नवाश्मयुग (Navashmayug)

0
538

 

मानवी जीवनातील उत्क्रांतीच्या टप्प्यातील पाषाणयुगाचा कालखंड हा सर्वात मोठा कालखंड आहे.  पाषाणयुगाची विभागणी केली असता पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन टप्पे पडतात. नवाश्मयुग हा अश्मयुगाचा उत्तरार्ध होय. 
           पशुपालन, शेती, कुंभाराच्या चाकाचा शोध, अग्नीचा वापर ही नवाश्मयुगाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. नवाश्मयुगामध्ये मानवाला शेती व पशुपालनाची कला अवगत झाली. प्राणी विविध कामाकरता उपयुक्त ठरु लागले. जसे – कुत्रा शिकारीबरोबर घराची राखण करणे, संरक्षणासाठी त्याचा उपयोग करुन घेणे. मानवी शक्तीऐवजी प्राण्यांचा वापर करून शेती करता येऊ शकते ही कल्पना मानवास सुचली. सुरुवातीला शिकार करण्यासाठी प्राण्यांच्या वापराबरोबर पशुपालन आणि शेती यामुळे त्याच्या जीवनात स्थिरता आली. तोपशुपालनामुळे हळूहळू अन्नधान्याचा उत्पादक बनला. दीर्घकाळ पुरेल इतके अन्न शेतीतून मिळू लागल्याने त्याची भटकंती कायम थांबली. शिवाय त्याला शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे कुटुंब करून एका ठिकाणी राहणे भाग पडले. तो निवारे बांधून समुहाने एकत्र राहू लागला. अशाप्रकारे मानवी वस्त्या उदयास येऊन स्थिरावल्या. नवाश्मयुगातील शेती हा मानवी जीवनाच्या विकासाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा होय. त्याच काळात मानवाचा झपाट्याने विकास झाला. तो कुटुंब करून राहू लागल्याने वस्त्या विकसित होऊन गावे निर्माण झाली. 
           पूर्वापार  चालत आलेली बलुतेदारीची बीजे नवाश्मयुगात रोवली गेली असावीत. कारण त्याकाळात शेती व्यवसाय विकसित होऊन प्रगत होत गेला. माणूस समुहाने वस्ती करून राहू लागल्याने त्याच्या गरजा वाढल्या. दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाला काही कौशल्ये आत्मसात करून घ्यावी लागली. विविध कौशल्यांवर आधारित निरनिराळ्या व्यवसायांची निर्मिती झाली. कालांतराने तशीच कामे त्यांच्यावर सोपवली गेली. जसे, की मातीची भांडी, रांजण, मडकी ह्या दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू तयार करणारे कारागीर, शेतीच्या कामात येणारी अवजारे नांगर, वखर, खुरपे, विळे, कोयते तयार करणे, दुरुस्ती करणे या आणि इतर अनेक कामांसाठी गरजेनुसार वस्तू तयार करणारे कारागीर उदयास आले. ते त्यांचा पारंपरिक व्यवसाय करु लागले. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे सहज ते व्यवसाय हस्तांतरित होऊन कुशलता वाढली. अशा कारागीरांना त्यांच्या कामाचा मोबदला धान्याच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात दिला जाई. तेथूनच खऱ्या अर्थाने वस्तुविनिमयपद्धत रूढ झाली आणि पुढे बलुतेदारी बहरू लागली. बलुतेदारी हा शब्दप्रयोग अलिकडच्या काळातला असला तरी त्याची बीजे नवाश्मयुगातील काळात सापडतात. 
– राजेंद्र घोटकर 9527507576 ghotkarrajendra@gmail.com
—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here