बत्तिसावे साहित्य संमेलन (Thirty-Second Marathi Literary Meet – 1949)

बत्तिसावे साहित्य संमेलन पुणे येथे 1949 साली झाले. त्याचे अध्यक्ष ‘आधुनिक भारत’कार आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर हे होते. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1894 रोजी मलकापूर येथे झाला. जावडेकर स्वतः बालपणापासून भारतीय स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय प्रेरणेशी एकरूप झालेले होते. त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले. ते 1920 च्या महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीत एम ए चा अभ्यास अर्धवट टाकून पडले. त्या वेळी भारतीय राजकारणात टिळकयुग संपून गांधीयुग सुरू झाले होते. जावडेकर यांनी स्वतःला महात्मा गांधी यांच्या विचारप्रणालीत झोकून दिले होते. ते गांधीवादाचे भाष्यकार म्हणूनच ओळखले जात.

त्यांचा ‘आधुनिक भारत’ हा ग्रंथ फार गाजला. महाराष्ट्राचे तत्त्वचिंतक आणि सोळाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वामन मल्हार जोशी यांनी ‘गीता-रहस्यानंतरचा थोर ग्रंथ’ म्हणून ‘आधुनिक भारत’चा गौरव केला होता. पेशवाईच्या अस्तापासून लोकमान्य टिळक यांच्या निधनापर्यंतच्या काळामधील महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीचा विश्लेषणात्मक आणि मूल्यमापनात्मक इतिहास हे ‘आधुनिक भारत’चे वैशिष्ट्य होते. त्या ग्रंथाचा गुजराती आणि हिंदी भाषांतही अनुवाद प्रसिद्ध झाला. त्यांनी त्यांचे वैचारिक वैभव लेखन, अध्यापन आणि वृत्तपत्रीय संपादन अशा तीन माध्यमांतून मुक्तपणे उधळले.

जावडेकर अर्थकारण व राजकारण या विषयांचे अभ्यासक होते. त्यांच्यावर टिळक आणि आगरकर यांचे संस्कार लहानपणी झाले. त्यांचा सिद्धांत भारतीय राष्ट्रवादाची प्रेरणा भारतीय जनतेच्या उद्धाराची आहे हा होता. त्यांचे ‘आधुनिक भारत’सोबतच ‘हिंदी राजकारणाचे स्वरूप’, ‘राज्यशास्त्र मीमांसा’, ‘गांधीजीवन रहस्य’, ‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी’, ‘हिंदु-मुस्लिम ऐक्य’ ह्यांसारखे सोळा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘राजनीतिशास्त्र परिचय’ ह्या पहिल्याच ग्रंथात समाजवादाविषयी विवेचन उत्तम केले होते.

ते दैनिक नवशक्ती या काँग्रेस मुखपत्राचे संपादक 1934 साली झाले नि पुढे, दोन वर्षांनी ‘लोकशक्ती’ या दैनिकाचे मुख्य संपादक झाले. आचार्यांनी त्या वर्तमानपत्रांद्वारे गांधीवादी तत्त्वज्ञानाची ओळख समर्थपणे करून दिली. त्यांचे दोनशेच्या वर महत्त्वाचे लेख प्रसिद्ध झाले. त्यांचा नवभारत मासिक आणि साधना साप्ताहिक यांच्या संपादनाशी संबंध होता. त्यांनी तीन वेळा सत्याग्रहात भाग घेऊन चार-पाच वर्षे तुरुंगवास भोगला होता. आचार्य हे ललित लेखक नव्हते तर तत्त्वज्ञ होते. त्यांचे सारे लेखन हे गंभीर प्रवृत्तीचे, आध्यात्मिक पाठबळातून निर्माण झालेले समाजवादी विचारसरणीच्या मुशीतील होते. ते तीच विचारप्रणाली शेवटपर्यंत जगले.

बत्तिसाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “ज्याला आत्मोद्धार करायचा असेल त्याने समाजोद्धार केला पाहिजे आणि ज्याला समाजोद्धार करायचा असेल त्याने आत्मोद्धार केला पाहिजे अशी जीवनाची सर्वोदयवादी सत्याग्रहनिष्ठा आहे. या निष्ठेचा अंगिकार करणारा जीवनवीर सर्वांगीण क्रांतिकारक असतो.”

आचार्य जावडेकर यांच्या नावाने इस्लामपूर, जिल्हा सांगली येथे एक निवासी शाळा आहे. आचार्य जावडेकर गुरूकुल असे त्या शाळेचे नाव असून त्यांचा मुलगा प्रकाश शंकर जावडेकर यांनी ती स्थापन केली. समाजातील गोरगरिबांना उत्तम शिक्षण मिळावे हा त्या मागील उद्देश.

त्यांचे दम्याच्या विकाराने इस्लामपूर येथे 10 डिसेंबर 1955 रोजी निधन झाले.

वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488

————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here