Member for

1 year 1 month

रामचंद्र चिंतामण ढेरे  यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात २१ जुलै १९३० साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण गंगाधर ढेरे, आईचे नाव शारदा व पत्‍नीचे नाव इंदुबाला असे होते. त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आणि मिलिंद ढेरे नावाचा छायाचित्रकार मुलगा आहे.

रा.चिं. ढेरे आणि इंदुबाला यांचा १९५५मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांनी एकसष्ट वर्षें संसार केला. ते मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. इतिहासाचे लेखन म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे, कागदपत्रांमधील माहितीचे सत्य तपासताना समकालीन कागदपत्रातील संदर्भही ताडून पाहणे आवश्यक अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी ‘प्राच्यविद्या संशोधन केंद्रा’त अभ्यासक म्हणून काम केले. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांचा दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण एकशेपाच पुस्तके लिहिली आहेत. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रात त्यांनी खास कार्य केले असे म्हणता येते. त्यांची नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, ‘त्रिविधा’, श्रीपर्वताच्या छायेत आणि इतर पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ, अनेक विचारपूर्ण संशोधनात्मक लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. रा.चिं. ढेरे यांचे देहावसान १ जुलै २०१६ साली पुण्यात झाले, तर इंदुबाला ढेरे यांचे१७ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.