सावंतवाडीतील लाकडी रंग-रेषा व बाजारपेठ (Wooden Toys of Sawantwadi – Worldwide Market)

0
341

सावंतवाडीची लाकडी खेळणी ही किमया तेथील संस्थानाची, तो सुमारे चारशे वर्षांचा इतिहास आहे. सावंतवाडी गाव लाकडी खेळणी, रंगकाम, गंजिफा इत्यादींसाठी प्रसिद्ध झाला. लाकडी भाज्या आणि फळे यांतील जिवंतपणा हे या खेळण्यांचे वैशिष्ट्य. राजाश्रय व लोकाश्रय यांमुळे ती कला वैभवाच्या शिखरावर पोचली…

सावंतवाडीमधील चितारआळी ही लाकडी खेळण्यांची जगप्रसिद्ध बाजारपेठ आहे. चितारआळी हे लाकडी खेळण्यांचे भारतातीलही मुख्य मार्केट मानले जाते. तेथील बाजारात पंधरा रुपयांपासून ते अगदी पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या लाकडी वस्तू मिळतात. चितारआळी ही सावंतवाडी बस डेपो, मोती तलाव आणि राजवाडा या तिन्ही ठिकाणांपासून चालत फक्त दहा मिनिटे अंतरावर आहे. सावंतवाडी हे गाव परंपरेनेच लाकडी खेळणी, रंगकाम, गंजिफा इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. हुबेहूब दिसणाऱ्या लाकडी भाज्या आणि लाकडी फळे हे तेथील खेळण्यांचे वैशिष्ट्य. चितारआळीच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे लाकडी खुळखुळे, लाकडी गाड्या, लाकडाचे अनेक डिझाइन्सचे भोवरे, लाकडाच्या बॅटस् अशी खेळणी मिळतात… बैलगाड्या, शोभेची घरे; तसेच, शोभेची फळे, स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, मुलींसाठी बांगड्या अशा फक्त लाकडापासून तयार केलेल्या वस्तू तेथे मिळतात. तेथे सुंदर कुंड्याही मिळतात. त्या कुंड्या फोल्डही होतात.

चितारी कुटुंबांची बारा-पंधरा घरे चितारआळीत आहेत. त्यांची मुलेही सहसा त्याच व्यवसायात येतात. चितारी हे मूळ कर्नाटक राज्यातील. त्यांनी हस्तकला व्यवसायासाठी सावंतवाडीत वास्तव्य केले. ते मूळचे राजस्थानी जिनगर घराण्यातील कलाकार. ते तेथे शिल्पकलेत निपुण होते. चितारी कुटुंबीयांचे खेळण्यांचे कारखाने चितारआळीपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर आहेत. अनेक कलाकारांना तेथे काम मिळते.

लाकडी वस्तूंचा वापर पूर्वीच्या काळी दैनंदिन जीवनात होत असे. लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलींना तशा लाकडी वस्तू भेट म्हणून देण्याची परंपरा होती. त्यामुळे त्या कलावस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होती. लाकडी ठकी बाहुल्यांना तर खूप महत्त्व होते.

सावंतवाडीची लाकडी खेळणी ही किमया तेथील संस्थानाची आहे. तो सुमारे चारशे वर्षांचा इतिहास आहे. जवळ जवळ तेव्हापासून ही कला त्या गावी जोपासली जात आहे. सावंतवाडीच्या राजे सावंत भोसले घराण्याने त्या कलाशिक्षणाला व प्रयोगांना वेळोवेळी प्रोत्साहन आणि राजाश्रय दिला आहे. त्यांच्यापैकी खेम सावंत (तृतीय) हे राजे अठराव्या शतकात होऊन गेले. ते कलाप्रेमी होते. त्यांनी विविध कलाकारांना प्रोत्साहन दिले. त्यांनी  सावंतवाडी परिसरात आढळणाऱ्या पांगारा झाडाचे लाकूड हलके आणि कोरीव काम करण्यासाठी उपयुक्त आहे हे हेरले. त्यांनी दूरदृष्टी दाखवून आंध्र आणि राजस्थान या प्रदेशांतील काष्ठ कारागिरांना उत्तेजन देऊन, सावंतवाडीत आणून वसवले. ते कारागीर लाकडी खेळणी, मुखवटे, लाकडी फळे, बाहुल्या आणि लाखेच्या बांगड्या तयार करण्यात वाकबगार झाले. त्याच प्रमाणे, त्यांचा हातखंडा इराण, टर्की या देशांत खेळल्या जाणाऱ्या ‘गंजिफा’ या पत्त्यांच्या प्रकारासाठी लाकडाच्या चितारलेल्या चकत्या तयार करण्यातही सिद्ध झाला. साठ-सत्तर कुटुंबे त्या व्यवसायावर संसार चालवत होती. त्यामुळे तो व्यवसाय सावंतवाडीत फोफावला. पिढ्यान् पिढ्यांच्या त्या कलाकुसरीने सावंतवाडीला सुंदरवाडी ठरवले आहे ! अर्थात, तेथील निसर्गही त्यासाठी कारण आहेच.

