गड-किल्ल्यांचे जलव्यवस्थापन
गडकिल्ल्यांवरील पाण्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य (छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रधान) यांच्या आज्ञापत्रात दिले आहे - “... तसेच गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थल तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी खडक फोडून तली - टाकी पर्जन्यकालापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे ऐसी मजबूत बांधावी.” गड किल्ले यांची उभारणी करताना आधी उदकपाण्याची सोय करूनच किल्ला बांधावा या विचारातून शिवरायांची दूरदृष्टी आढळते.
आज्ञापत्रातील पुढील उद्गारांतून पाण्याचे महत्त्व स्पष्ट होते- “गडावर झराही आहे, जैसे तैसे पाणी पुरते, म्हणून तितक्यावर निश्चिती न मानावी. उद्योग करावा. कि निमित्य की जुझामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होताना आणि पाण्याचा खर्च विशेष लागते, तेव्हा संकट पडते या करिता तैसे जागा जखिरियाचे पाणी म्हणोन दोन - चार तली - टाकी बांधून ठेवून त्यातील वाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे”
लढ्यांच्या वेळी दारूगोळ्यांमुळे जिवंत झरे आटण्याचा संभव असतो, त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक गडावर पाणीसाठा असला पाहिजे. कृत्रिमपणे साठवून ठेवलेल्या त्या पाण्याला ‘जखिरियाचे पाणी’ असे म्हटले जात असे. ते पाणी सडू नये म्हणून काळजी घेतली जात असे.
डॉ. मिलिंद पराडकर यांनी दुर्गबांधणीच्या संदर्भातील विचार पुढीलप्रमाणे मांडले आहेत –