निराधार वृद्धांचे डॉक्टर मायबाप

_niradhar_vruddhanche_dr_maybaap_2_0.jpg

पुण्यात वयाची सत्तरी ओलांडलेल्या एका आजोबांची दृष्टी पूर्ण गेली होती. ते भीक मागून अथवा रस्त्यावर कोणी फेकलेले उचलून खायचे. एके रात्री, अंधारात कोणाची तरी गाडी त्यांच्या पायावरून गेली. आजोबांची हालचालच थांबून गेली! लघवी, विष्ठा झाली, की तेथेच अंदाजाने जरा बाजूला सरकायचे. चारही बाजूंनी घाण. रस्त्यावर पडलेले चाचपून खाताना चुकून काही वेळेस त्यांच्या हाती त्यांचीच विष्ठा येई! त्यांची उतारवयातील ती दुर्गती. पण ती दुर्गती लवकरच संपली. पुण्यातील अभिजित आणि मनीषा सोनवणे या डॉक्टर दाम्पत्याने वैद्यकीय सेवाशुश्रूषा करून त्यांना बरे तर केलेच; पण त्या आजोबांची रवानगी एका वृद्धाश्रमात केली. सोनवणे दाम्पत्याच्या प्रयत्नाने आजोबांना तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा एकदा छप्पर मिळाले. सोनवणे दाम्पत्य मागील तीन वर्षांपासून नियमितपणे रस्त्यावरील अनाथ भिकारी आजी-आजोबांचे मायबाप बनून सेवा करत आहेत. तोच त्यांचा ध्यास बनून गेला आहे.

भीक मागत फिरणारे आयुष्याच्या उतारवयातील आजी-आजोबा रस्त्यावर कोठेकोठे दिसतात. कधी जोडीने किंवा कधी एकेकटे. ती म्हातारी मंडळी त्यांचे म्हातारपण कोणाच्या तरी शिळ्यापाक्या अन्नावर किंवा किरकोळ पैशांच्या भिकेवर कंठत असतात- रस्त्यावर. फूटपाथवरील त्या जगण्यात त्यांना कधी कुत्री, उंदीर, घुशी चावतात, तर कधी त्यांचे अपघात होतात. उतारवयामुळे कधी डोळ्यांची दृष्टी अधू होते तर कधी मोतिबिंदू होऊन डोळे पूर्ण जातात. जेथे मुळात अन्नपाण्याचीच सोय नाही तेथे जखमांच्या दुरूस्तीसाठी पैसा कोठून आणणार? अभिजित आणि मनीषा सोनवणे हे दाम्पत्य तशा आजीआजोबांसाठीच काम करते. ती दोघे नुसत्या जखमांची मलमपट्टी करणे किंवा निराधार वृद्धांना वैद्यकीय सेवा देणे एवढ्यावर थांबत नाहीत तर ते त्या आजीआजोबांच्या माथी लागलेला भिकारी हा कलंक मिटवण्यासही मदत करू पाहतात.

सोनवणे दाम्पत्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळून त्रेचाळीस आजी-आजोबांनी भीक मागण्याचे सोडून पोटापुरते अन्न मिळेल असे बैठे आणि त्यांना झेपेल असे काम सुरू केले आहे. सोनवणे यांनी वर्षभरात तशा एकशेबावन्न आजी-आजोबांना त्यांचे मोतिबिंदूचे ऑपरेशन करून दृष्टी मिळवून दिली आहे, तर अंध-अपंग असणाऱ्या दहा वृद्धांची वृद्धाश्रमात रवानगी केली आहे. त्या दहाही जणांचा वृद्धाश्रमातील खर्च  सोनावणे पतीपत्नी त्यांच्या ‘सोशल हेल्थ अॅन्ड मेडिसीन(सोहम) ट्रस्ट’द्वारे करतात. ते स्वत:ला ‘डॉक्टर्स फॉर बेगर्स’ असे अभिमानाने म्हणवून घेतात.

_niradhar_vruddhanche_dr_maybaap_4.jpgभिकारी म्हाताऱ्यांना रस्त्यावरच सेवा देण्याचा विचार डॉ. अभिजित यांच्या मनात आला. त्या मागे पार्श्वभूमी आहे. तो विचार त्यांच्या मनात उद्भवण्याचे मूळ त्यांच्या उमेदीच्या काळातील नैराश्यात आहे. अभिजित हे मुळचे सातारा जिल्ह्याच्या म्हसवड गावातील. त्यांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले. ते पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावी प्रॅक्टिस करण्यासाठी गेले. तेव्हा तेथे दवाखाना उभा करण्याइतपत त्यांची ऐपत नव्हती. त्यामुळे ते वैद्यकीय सेवा देण्यासाठी घरोघरी जात. परंतु ते  नुकतेच डॉक्टर झालेले असल्याने आणि घरी येऊन तपासत असल्याने गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांना तशा परिस्थित नैराश्याने ग्रासले. त्या स्थितीत त्यांच्या मदतीला ज्यांना त्यांच्या मुलांनी हाकलून दिले आहे असे एक म्हातारे दाम्पत्य आले.

