बी आर पाटील – कृतार्थ उद्योगानंतर कृषी पर्यटन!
माझे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील दुधगाव. माझा जन्म एका अशिक्षित, रांगड्या शेतकरी कुटुंबात झाला. माझे कुटुंब दुष्काळी कामावर जात असे. मीही त्यांत होतो. मी माझे शिक्षण तशा प्रतिकूल परिस्थितीत सांगली येथे आणि शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले (एम एस्सी - केमिस्ट्री). किर्लोस्करवाडी, मुंबई, पुणे येथे उमेदवारी केली; मी स्वप्न उराशी उद्योग उभारणीचे बाळगले; मी घर एक सायकल आणि नव्वद रुपयांनिशी सोडले, भावाकडे पलूसला काही काळ राहिलो. एमआयडीसी पलूसला त्याच वेळी, 1979 साली सुरू झाली. माझी नोंदणी एमआयडीसीतील पहिला उद्योजक म्हणून आहे. मी प्लास्टिक मोल्डिंगचा उद्योग सुरू केला. त्या ठिकाणी इंडस्ट्रियल मटेरियल, रबर यांची निर्मिती केली जात असे. मी छोटेमोठे कारखाने, साखर कारखाने, दूधडेअरी यांच्याशी त्यातून जोडला गेलो.
मी नाविन्याच्या शोधात सतत असे. मी कारखान्यांच्या गरजा आणि पारंपरिकतेला छेद या दोन्ही गोष्टी कशा साधता येतील, त्यांचा विचार करून अनेक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टस तयार केले. त्यातून कारखान्यांचा फायदा झाला आणि आम्हाला नवनवी गिऱ्हाईके मिळत गेली. माझा भर सतत ‘आर अॅण्ड डी’ यावर राहिलेला आहे. साहजिकच, लोक माझ्याकडे उत्साही, उपक्रमशील माणूस म्हणून पाहतात. मी माझा उद्योग एकाचे चार युनिट करत वाढवला. मात्र, मधील काळात दुष्काळ पडला. त्याचा परिणाम उद्योगावर झाला. मला मर्यादा येऊ लागल्या. म्हणून मी शाश्वत व्यवसायाची नीती अंगीकारली.