ना.ग. गोरे – राजकारणी व साहित्यप्रेमी

0
189

समाजवादी नेते ना.ग. तथा नानासाहेब गोरे यांच्या जीवनात कर्मयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि कलात्मकता यांचा विलोभनीय संगम दिसतो. त्यांनी तो संगम सार्वजनिक जीवनात वावरताना साधला होता. त्यांनी धर्मश्रद्धेच्या कुबडीशिवायही माणूस चारित्र्यसंपन्न आणि सद्भावनापूर्ण जीवन जगू शकतो हा विश्वास आयुष्यभर जोपासला. त्यांच्या भाषणात, लेखनात, संवादात विचारांचे धागे बांधेसूदपणे अन् कलात्मकतेने विणलेले आढळतात. त्यात बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्धता आणि विवेकाचे भान यांचा अनुभव येतो. कोकणी माणसाची जन्मजात खोचक उपरोधशैली आणि नर्मविनोद करण्याची क्षमता यांमुळे त्यांच्या विचारांना सौंदर्याची झळाळी लाभत असे. नानासाहेबांचे व्यक्तिमत्त्व कलासक्त, चिंतनशील व सदासंपन्न असे होते. त्यांचे जीवन मात्र संघर्षमय होते.

त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील (नंतर सिंधुदुर्ग) हिंदळे (देवगड) येथे 15 जून 1907 रोजी झाला. ते प्राथमिक शिक्षणानंतर पुण्यात आले. त्यांचे सहाध्यायी एस.एम. जोशी, र.के. खाडिलकर, वि.म. तारकुंडे हे होते. ते सारे रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकले. ते व एस.एम. सार्वजनिक जीवनात लोकमान्य टिळक यांच्या स्वदेशी चळवळीमुळे ओढले गेले, ते कायमसाठी. ते लोकमान्यांच्या राजकारणाने प्रभावित झाले खरे; पण त्यांना आगरकर यांच्या सुधारणावादाने समाजकारणात आकर्षित केले. ते पर्वतीवरील मंदिरप्रवेश सत्याग्रहात सहभागी झाले. त्यांनी सत्याग्रहात कारावास 1930 व 32 मध्ये असा दोन वेळा भोगला. त्यांचा राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेत 1940 मध्ये महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या जीवनात 1942 ते 46 हा कालखंड सर्वात कसोटीचा होता. त्यांना एका भाषणाबद्दल निजामाने 1940 मध्ये तुरुंगात डांबले होते. तेथून ते 1943 मध्ये सुटताच इंग्रज पोलिसांची नजर चुकवून थेट भूमिगत चळवळीत सहभागी झाले. नानासाहेब हे साने गुरुजी, हरिभाऊ लिमये यांच्याबरोबर मुंबईला ‘मूषक महाला’त पकडले गेले. त्यांचा तो कारावास 1946 साली संपला. म्हणजे ते घरी पाच वर्षांहून अधिक काळानंतर पोचले. त्यांचा विश्वास लोकमान्यांचा लढाऊ वारसा महात्मा गांधीच पुढे नेतील यावर होता; पण ते गांधीवादी किंवा सर्वोदयी झाले नाहीत.

ते देश स्वतंत्र झाल्यानंतरही संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन व्हावीत म्हणून लढले. त्यानंतर त्यांनी गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त व्हावा यासाठी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्या वेळीही त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नानासाहेबांमध्ये जात्या बंडखोर वृत्ती होती. त्यांचे आईवडिलांवर प्रेम होते. वडील परंपरावादी; पण नानासाहेबांनी ब्राह्मण्यदर्शक जानव्याचा त्याग एका क्षणी केला. त्यांनी सुमतीबार्इंशी पुनर्विवाह करून त्यांची सामाजिक सुधारणेची जिद्द दाखवून दिली. सुमतीबार्इ विवाहानंतर लगेच विधवा झाल्या होत्या.

रशियन राज्यक्रांतीनंतरच्या काळात, युवकांना मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचे आकर्षण वाटत होते, तसे ते नानासाहेबांनाही वाटले; पण त्यांना इतिहासाचे अध्ययन अन् अनुभवांचे परिशीलन केल्यावर मार्क्सवादाची अपूर्णता जाणवली. नानासाहेबांच्या लक्षात मार्क्स-लेनिनचा सिद्धांत भारतात लागू पडणार नाही हे आले होते. ते इंग्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहत असताना, नानासाहेबांनी कम्युनिझममधील नवप्रवाहांचे शास्त्रीय विश्लेषण ‘तमसेच्या तीरावरून’ या पुस्तकामध्ये केले आहे. त्यावरून नानासाहेब मार्क्सवादाकडे विश्लेषकाच्या दृष्टीने कसे पाहत होते हे लक्षात येईल. त्यांना गांधीजींच्या विचारात भारतातील परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे हेही त्याच काळात उमगले होते. त्यांना गांधी तत्त्वज्ञानातील मानवता, सहिष्णुता, संघर्षशीलता, रचनात्मकता यांचे महत्त्व वाटत होते; पण त्यांना गांधीजींच्या कर्मकांडाची मात्र चीड होती. त्यांना गांधीजींचा यंत्रविरोध पटत नव्हता.

