कदंबमुकुल न्याय
आपल्या अस्सल देशी वृक्षांपैकी अत्यंत देखणा वृक्ष कोणता असेल, तर तो ‘कदंब’. तो सहजासहजी आढळत नाही- मात्र देशी वृक्षांचे जतन आणि संवर्धन यांचे महत्त्व गेल्या काही वर्षांत लक्षात आल्यामुळे कदंबाची लागवड जाणीवपूर्वक केली जात आहे. कदंब भारतीय संस्कृतीत घट्ट रुजला आहे. कृष्णाचे आणि कदंबाचे नाते मैत्रीचे आहे. म्हणून कदंबाला ‘हरिप्रिय’ किंवा ‘कृष्णसखा’ असे म्हणतात.
कृष्णाने गोपींचीवस्त्रे चोरून कदंब वृक्षावर ठेवली होती.
कदंब चाळीस मीटर उंच वाढतो. त्याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात. कदंबाला बहर पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो. मलयनिल म्हणजे मलय पर्वतावरून येणार्या वार्यामुळे कदंबावर रोमांच उभे राहतात. ही कविकल्पना कालिदासांची. मेघदूतातील वृक्ष मेघाला हे सांगतो. (त्वत् संपर्कात पुलकितमिव प्रौढ पुष्पक कदम्बै:) ते रोमांच म्हणजे कदंबाची फुले! कदंबाची फुले शेंदरी रंगाची, छोट्या लाडवाच्या आकाराची आणि सुवासिक असतात. फुलांनी बहरलेला वृक्ष डोळ्यांचे पारणे फेडतो. कदंबाचे वैशिष्ट्य हे, की त्याच्या जवळजवळ सर्व फांद्यांना कळ्या एकाच वेळी येतात. त्यावरून ‘कदंबमुकुल न्याय’ तयार झाला. मुकुल म्हणजे कळी. एककालिक उत्पत्तीसाठी कदंबमुकुल न्याय वापरला जातो.