पहिले साहित्य संमेलन - 1878
अखिल भारतीय साहित्य संमेलन हा साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांचा, साहित्यिकांचा आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा असतो. त्यानिमित्ताने लेखक, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते एकत्र येतात आणि व्याख्याने, परिसंवाद, कवीसंमेलन यांनी ते साहित्य संमेलन तीन दिवस विविध अंगांनी फुलत जाते.
साहित्य संमेलनांची सुरुवात 11 मे 1878 रोजी पुण्यात झाली. तेव्हा त्या संमेलनाचे नामाभिधान होते ‘ग्रंथकार संमेलन’ आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पूर्वार्धात मराठी भाषेची अवस्था तेव्हाही चांगली नव्हतीच. मराठी भाषेला पुन्हा नव्याने बहर यावा, ग्रंथकारांना उत्तेजन मिळावे, वाचक-ग्रंथकार यांचा मिलाफ व्हावा; निदान ग्रंथकारांची एकमेकांत नीट ओळख तरी व्हावी म्हणून रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी पुढाकार घेऊन 1878 साली आधी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना केली. दोघांनी ‘ज्ञानप्रकाशा’त जाहीर पत्रक प्रसिद्ध केले आणि वाचकांसमोर मंडळाची कल्पना मांडली. तो दिवस होता, 7 फेब्रुवारी 1878. पहिले ग्रंथकार संमेलन हिराबागेत झाले. साहित्य संमेलनांची पहिली ती सुरुवात होय.