‘गंजिफा’ हा खेळ ‘दशावतारी’ या नावाने महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तो एकशेवीस पत्त्यांचा संच असतो. गंजिफात मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी अशा दहा अवतारांचे पत्ते असतात. ते कलात्मक आणि गोल आकाराचे असतात. प्रत्येक अवताराची राजा किंवा मीर (अमीर), वजीर आणि एक्का ते दस्सा अशी बारा बारा पाने असतात. गंजिफा या कलाप्रकाराच्या चित्रशाळा अठराव्या व एकोणिसाव्या शतकात सावंतवाडीत होत्या. त्यामध्ये कै.नारायण केळकर व कै.विष्णू म्हापसेकर यांच्या चित्रशाळा विशेष प्रसिद्ध होत्या. त्या चित्रशाळांतून समाजाच्या सर्व स्तरांतील कलाकारांची नेमणूक करून त्यांच्याकडून कलाकृती तयार करून घेतल्या जात. इंग्रज अधिकाऱ्यांच्या (1840चा सुमार) प्रोत्साहनामुळे सावंतवाडीतील जिनगर समाजातील कलाकार घोड्याचे खोगीर, म्यान व हत्यार यांचे पॉलिश, त्याचबरोबर गवताच्या करंड्या, पंखे, टोपल्या, टेबल लॅम्प, स्टँड इत्यादी कलावस्तू बनवू लागले. गव्याच्या शिंगांवरील नक्षीकाम, भुंग्यांच्या रंगीत पंखांचा वापर करून पडद्यावरील कलाकुसर, चांदीतून केलेल्या कलावस्तू, भांड्यांवरील नक्षीकाम, मीनाकाम व कशिदा, भेंडीच्या लाकडापासून कागदी फुले, हार, वाळ्याचे पंखे व शिवण वृक्षापासून रंगीत फळे, पोळपाट, रंगीत पाट व इतर कलावस्तू असे विविध प्रकारचे काम सावंतवाडीत होत असे.

राजेबहाद्दर खेम सावंत (तृतीय) हे गादीवर असतानाच लाखकामाची कला सावंतवाडीत आली. आंध्र व तेलंगणा प्रांतांतील काही विद्वान ब्राह्मण सावंतवाडीला सतराव्या व अठराव्या शतकामध्ये भेट देत. तो ब्रह्मवृंद धर्मशास्त्रातील चर्चेत भाग घेण्यासाठी सावंतवाडीत येत असे. त्या ब्रह्मवृंदामार्फत लाखकामाची कला सावंतवाडीत येऊन पोचली. चितारी कलावंत लाखकाम करून ‘गंजिफा’ बनवत. त्यातील गोलाकार लाकडी चकत्या, ‘ठकी’सारख्या वेगवेगळ्या आकर्षक बाहुल्या, विविध फळांच्या प्रतिकृती, अन्य खेळणी यांची निर्मिती कौशल्यपूर्ण असते. विशेषत्वाने त्यातील आकृतिबंधात्मक रंगकामाच्या बाबतीत त्या कलेची शैली सावंतवाडीत रुजली आणि विकसित झाली.