नानासाहेबांचा स्वभाव चिंतनशील, रसिक, सुसंस्कृत होता. त्यांना पंडित नेहरू यांच्या रसिक-सुसंस्कृत राजकारणाचे आकर्षण होते. त्यांनी पंडितजींच्या आत्मचरित्राचे उत्तम भाषांतर केले आहे. त्यांच्या बोलण्यात, लिहिण्यात भावनांचा कल्लोळ नसे; शब्दांचीही उधळण नसे. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. त्यांनी त्यांच्या अभ्यासाची चुणूक ‘ताओ ते चिंग’ या छोटेखानी पुस्तकात भारतीय तत्त्वज्ञानाची चिनी तत्त्वज्ञानाशी तुलना करत दाखवली आहे. ते विज्ञानवादी आगरकर व रसेल यांच्या विचारांच्या प्रभावामुळे बनले होते. त्यांना विज्ञान हे विश्वाचे कोडे उलगडण्याची किल्ली नव्हे, ते विनाशकारीही बनू शकते याची जाणीव होती. त्यांना विज्ञान वाढेल तसे जीवनातील काव्य ओसरेल हे अमान्य होते. काव्यात करुणेला महत्त्व आहे आणि करुणा ही जीवनात रसवत्ता आणते हे त्यांना पक्के ठाऊक होते. नानासाहेब हे अज्ञेयवादी होते. त्यांना धर्माची कुबडी अमान्य होती; पण त्यांना निर्मिकवादी महात्मा ज्योतिबा फुले व धर्म ही संकल्पना स्वीकारणारे बाबासाहेब आंबेडकर या दोघांविषयी आदर होता. त्या दोघांच्या विचारांत काही विसंगती नाही, कारण ते दोघेही सामाजिक समानतेचे कट्टर पुरस्कर्ते होते असे त्यांचे मत होते. नानासाहेब यांच्याकडे सार्वजनिक जीवनात राहूनही, न.चिं. केळकर यांच्याप्रमाणे साहित्य-कला-संस्कृती यांची जाण होती. नानासाहेबांमध्ये एक सुंदर निर्मितिक्षम कलावंत होता. ते उत्तम नखचित्रे काढत, रंगीत चित्रेही काढत. त्यांचे ग्रंथवाचन, ग्रंथलेखन राजकीय रणधुमाळीत कधी बाजूला पडले नाही. मी त्यांच्या लेखनशैलीचे आणि सामाजिक अध्ययनाचे मनोरम असे चित्र प्रथम ‘डाली’त आस्वादले. त्यांनी ‘मेघदूत’चा मराठी काव्यमय अनुवाद केला आहे.

नानासाहेबांनी ‘पुण्यातील पाऊस’ हा सुरेख ललित लेख लिहिला आहे. “कुठेही उगवणारी भोळीखुळी गुलबक्षी ! तिला बिचारीला काटणी नको, छाटणी नको; एक पाऊस आला की पुरे ! तेवढा लाभला की तिला वैकुंठ मिळाले – मला गुलबक्षी म्हणजे मीरेची प्रतिमा वाटते. ती गिरिधरप्रेमी, तर ही जलधरप्रेमी; पण मीरेसारखीच प्रेमवेडी, तिच्या सारखीच सौम्य, तिच्या सारखीच नाजूक व केवळ मारवाडीत बनणाऱ्या साडीलाही मागे सारील अशा, छटेदार फुलांची वसने नेसणारी.”

त्यांचा ‘वस्ती नंबर अकरा’ हा लेख झोपडपट्टीचे विदारक चित्र रेखाटणारा मराठीतील पहिला असावा. ते झोपडपट्टीला स्वत:ची भाषा नसल्याने विचारही नाही हे तर सूचित करतातच; पण समाजाची व्यवहारभाषा व विद्वानांची विचारभाषा यांत अंतर असल्याने ओढवणारा अनर्थही स्पष्ट करतात. त्यांनी युसुफ मेहर अली, भाऊ तेंडुलकर व साने गुरुजी या तीन मोठ्या व्यक्तींचा स्पष्ट उल्लेख न करता ‘आठवण’, ‘उसासा’ व ‘स्वप्नभाषण’ या तीन लेखांमध्ये मानवी जीवनाचे तीन नमुने उभे केले आहेत. ते अप्रतिम असे तीन लेख स्वच्छ व भावपूर्ण स्मरण करणारे आहेत.

