राम (फड) नावाचा मेळघाटातील देवदूत
कुपोषण आणि बालमृत्यू यांच्या मेळघाटातून येणाऱ्या बातम्या 1995-96 च्या सुमारास समाजमन ढवळून काढत होत्या. त्या संकटावर मात करण्यासाठी काम उभे करण्याचे पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल शिदोरे यांनी तरुणांना आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कुपोषित आदिवासींचे दुःख वाटून घेण्यासाठी काही शिक्षित तरुण मेळघाटाकडे सरसावले. रामभाऊ फड हे त्यांतील एक. रामभाऊंचे औरंगाबादला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात एम ए पर्यंतचे शिक्षण झाले होते. त्यांचा इरादा प्राध्यापक होण्याचा होता, पण त्यांची पावले कुपोषणाचे भयाण वास्तव ऐकून मेळघाटाच्या दिशेने वळली. त्या वेळी त्यांच्यासोबत गेलेल्या तरुणांपैकी काही आठ दिवसांनी, काही महिन्यांनी, तर आणखी काही वर्षभराने परतले. रामभाऊ मात्र गेली वीस वर्षें मेळघाटात किलाटी गावात जगण्याचा अर्थ शोधत आहेत!
रामभाऊ मूळचे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील कोद्री या गावचे. ते मेळघाटात आले तेव्हा, मेळघाटात कुपोषित बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण हजारांमागे एकशेवीस असे होते. आज, वीस वर्षांनंतर, ते प्रमाण चाळीसपर्यंत घसरले आहे. अर्थात, रामभाऊ फड समाधानी नाहीत... “जोपर्यंत ते प्रमाण शून्यावर येत नाही, तोपर्यंत मला ती वस्ती सोडणे शक्य नाही. पण शासनाची उदासीनता पाहता मी मरेपर्यंत तरी ते प्रमाण शून्यावर येईल असे वाटत नाही.” - रामभाऊ मनातील खंत बोलून दाखवतात.