राजा रविवर्मा आणि मावळ – ऋणानुबंध (Raja Ravi Varma and Maval – Bond Of Love)

राजा रविवर्मा हे नाव भारतीय चित्रकलेच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या कलेने भारतीय चित्रसंस्कृतीला जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त झाली. त्यांनी त्यांच्या चित्राच्या माध्यमातून देव, देवता आणि स्त्रीसौंदर्य यांना नव्या स्वरूपात सादर केले. राजा रविवर्मा यांचे मावळ प्रांताशी घनिष्ट संबंध होते. ते अनेक वर्षे मावळात वास्तव्यास होते. त्यांनी तेथे राहून अनेक उत्तमोत्तम चित्रे रेखाटली. त्यांचे विषयदेखील प्रदेशाशी जोडलले होते. त्यामधून रविवर्मा यांच्यासारख्या जगद्विख्यात चित्रकाराचा मावळ प्रदेशाशी कसा ऋणानुबंध होता हे स्पष्ट होते. ‘दमयंती आणि हंस’ हे चित्र त्या दृष्टीने उद्बोधक आहे.

राजा रविवर्मा यांचा जन्म 29 एप्रिल 1848 रोजी त्रावणकोर येथील किलीमानूर पॅलेस (केरळ) येथे झाला. ते एका कुलीन कुटुंबातील होते, त्यांना ‘राजा’ ही पदवी देण्यात आली होती. त्यांनी पाश्चिमात्य तंत्राच्या आधारे भारतीय पौराणिक विषय चित्रित करून अभूतपूर्व शृंखला तयार केली. त्यांच्या चित्रकलेतील वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पारंपरिक वेशभूषा व भावभावना यांना युरोपीय ‘रिअॅलिझम’च्या प्रभावी शैलीत रंगवणे हे होय. त्यांनी रेखाटलेली देवतांची चित्रे इतकी प्रासादिक वाटत होती, की लोकांनी त्या चित्रांना देवघरामध्ये स्थान दिले !

त्यांनी मळवली येथे लिथोग्राफ प्रेस काढला होता. रविवर्मा यांनी चित्रे मोठ्या प्रमाणावर छापण्यासाठी लिथोग्राफ प्रेस 1890 च्या दशकात सुरू केला. या प्रेससाठी त्यांना दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील उद्योगपती गोवर्धनदास माखनजी यांनी रविवर्मा यांना पाठबळ दिले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी रविवर्मा यांना पन्नास हजार रुपये दिले. त्या भांडवलावर त्यांनी छापखाना उभारला. मळवली येथील प्रेसमुळे भारतीय देवदेवतांच्या प्रतिमांची निर्मिती प्रथमच प्रिंट स्वरूपात झाली. त्यांतील अनेक देवतांच्या प्रतिमा कॅलेंडर, पोस्टर, देव्हारे, स्टिकर्स यांमध्ये दिसतात आणि त्यांचा उगम मळवलीतील प्रेसमधून झाला आहे ही बाब मावळवासीयांना अभिमानाची वाटते.

रविवर्मा यांनी गिरगावमध्ये ‘रविवर्मा ओलिओग्राफिक आणि क्रोमोलियोग्राफिक प्रिंटिंग वर्कशॉप’ म्हणून भारतातील पहिला ओलिओग्राफी प्रेस 1894 मध्ये स्थापन केला. नंतर त्यांनी तो मोठ्या जागेसाठी घाटकोपर येथे हलवला. त्याच काळात देवी-देवतांची आणि पुराणकथांतील घटनांची चित्रे काढली. त्याबद्दल त्यांच्या विरूद्ध कोर्टात केस दाखल झाली होती. आरोप असा होता, की त्या चित्रांमुळे समाजात अश्लीलता पसरते. त्या केसमध्ये रविवर्मा यांनी, वकील न घेता स्वतःची बाजू स्वतः मांडली. त्यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम यांनाही समाजाने कसा त्रास दिला होता, ते दाखले देऊन सप्रमाण सांगितले. त्यांनी ‘अश्लीलता चित्रात नसते, ती पाहणाऱ्याच्या मनात लपलेली असते’ हे प्रभावीपणे सिद्ध केले. ती केस रविवर्मा यांनी जिंकली. परंतु त्या सर्व प्रकरणामुळे त्यांचे मन मुंबईमध्ये रमेना. त्याच काळात मुंबईत प्लेगची साथही पसरली होती. कामगार त्यांच्या कोकणातील गावांकडे परतत होते. त्यामुळे प्रेससाठी कामगार मिळेनासे झाले. प्रेस तोट्यात जाऊ लागला. तेव्हा त्यांनी लोणावळ्याजवळील मळवली येथे स्थायिक होण्याचा निर्णय 1899 मध्ये घेतला.

राजा रविवर्मा यांनी आजारामुळे आणि व्यवसायातील तोट्यामुळे प्रेस विकून केवळ चित्रकलेवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. प्रेस विक्रीस काढल्यावर त्यांचेच सहकारी श्लेचर पुढे आले. मंगळवार, 29 जानेवारी 1901 रोजी झालेल्या बैठकीत संपूर्ण प्रेस व व्यवसायाची किंमत पंचवीस हजार रुपये ठरली. रविवर्मा प्रेस सोडून मुंबईला 30 जानेवारी 1901 रोजी रवाना झाले.