नानासाहेबांच्या भाषाशैलीला अभिजात साहित्याच्या व्यासंगाचा आणि सर्वसामान्यांच्या व्यवहारभाषेचा स्पर्श होता. त्यामुळेच त्यांची भाषा अलंकारांचा सोस नसलेली, नैसर्गिक मनोहारित्व असलेली होती. ती भाषा साने गुरुजींच्या आत्महत्येनंतर ‘मार्गावरचे काटे दूर करता करता तुमचे हात रक्तबंबाळ झाले; पण काटे सरत ना आणि तुमच्याने थांबणे होईना’ अशी व्याकूळ झाली. आईच्या हातासारख्या त्या खरखरीत व मऊ हातांनी माझा हात पुन्हा एक वेळ तरी दाबला जावा; ही आर्त मागणी ती करू लागली. त्यांनी ‘कारागृहाच्या भिंती’ हे गुलबर्ग्याच्या तुरुंगात असताना लिहिलेले पुस्तक म्हणजे बाह्य निरीक्षण आणि आत्मचिंतन यांचा अनोखा संगम आहे. त्यांनी ‘सीतेचे पोहे’, ‘करवंदी’, ‘गुलबक्षी’, ‘शंख आणि शिंपले’, ‘काही पाने, काही फुले’ असे दर्जेदार ललित साहित्य निर्माण केले. त्यांच्या मार्मिक समजदारीने विलोभनीय झालेल्या साहित्यात ‘कोंबडा’, ‘बेडूकवाडी’ आणि ‘चिऊताई घर बांधतात’ या बालवाङ्मयाचाही समावेश आहे. नानासाहेब स्पष्टवक्ते होते, पण ते औचित्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. त्या दृष्टीने त्यांनी पंडित नेहरू व लेडी माऊंटबॅटन यांच्या प्रेम प्रकरणाची केलेली उकल पाहवी. मी ‘पिट्सबर्गची डायरी’ वाचल्यानंतर त्यांच्याशी त्यांच्या साहित्यासंबंधी काही बोलत होतो. ते शांतपणे उठले आणि त्यांनी त्यांच्या त्या नीटनेटक्या लावलेल्या खणातून एक कागद माझ्या हाती ठेवला. त्यांचे साहित्यप्रेम व राजकारणातील असणे याचे ते उत्तर होते. त्यावर लिहिले होते – “सौंदर्याचा मी खराखुरा उपासक आहे; पण केवळ शाब्दिक सौंदर्य पुरेसे नाही. असुंदराचा तिटकारा मला आहे. ते मला शोषण, विषमता या रूपाने आसपास वावरताना दिसले. ते शाब्दिक सौंदर्योपासनेने नाहीसे होत नाही. राजकारण ते असुंदर नाहीसे करू शकेल. मी सौंदर्यपूजक असल्यानेच लोकशाही समाजवादाचा पाईक आहे आणि त्यामुळेच राजकारणातही आहे.”

कामगार चळवळीचे व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते असलेले नानासाहेब यांचे निधन कामगार दिन व महाराष्ट्र दिन असलेल्या 1 मे (1993) रोजी व्हावे हा वेगळाच योगायोग म्हणता येईल !

नारायण गणेश गोरे
जन्म 15 जून 1907 निधन 1 मे 1993

ललित लेखन

  1. डाली, 2. सीतेचे पोहे, 3. गुलबक्षी, 4. करवंदे, 5. काही पाने काही फुले, 6. शंख आणि शिंपले, 7. कारागृहाच्या भिंती, 8. नारायणीय, 9. पिट्सबर्ग डायरी

  वैचारिक

  1. साम्राज्यशाही, 2. विश्वकुटुंबवाद, 3. ऐरणीवरील प्रश्न, 4. अमेरिकेच्या संघराज्याचा इतिहास, 5. आव्हान आणि आवाहन, 6. चिनारांच्या छायेत, 7. पारख, 8. ताओ ते चिंग (लाओत्सुच्या पुस्तकावर आधारित)

अनुवाद

गांधीजींचे विविध दर्शन (डॉ. राधाकृष्णन्), 2. आत्मकथा (आत्मचरित्र – पंडित जवाहरलाल नेहरू), 3. मेघदूत (पद्यानुवाद – कालिदास), 4. समाजवादच का? (जयप्रकाश नारायण), 5. द्विखंड हिंदुस्थान (डॉ. राजेंद्रप्रसाद), 6. आपला हिंदुस्थान (मिनू मसानी)

बालसाहित्य
1. बेडूकवाडी, 2. चिऊताई घर बांधतात, 3. कोंबडा, 4. पंडित जवाहरलाल नेहरू

प्रौढ साक्षरांसाठी – मुरारीचे साळगाव

(‘सकाळ’वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

संतोष शेणई 9881099016 santshenai@gmail.com

————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here