अभिजित सांगतात, ते आजोबा त्या परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत; मलाही तसा विचार करण्यास सुचवत. म्हणत – ‘पैसा कमवण्याआधी चांगला माणूस होण्याचा प्रयत्न कर. स्वत:साठी सगळेच जगतात, मात्र जागरणापासून ते जागृतीपर्यंतचा प्रवास एखादाच करतो, ते काम तू कर’. त्यांचे ते सांगणे मनाच्या सांदिकोपऱ्यात कोठेतरी साठले गेले. पुढे मग, मी पुण्यातील काही संस्थांच्या मदतीने काम करू लागलो. एका आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थेत रूजू झालो. तेथे पंधरा वर्षें काम केले. आयुष्यात स्थिरावलो पण आजोबांनी सांगितलेला महत्त्वाचा विचार डोक्यातच राहून गेला होता. मी जेव्हा त्यांना ‘तुम्ही मला आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन केले आहेत, त्याची परतफेड कशी करू’ असे विचारले तेव्हा ते म्हणाले होते, ‘मी तुला मदत केली असे वाटत असेल तर तू तशीच मदत दुसऱ्या कोणाला तरी कर’. पण माझ्याकडून ते राहून गेले होते आणि मग मी 2015 मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन रस्त्यावरील भिक्षेकरी म्हाताऱ्यांसाठी पूर्णवेळ काम करण्याचे ठरवले.

_niradhar_vruddhanche_dr_maybaap_3.jpgअभिजित यांनी नोकरी सोडली तेव्हा त्यांचा पगार लाखांत होता. घरची आर्थिक जबाबदारी घेण्यासाठी मनीषा पुढे आल्या आणि ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ हा उपक्रम सुरू झाला. ते डॉक्टर दाम्पत्य सध्या केवळ पुणे शहरात काम करत आहे. त्यांनी त्यांच्या कामाची आखणी देव-देवींच्या वाराप्रमाणे केली आहे. कारण त्या-त्या वारी त्या-त्या देवाच्या मंदिरापाशी भाविक जास्त जमा होत असतात. भीक मागणाऱ्या म्हाताऱ्यांची तेथे गर्दी असते. सोनवणे मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा अशा धार्मिक स्थळांबाहेर असणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत या वेळांत रस्त्यावरच मोफत उपचार करतात. मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक ते उपचार करतात. गंभीर आजारी वृद्धाला सरकारी अथवा खाजगी रूग्णालयात दाखल करून उपचार मिळवून देतात. त्यांना केवळ उपचार न करता भीक मागणे सोडून देण्यासाठी प्रोत्साहन देण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. डॉक्टर दाम्पत्य त्यांना बैठा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारे सुरुवातीचे भांडवलही मिळवून देतात. रूमालांची विक्री, सणांनुसार फुले, रांगोळ्या, परड्या, वाण-सामानाची विक्री, आवळाकॅण्डी तयार करणे, पॅकिंग अशी कामे दिली जातात. हात वा पाय नसणाऱ्यांसाठी वजनकाटा दिला जातो, मात्र त्यांना भीकेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

मनीषा यांनी दिवाळीच्या काळात उटणे बनवून त्याचे पॅकिंग करण्यासाठी चार महिलांना दिले. सुरुवातीला पाचशे पॅक बनवण्याचे ठरले, मात्र तो उपक्रम निराधार म्हाताऱ्यांना मदत करण्यासाठी आहे असे कळल्यावर मागणी वाढली आणि त्याचा फायदा म्हाताऱ्या आजींना झाल्याचे अभिजित यांनी सांगितले. ते दाम्पत्य स्वत:च्या कमाईतून वैद्यकीय सेवा आणि भांडवल पुरवतात. काही डॉक्टर मित्र त्यांना शस्त्रक्रिया व औषधे यांमध्ये सवलत देतात, तर काही वेळा, समाजाकडून त्यांना मदत मिळते. वृद्धांची भीक मागण्यातून सुटका झाली, तरीही त्यांच्याकडे निवारा नसल्याने, त्यांना रस्त्यावरच राहवे लागते. तशा वृद्धांसाठी एखादा निवारा बांधता यावा यासाठी अभिजित जागेच्या शोधात आहेत. ते त्यांचे कुटुंब रस्त्यावर न राहता एखाद्या छताखाली यावे यासाठी सध्या प्रयत्नशील आहेत.

– हिनाकौसर खान-पिंजार, greenheena@gmail.com

About Post Author

Previous articleझोत पुस्तकाची चाळिशी : शिळ्या कढीला ऊत!
Next articleसंवेदनांचा शुद्ध अनुभव – कोबाल्ट ब्लू
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या 'डायमंड प्रकाशना'मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत 'तीन तलाक विरूद्ध पाच महिला' हे पुस्तक 'साधना'कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना 'बुकशेल्फ' नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 98503 08200

3 COMMENTS

  1. डाॅक्टरांच्य् कार्याला सलाम
    डाॅक्टरांच्य् कार्याला सलाम

  2. शब्दाच्या पलिकडिल व्यक्तिमत्व
    शब्दाच्या पलिकडिल व्यक्तिमत्व

Comments are closed.