मळवलीतील प्रेसमुळे भारतीय कलाजीवनात क्रांती घडून आली. लिथोप्रेस जर्मन तंत्रावर आधारित होता. ‘ओलिओ’ हा लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ ‘तेल’ असा आहे. तसा छपाई प्रकार इंग्रज जॉर्ज बँक्सटर याने 1835 मध्ये सुरू केला. त्याचा व्यावसायिक वापर युरोपमध्ये 1860 च्या दशकात सुरू झाला. रविवर्मा यांनी ते तंत्र भारतात आणले व ‘कॅलेंडर आर्ट’चा पाया घातला. ते तंत्र मोठे किचकट होते. त्यात मूळ चित्राची प्रतिकृती लिथोप्रिंटिंगनुसार (दगडावर छपाई) उमटवली जात असे. चित्रातील जितके रंग आणि टोन असतील, तितके वेगवेगळे दगड तयार करावे लागत.

राजा रविवर्मा हे मूळचे केरळचे असले तरी, ते देव-देवतांना महाराष्ट्रीय संस्कृतीमधील वस्त्रप्रावरणांमध्ये चित्ररूपाने रेखाटणारे आद्य चित्रकार मानले जातात. राजा रविवर्मा यांनी त्यांच्या अनेक चित्रांत मावळातील संस्कृतीला चित्रित केले आहे. त्यामध्ये खंडोबा, सरस्वती, दमयंती, मेनका, गंगावतरण, गणपती, शिवाजी महाराज, राणा प्रताप, वीणा वाजवणारी स्त्री, शकुंतला अशा अनेक चित्रांचा समावेश आहे. तुकाराम महाराज यांचे वैकुंठागमन ही त्यांनी काढलेली चित्रेही प्रसिद्ध आहेत.

रविवर्मा यांचे निधन 1906 साली 2 ऑक्टोबर रोजी झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ प्रेस चालला. परंतु बदलत्या तंत्रज्ञानामुळे लिथोप्रेस कायमचा बंद पडला. तरीदेखील त्या प्रेसमध्ये छापलेली देवी-देवतांची चित्रे असंख्यांच्या देवघरात पूजनीय स्थान मिळवून आहेत.

भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी रविवर्मा यांना 1904 मध्ये ‘केसर-ए-हिंद’ हा किताब देऊन सुवर्णपदकाने सन्मानित केले होते.

-Artist-Rajaravi-varma-famous-painting-रविवर्मा यांनी त्या काळातील सर्व घटनांचा उल्लेख त्यांच्या वैयक्तिक डायरीत केला आहे. ती डायरी ‘The Diary of C. Raja Ravi Varma’ या नावाने प्रसिद्ध झाली आहे. डायरीतील नोंदीनुसार, रविवर्मा यांनी कार्ला-भाजे लेण्यांना भेट दिली होती. त्यांनी त्या लेण्यांतील स्तंभांवरून प्रेरित होऊन ‘दमयंती आणि हंस’ चित्रातील मोठा स्तंभ तयार केला असावा. ती नोंद त्यांच्या लहान भावाने, सी. राजा राजा वर्मा यांनी स्वहस्ताक्षरात लिहिल्याने प्रमाणित मानली जाते.

सी राजा राजा वर्मा यांची मूळ नोंद पुढीलप्रमाणे आहे –

सोमवार9 जानेवारी 1899 – मद्रास ललित कला प्रदर्शनासाठी भाऊंनी ‘दमयंती आणि हंस’मधील स्तंभ रंगवले. संध्याकाळी कार्ला येथील नदीचे चित्र काढण्यास सुरुवात केली. जर अधिक पाणी असते, तर ते खूप सुंदर दिसले असते.

‘दमयंती आणि हंस’ हे चित्र ज्या कथेवर आधारित आहे, ती ‘नल-दमयंती’ कथा महाभारतात येते –

एकदा नल राजा वनात विहार करत असताना तलावाजवळ येतो. त्याला तलावातील सुवर्णहंस दिसतो आणि तो त्याला मोहापोटी पकडतो. राजाकडून कैद केले जाईल या भीतीने हंस त्याच्याशी बोलतो. संवादात तो दूरदेशी असलेल्या, अप्सरेहून सुंदर अशा दमयंती या राजकन्येचे वर्णन करतो. “जर तू मला सोडलंस, तर मी तुझा दूत म्हणून तिच्याकडे जाईन,” असे हंस म्हणतो. नल त्याला सोडतो आणि हंस दमयंतीकडे जाऊन नल राजाचे गुणवर्णन करतो, दमयंती ते मनोभावे ऐकते. हाच प्रसंग रविवर्मा यांनी त्यांच्या कुंचल्यातून चित्ररूप केला आहे.

दमयंती त्या स्तुतिपर शब्दांतून तिच्या हृदयाचे प्रतिबिंब पाहत आहे. तो क्षण, तो संवाद, तो प्रसंग, तो निवांत गूढपणा -रविवर्मा यांनी त्यांच्या कुंचल्यातून अमरत्वास नेला आहे.

त्यांनी ते चित्र ‘मद्रास ललित कला प्रदर्शना’साठी पाठवले होते. त्या काळी त्यांनी त्याची किंमत एक हजार रुपये ठेवली होती. पण प्रदर्शनात त्या चित्राची किंमत सातशे रुपये मिळाली आणि फ्रेमसाठी एकशेतीस रुपये मिळाले. ते चित्र ऑइल रंगात, कॅनव्हासवर, 4.5 बाय 3.5 फूट आकाराचे आहे.

– अजित दिगंबर देशपांडे 9850400310 ajitdesh@yahoo.com
—————————————————————————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here