मी व माझे समाज कार्य

प्रतिनिधी 28/11/2011

सौ. उषा बर्वेमी 1964 साली भाषा संचालनालय विभागात मराठी टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. त्या काळात मराठी टायपिंगला फार मागणी होती. माझी टायपिंगची गती चांगली होती व टायपिंग बिनचूक असायचे. ते लक्षात घेऊन ऑफिसमधील अधिका-यांनी मला मराठी टायपिंगच्या हायस्पीड चँम्पियन काँटेस्टमध्‍ये भाग घेण्‍यास सांगितले. मी त्या स्पर्धेमधे भाग घेतला व प्रथम वर्षीच महाराष्ट्रातून पहिली आले. मला ‘गोल्ड मेडल’ मिळाले. त्‍यानंतर मी घरी टायपिंग मशीन घेऊन पी.एचडी.चे आठ-दहा थिसीस टाईप करून दिले. ऑफिसमधून आल्यानंतर घरकाम आटोपले की मी ते काम करायचे. तेवढाच संसाराला हातभार व्हायचा. ऑफिसमधे प्रमोशन्स मिळत गेली. मुलींची शिक्षणे चालू झाली आणि वयही वाढत गेले, त्यामुळे नुसतीच नोकरी एके नोकरी झाली.