तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष यशवंत (Thirty-third Marathi Literary Meet – 1950)

तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे 1950 साली झाले. त्याचे अध्यक्ष यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ राजकवी यशवंत हे होते. कवी यशवंत यांचा हातभार आधुनिक कवितेला उज्ज्वल आणि कीर्तिवंत करण्यात फार मोठा आहे. त्यांनी कवी केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्यानंतर मराठी कविता अधिक समृद्ध केली. त्यांचा जन्म 9 मार्च 1899 रोजी सातारा जिल्ह्यातील चाफळ (तारळे) येथे झाला. यशवंत यांना फायनलनंतर पुढील शिक्षण घेता आले नाही. त्यांच्या शाळेतील शिक्षक आणि नामवंत कवी व कादंबरीकार गो.गो. मुजुमदार (साधुदास) यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. बहुदा त्यामुळे ते त्या वयात कवितेच्या प्रेमात पडले होते. त्यांनी फायनलची परीक्षा 1917 साली दिली व सरकारी शिक्षणखात्यात नोकरी धरली. त्यांचे वास्तव्य अलिबाग येथे एकवीस वर्षें 1940 पर्यंत होते. नंतर, त्यांनी पुण्यात येऊन तेथील शिक्षण खात्यात नोकरी केली. परंतु त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लवकरच त्यातून निवृत्ती घेतली.

त्यांचा जन्म चाफळचा असल्याने त्यांच्या भावविश्वात समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांना जणू अढळ स्थान होते. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या शिवजयंती उत्सवाचा त्यांच्या मनावर मोठाच संस्कार झाला होता.

‘रविकिरण मंडळा’ची स्थापना माधव ज्यूलियन, वि.द. घाटे, श्री.बा. रानडे, गिरीश यांसारख्या कवींनी केली ती 1920-21 च्या दरम्यान. त्यात कवी यशवंतही होते. मराठी कवितेच्या इतिहासात ‘रविकिरण मंडळा’ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले, ते मुख्यतः माधव ज्यूलियन आणि कवी यशवंत यांच्या भावकवितेमुळे. कवी यशवंत यांनी 1915 ते 1985 पर्यंत सतत जवळजवळ सत्तर वर्षे अखंड कविता लिहिली, सुनिते लिहिली, खंडकाव्ये लिहिली, महाकाव्ये लिहिली. त्यांची पहिली प्रेमकविता ‘मित्र प्रेमरहस्य’. त्यानंतर, त्यांनी पुण्याच्या लोकसंग्रह ह्या दैनिकातून ‘यशवंत’ ह्या टोपणनावाने काव्य लिहिले. त्यांनी ‘दासानुदास’, ‘तारकानाथ’ ह्या टोपणनावांनीसुद्धा कविता लिहिल्या आहेत. त्या कविता वाचून कवी अनंततनय भारावून गेले. ते स्वतःहून कवी यशवंत यांना भेटले. त्यांनी कवी यशवंत यांना ‘महाराष्ट्र शारदा मंदिरा’त काव्यवाचनासाठी आमंत्रित केले. ‘रविकिरण मंडळा’च्या कवींनी महाराष्ट्रभर असंख्य काव्यगायने केली आणि मराठी कविता खेड्यापाड्यांतून नेली. आधुनिक कवी ही प्रसिद्धी यशवंत यांना त्यामुळेच मिळाली. ओज आणि कल्पकता हे कवी यशवंत यांच्या प्रतिभेचे विशेष महत्त्वाचे घटक होते. ग.त्र्यं. माडखोलकर ह्यांनी यशवंत यांची कविता वाचून त्या काळी असे उद्गार काढले होते, की कवी गोविंदाग्रज यांच्यानंतर महाराष्ट्रात इतका कल्पक कवी झाला नाही.

‘यशवन्ती’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 1919 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘यशोगिरी’, ‘यशोगंध’, ‘तुटलेला तारा’, ‘यशोधन’, ‘बंदिशाळा’, ‘जयमंगला’ असे त्यांचे एकूण एकवीस कवितासंग्रह, खंडकाव्य संग्रह आणि ‘छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य प्रसिद्ध झाले. ‘कांतणीचे घर’ हा लघुनिबंध, तसेच तेरा लेखसंग्रह आणि बालवाङ्मय त्यांच्या नावावर आहेत.

त्यांच्या कवितेवर खूश होऊन बडोदे संस्थानाने कवी यशवंत यांना ‘राजकवी’ हा किताब बहाल केला, तर महाराष्ट्र सरकारने कवी यशवंत यांना ‘महाराष्ट्र कवी’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. तसेच त्यांना ‘पद्मभूषण’ हा भारत सरकारचा बहुमान 1961 साली मिळाला.

गेयता हा त्यांच्या कवितेचा विशेष होता. यशवंत ‘आई’ ह्या कवितेने मराठी वाङ्मयात अजरामर झाले आहेत. त्यांची कविता मनातील भाव-भावना, आशा-निराशा, तीव्र दुःखाच्या छटा, जीवनातील प्रखर वास्तव, अशा सगळ्या अनुभवांचे यथार्थ चित्रण करते. त्याचे उदाहरण म्हणून, ‘समर्थांच्या पायाशी’, ‘बाळपण’, ‘मांडवी’ अशा कविता सांगता येतील. स्वतःच्या आयुष्यातील प्रखर वास्तवाचे चित्रण करणारी ‘लाह्या-फुले’ ही तशीच एक कविता. ‘माझे हे जीवित, तापली कढई, मज माझेपण दिसेचिना । माझे जीवित, तापली कढई, तीत जीव होई लाही – लाही ।।’

‘प्रेमकविता’ ही त्यांची आणखी एक खासीयत. त्यांनी प्रेमाचे साफल्य आणि वैफल्य, मृत्यूवरही मात करू शकणारे प्रेमाचे चिरंजीवित्व, अशा प्रेमाच्या अनेक छटा उत्तम चित्रित केल्या आहेत. त्या संदर्भातील त्यांचे वेगळेपण असे, की प्रेमाची परिणती आत्मिक मीलनात होणे ही प्रेमाची खरी परीक्षा असते हा त्यांचा विचार आणि तो त्यांनी – तूच रमणी, प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले, एक कहाणी यांसारख्या कवितांमधून अधोरेखित केला.

संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “आयुष्य हा एक प्रवास आहे आणि फार फापटपसारा बरोबर घेऊन प्रवास करता येत नाही. त्यात पाथेय हवे असते आणि तेसुद्धा शक्य तितके सुटसुटीत, पण पौष्टिक असावे लागते. जीवितयात्रेत हा कार्यभाग कवितेने साधायचा असतो”.

त्यांचे देहावसान 26 नोव्हेंबर 1985 रोजी पुणे येथे झाले.

– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488

—————————————————————————————————