अनुराधा प्रभुदेसाई. मध्यम वयाच्या. चुणचुणीत. स्मार्ट. चेहऱ्यावर व एकंदर देहबोलीत आत्मविश्वास. त्या जे बोलल्या त्यात उत्कटता होती, कारण त्या जे सांगत होत्या, ते त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले होते!
अनुराधा यांच्या आयुष्याला २००४ साली कलाटणी मिळाली. अनुराधा, त्यांचे यजमान गुरुनाथ, त्यांचे मित्र विक्रम व त्यांची पत्नी अपर्णा असे चौघेजण लडाखला सहलीला गेले होते. अनुराधा सांगतात, “आम्ही लडाखला पोचल्यावर जेव्हा आपापले सामान उचलून चालू लागलो, तेव्हा भराभर चालवेना. धाप लागल्यासारखे जाणवू लागले. त्या क्षणीच त्या वातावरणातील वेगळेपणा जाणवला. मला त्या भागाविषयी काहीच माहिती नव्हती. आम्ही तो भाग आजुबाजूला दिसणा-या जवानांशी बोलत, गप्पा मारत असे करत बघत फिरत होतो. कारगिलहून द्रासकडे जात असताना, रस्त्यात पाटी दिसली. ती वाचली आणि मी आतून पूर्णपणे हादरून गेले.”
ती पाटी होती – ‘I only regret that I have but one life to lay down for my country.’
पाटी वाचून, ते चौघेजण तेथे बोलत उभे असताना, त्यांचा आवाज ऐकून सुभेदार मेजर कदम त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, “आज, सात महिन्यांनी मी मराठी ऐकत आहे!”
म्हटले तर किती साधी गोष्ट पण तिचे महत्त्व अनुराधा यांना त्या क्षणी जाणवले.