अनंत भालेराव - लोकनेता संपादक
‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतराव यांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्प्रचार वापरत, जी उदाहरणे देत, परंपरेने घडवलेले आणि विशिष्ट अर्थ प्राप्त झालेले जे शब्द उपयोगात आणत, तेच सगळे अनंतराव यांच्या शैलीचा भाग झाले होते. अनंतराव यांनी त्यांचे लिखाण ललित व्हावे, रंजक व्हावे अशा उद्देशाने कधी लिहिले नाही. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ हे आशयाबरोबरच भाषेबद्दल आणि शैलीबद्दलसुद्धा खरे आहे. सहज आणि सोपे मराठी लिहिणारे गद्यकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वांना ओळख आहे. बाबासाहेब हैदराबादला एकदा आले असताना, ‘मराठवाडा साहित्य परिषदे’च्या त्या वेळी इसामिया बाजारात असलेल्या कार्यालयात अनौपचारिक भेटीसाठी आले. अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. अनंतराव त्या बैठकीला परिषदेचे कार्यकर्ते आणि ‘मराठवाड्या’चे सहसंपादक या दोन्ही नात्यांनी उपस्थित होते. अनंतराव यांनी ‘आपल्या या चर्चेचा वृत्तांत प्रसिद्ध केला तर चालेल काय’ असा प्रश्न आंबेडकर परत जाण्यास निघाले असता त्यांना विचारला.