दिलीप दोंदे यांचा सागर पृथ्‍वी प्रदक्षिणेचा पराक्रम


कमांडर दिलीप दोंदेवर आकाश- खाली पाणी. क्षिति़ज पराकोटीचं दूर. नजर पोचेल तिथं पाणीच पाणी. ह्या किंतानावर सतरा मीटर लांब, पाच मीटर रूंद आणि पंचवीस मीटर उंच डोलकाठी, अशी शिडाची होडी. त्यावर एक माणूस. कामात सतत दंग. खाण्या-चघळण्यासाठी मध्येच काहीतरी तोंडात टाकतो. आकाशाकडे बघतो. दूर क्षितिजाकडे नजर टाकायचा प्रयत्न करतो. त्याची होडी समुद्रात भरकटली तर नाही ना! तसं नसावं. कारण त्याच्या हालचालींत आत्मविश्वास दिसतो.

समुद्र शांत आहे. तो कुकरमध्ये तीन भांडी लावतो, हसतो. दोन-तीन दिवसांनी झकास साग्रसंगीत जेवण घेऊया असा बेत मनात आखतो. छान संगीत लावतो. स्वारी आनंदात आहे.

तो मानेमागे हात गुंफून थोडा विसावला. त्याने पायाने ठेका धरला. डोळे मिटले. त्याचा चेहरा असा, की जणू तोच इथला सम्राट!

अरे सांळ! हा निसर्ग भारी खट्याळ आणि खरोखरीच, क्षणार्धात त्याचा मूड बदलला. सोसाट्याचा वारा सुटला. होडी हेलकावू लागली. त्यानं चपळाईनं सगळं आवरलं.

समुद्राचं तांडव सुरू झालं. लाटांची उंची हळुहळू वाढली. होडी क्षणात लाटेवर आरूढ होते. वर जाते आणि क्षणात खोल खाली घसरत जाते. सारं जग नजरेआड होतं. फक्त उंचच्या उंच लाट. भिंतच जणू... पण पुन्हा क्षणार्धात होडी झपकन वर येते.

राजाची गादी गेली! तो पट्टीचा खलाशी झाला.