भारत घडला, नद्या जन्मल्या!
काही नद्या जगाच्या नकाशात पटकन नजरेत भरतात. अमेझॉन, नाईल, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्या लांबीला अफाट, त्यांची पात्रे प्रचंड मोठी आणि त्यांच्यावर विसंबून राहणारे लोकही भरपूर. नाईल ही जगातील सर्वांत लांब नदी. ज्येष्ठ कथाकार जी.ए. कुलकर्णी, त्यांच्या पत्रांत माणसाचे आयुष्य कसे अनाकलनीय असते आणि त्याला अनपेक्षित दिशा कशी मिळते हे सांगताना नाईलचे उदाहरण अनेकदा देतात. व्हाईट नाईल जेथे उगम पावते, तेथून शंभरेक मैलांवर लाल समुद्र आहे. ती पुढेही वाहताना किंचित उजवीकडे वळून लाल समुद्रात जाऊ शकली असती. दक्षिणेला अरबी समुद्र आहे; तोही तसाच जवळ. पण नाईल नदी लाल समुद्र, अरबी समुद्र यांना बाजूला ठेवते आणि ब्लू नाईलला सोबत घेऊन, सहारा वाळवंट तुडवत हजारो मैल उत्तरेला जाते व अखेर, भूमध्य समुद्रात विसर्जित होते! चौफेर वाळवंट, पाण्याचा सतत तुटवडा, कमी पाऊस या सगळ्या प्रतिकूल गोष्टी असतानादेखील, नाईल अनेक नागमोडी वळणे घेत उत्तरेकडेच जाते. पाण्याचा एका दिशेने जाणारा तो अविरत प्रवाह हा अनेक अनाकलनीय नैसर्गिक प्रक्रियांवर अवलंबून असतो. नदीला जिवंत माणसाप्रमाणे असलेली ती प्रबळ उर्मी गेली कित्येक शतके माणसाला विचार करण्यास लावत आहे. तिच्या प्रत्येक कृतीमागे आणि प्रक्रियेमागे किती मोठी गुंतागुंत आहे आणि तिचा तो प्रवास किती काळ चालू आहे ते समजले तर बघता बघता, सगळ्या पृथ्वीचा इतिहास नजरेसमोर स्पष्ट होत जाईल.