गाथासप्तशती : शतकारंभातील महाराष्ट्राची लोकगाथा !
‘गाथासप्तशती’ म्हणजेच ‘गाथासत्तसई’ हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ! तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्माण झाला. तो महत्त्वाचा प्रमाणग्रंथ आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा घेता येतो. महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषेची जडणघडण, तिचा उगम व विकास, भाषेची प्राचीनता आणि मौलिकता या गोष्टी त्या काव्यग्रंथामधून सिद्ध होतात. ‘अभिजात मराठी भाषा समिती’ने मे 2013 साली तो अहवाल शासनाकडे सुपूर्द केला आहे. ती समिती महाराष्ट्र शासनानेच नियुक्त केली होती. तिनेही मराठी भाषेच्या अस्तित्वाचे लिखित पुरावे दर्शवण्यासाठी त्या ग्रंथाला प्रमाणभूत मानले आहे. ‘नाणेघाट’ (तालुका जुन्नर) येथे इसवी सनपूर्व दोनशेवीसमधील शिलालेख सापडला आहे. अशा मराठी भाषेच्या खुणा सातवाहन राजवटीपर्यंत सापडतात.
सातवाहन राजवट इसवी सनपूर्व 250 ते इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत महाराष्ट्रात होती.
‘गाथासप्तशती’ हा ग्रंथ पहिल्या शतकात ‘हाल सातवाहन’ या राजाने सिद्ध केला. सातवाहन राजांनी त्यांचा राज्यविस्तार थेट उत्तरेपर्यंत नेला. त्यामुळे तो ग्रंथ भारतातील विविध ठिकाणी प्रसारित झाला. संस्कृत कवी बाणभट्ट, राजशेखर यांनी त्यांच्या काव्यग्रंथात ‘गाथासप्तशती’ ग्रंथाचा उल्लेख आणि गौरव केला आहे, तर पाश्चात्य जर्मन पंडित ‘वेबर’ यांनीही त्या ग्रंथाचा परिचय पाश्चात्य जगताला करून दिला आहे. अशी ती ‘लोकगाथा’ जागतिक परिमाण लाभलेली आहे.