तांबूल ऊर्फ विडा
“कळीदाssर , कपूरी पान ............... रंगला विडा” ह्या गाण्याप्रमाणेच गाण्यात उल्लेखलेला ‘विडा’सुद्धा सर्व थरांतल्या लोकांमध्ये प्रिय आहे.
तांबूल म्हणजे कात , चुना, सुपारी इत्यादी पदार्थ घालून केलेला नागवेलीच्या पानाचा विडा. हा त्रयोदशगुणी असावा असा संकेत आहे. ते तेरा गुण म्हणजे तिखटसर, कडवट, उष्ण, मधुर, खारट व तुरट, वातहारक, कृमिनाशक, कफहारक, दुर्गंधी नाहीशी करणारा, मुखाची अशुध्दी नाहीशी करून मुखाला शोभा आणणारा, कामाग्नी उद्दीपीत करणारा... ‘योगरत्नाकर’ ह्या ग्रंथातील एका श्लोकामध्ये हे सर्व वर्णन दिले आहे. त्यात विड्याचे घटक म्हणून पदार्थ दिले आहेत, नागवेलीची पाने, सुपारी, कात , चुना , कापूर , कस्तुरी, लवंग , जायफळ व तंबाखू . तंबाखूमुळे दंतरोग शमन होतो, तसेच कृमी व कंड नाश पावतात.