देशाचे लक्ष एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांना हटवण्याकडे व स्वातंत्र्याच्या प्रयत्नांकडे वळत गेले, त्यामुळे त्या कलेला त्या काळात अवकळा आली व ती लोप पावेल अशी भीती निर्माण झाली. तशी जवळ जवळ सत्तर-पंच्याहत्तर वर्षे गेली. सावंत घराण्यातील शिवरामराजे व राजमाता सत्त्वशीलादेवी यांचे लक्ष कलेच्या त्या दुरवस्थेकडे गेले. तो 1960 चा सुमार. त्यांनी जुन्या-जाणत्या कलाकारांचा शोध घेतला. त्यांना नव्वद वर्षे वयाचा पुंडलिक चितारी नामक वृद्ध कलाकार आढळला. तो गंजिफांचा संच करत असे. राजेसाहेब स्वत: व सत्त्वशीलादेवी दोघेही चित्रकार होते. सत्त्वशीलादेवी यांनी त्यांच्या माहेरी, बडोद्याला प्रसिद्ध चित्रकार राव यांच्याकडे चित्रकलेचे धडे गिरवले होते. सत्त्वशीलादेवी यांनी अनेक चित्रेही काढली आहेत. त्यांनी त्या वृद्ध कलाकाराकडून गंजिफा कलेचे पारंपरिक वैशिष्ट्य आत्मसात केले; समाजाच्या सर्व थरांतील लोकांना त्या कलेचे प्रशिक्षण दिले. त्यांनी ‘सावंतवाडी लॅक्सवेअर्स’ या संस्थेची स्थापना 1973 मध्ये केली व गंजिफा कलेला जगाच्या बाजारपेठेत मोलाचे स्थान प्राप्त करून दिले. राजेसाहेब व राजमाता यांनी जपान, जर्मनी या देशांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या कलावस्तूंची तेथील कलादालनांत, प्रदर्शनांत मांडणी केली. सावंतवाडीतील कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असा ‘दशावतारी गंजिफा’ त्या प्रयत्नांमधून ब्रिटिश म्युझियम (लंडन) येथे जाऊन पोचला आहे ! नंतर त्यांनी जर्मनी, जपान, अमेरिका या देशांतूनही लोकांचे लक्ष त्या कलापूर्ण खेळाकडे वेधून घेतले. ‘सावंतवाडी लॅक्सवेअर्स’ संस्थेत ‘दशावतारी गंजिफा’बरोबरच दरचित्री, सोनेरी, दशरंगी, राशी, नवग्रह, चंगकांचन, एकरंगी (आयव्हरी कलर) मूळाक्षरे इत्यादी विविध प्रकारचे आकर्षक गंजिफा संच तयार केले जातात. शिवाय, त्या कलाप्रकाराकडे विशेष लक्ष देऊन धनलक्ष्मी, संतमालिका, प्राणी, पक्षी इत्यादी गंजिफा संचही विकसित केले गेले आहेत. विविध स्वरूपातील ते संच राजवाड्यात उपलब्ध आहेत.

सावंतवाडीची लाकडी शिल्पे बनवण्याची वैशिष्ट्यपूर्ण कला त्या प्रयत्नांतूनच विकसित झाली आहे. व्यापार वाढला, पण कला लोप पावते का, अशी भीती निर्माण झाली आहे. तेव्हा कलेच्या पुनरुज्जीवनासाठी सावंतवाडी येथील पाच कलाकारांची निवड करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये हंपीजवळ किन्नाळ येथे सहा कुटुंबांमध्ये ती कला अस्तित्वात आहे. ‘किन्नाळ हस्तकले’मध्ये लाकूड, चिंचोक्यांची पूड आणि कापड यांचा एकत्रित वापर करून देवतांच्या मूर्ती व इतर वस्तू बनवल्या जातात. कर्नाटकच्या मूर्ती दिसण्यास भिन्न असल्या, तरी त्या तयार करण्याच्या तंत्रात सावंतवाडीच्या जुन्या कौशल्याशी बरेच साम्य आहे. त्याबाबत शोध घेण्यात सावंतवाडी संस्थान यांनी पुढाकार घेतला आहे.

सावंतवाडीतील गुडगुडीही प्रसिद्ध आहे. गुडगुड्यांमध्ये चिकणमातीचा वापर केला जाई. ती चिनी माती म्हणून प्रसिद्ध होती. ती सोळा पैशांला तीन गोळे या भावाने उपलब्ध होती. धार्मिक कार्यात लागणाऱ्या वस्तू सावंतवाडीत सुबकपणे तयार केल्या जात. त्यामध्ये तबके, पेले, निरांजने, पूजापाट, उदबत्ती, स्टँडची कमळे, ताम्हने, देव्हारे; त्याचप्रमाणे दौत व कलमदाने, गृहोपयोगी फर्निचर या वस्तूही असत. त्यामुळेच तशा अनेक कलावस्तूंचे माहेरघर म्हणजे सावंतवाडी असे सर्वसामान्यत: ठरून गेले आहे. राजाश्रय व लोकाश्रय यांमुळे ती कला वैभवाच्या शिखरावर पोचली. त्यातूनच सावंतवाडीचे नाव रंगीत लाकडी फळे व खेळणी यांसाठी प्रसिद्धी पावले.

सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात लाकडी खेळणी बनवण्याचा कारखाना पाहण्यास मिळतो. कलाकारांना ती पारंपरिक कला शिकण्याची आणि त्यातून स्वयंरोजगार प्राप्त करण्याची संधीही तेथे उपलब्ध आहे. शिवरामराजे भोसले स्मृती संग्रहालयात ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचे पुत्र बाळराजे, सुनबाई शुभदादेवी, नातू लखनराजे हे त्या हस्तकलेचा वारसा जोपासत आहेत. त्यांच्यामार्फत सावंतवाडी म्युझियम शानदार बनवले जात आहे.

– सतीश पाटणकर 8551810999 sypatankar@gmail.com

———————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here