finance Minister C.D. Deshmukh)
राम देशपांडे यांना चालता बोलता ज्ञानकोश असे म्हटले जाते. त्यांच्याकडे साहित्यिकांची, मान्यवर व्यक्तींची हस्ताक्षरे, हस्तलिखिते; तसेच, मान्यवर व्यक्तींच्या आवाजांचा, विविध विषयांवरील ग्रंथ- तसेच, त्यांवरील कात्रणे, जुनी मासिके-पुस्तके यांचा संग्रह आहे. संदर्भ हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यानी साहित्य, संगीत, कला, प्रसारमाध्यम, विज्ञान, आरोग्य, व्यक्ती या विषयांवरील कात्रणे गोळा केली आहेत. त्यांच्या संदर्भसाधनांचा उपयोग अनेक जिज्ञासू, अभ्यासक, प्राध्यापक, संस्था यांनाही होतो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here