विरगावचा भोवाडा
आमच्या विरगावला भोवाड्याची परंपरा कायम आहे. दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत्र-वैशाख महिन्यात भोवाडा व्हायचा. तरी दरवर्षीचे सातत्य पूर्वीसारखे आता उरलेले नाही. चैत्र-वैशाख म्हणजे उन्हाळा. शेतक-यांना कामे उन्हाळ्यात फारशी नसतात. खेड्यापाड्यांवर उन्हाळ्यातील लोकरंजन म्हणून भोवाड्याची लोकपरंपरा टिकून राहिली असावी. मात्र रंजनाला अनेक माध्यमे उपलब्ध झाल्याने लोकपरंपरेचा तो प्रकार अलिकडे क्षीण होऊ लागला.
भोवाडा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून गावक-यांमध्ये भोवाड्याचा उत्साह दिसून येत असे. चैत्र पुनवेला गावातून भोवाड्याची दांडी मिरवून, पेठ गल्लीतील भोवाड्याच्या नियोजित ठिकाणी पूजाअर्चा करून दांडी रोवली जात असे. सागाच्या लाकडाच्या दांडीच्या वरच्या टोकाला वाळलेल्या *रोयश्याचे गवत बांधून तयार केलेली दांडी वाजतगाजत-नाचवत तिची मिरवणूक गावभर काढली जात असे. त्यामुळे गावात भोवाडा होणार असल्याची वर्दी संपूर्ण गावाला मिळत असे.