लोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार!
लोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या ध्येयवेड्या भीमशाहिराने त्यांचे सर्व आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी वेचले; भीमकार्याची महती जगाला सांगितली.
वामनदादा कर्डक यांचा 15 ऑगस्ट 1922 हा जन्मदिन. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी कर्डक, आईचे नाव सईबाई. त्यांचा मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री होती. लहान वामन गुरेढोरे सांभाळायचा. गावचा संबंध तो तितकाच, कारण वयाच्या दहाव्या वर्षी वामनराव आईवडिलांसमवेत मुंबईस आले. गावी जी तुटपुंजी शेती होती त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालणे मुश्किल होते. त्यांचे बालपण गरिबीत आणि खडतर अशा परिस्थितीत गेले. त्यांनी बालपणी खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात आईसोबत कोळशाच्या वखारीत कोळसा वेचण्याचे काम केले. त्या दरम्यानच, त्यांची जेमतेम अक्षरओळख झाली. लिहितावाचता येऊ लागले.