अंगणी माझ्या मनाच्‍या...

प्रतिनिधी 12/04/2014

''किती छान अंगणासारखी मोकळी जागा आहे हो तुमच्या इथं. बच्चे कंपनीही मस्त मातीत खेळण्यात रमलीय. खूप दिवसांनी असं चित्र बघायला मिळतंय.'' आमच्या घरी येणा-या जवळपास प्रत्येकाची ही प्रतिक्रिया असते. अशी चित्राची चौकट रेखाटली गेल्यावर मला त्यात आठवणींचे रंग भरण्याचा मोह आवरता येईना!

भूतकाळाची दारं उघडत अर्धशतकाचा उंबरठा ओलांडल्यावर बैठ्या चाळ संस्कृतीने डोकं वर काढलं. चाळी त्यांच्या पुढ्यात अंगण घेऊन दारं सताड उघडी टाकत नांदत होत्या. अंगण हे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. दिवसभर ते लाड-कौतुकात न्हाऊन निघायचं. तांबडं फुटण्याच्या आधीच अंगण डोळे चोळत जागं व्हायचं ते सडासंमार्जनानं. शुभ्र रांगोळीच्या रेघेनं ते सडे सजवले जायचे आणि न्हाऊमाखू घालून तीट-काजळ लावलेल्या तान्ह्या बाळाप्रमाणे अंगण गोजिरवाणं वाटू लागायचं. मृद् गंधानं लपेटलं जायचं आणि मांगल्यानं सजायचं. सूर्यदेव डोंगरांमधून वर यायचे आणि कोवळ्या सोनसळी रंगानं अंगण चमकू लागायचं. घरात काम सुचू न देणारी बालगोपाळ मंडळी आजी-आजोबांचं बोट धरून किंवा हट्टानं कडेवर बसून अंगणात पाऊल टाकायची. दिवस जसजसा वर येऊ लागायचा, तसतसं अंगण त्या शैशवाला अंगाखांद्यावर खेळवण्यात मग्न होऊन जायचं, चैतन्यानं भरून जायचं. रुसवेफुगवे, रडणं-भांडणं-चिडवाचिडवी-मारामारी अशी छोटी छोटी अस्त्रं बाहेर यायची. 'आवाज की दुनिया' तिथं रंगायची. सूर्य डोक्यावर आला की चटके बसल्यामुळे सगळी पावलं घरात वळायची.