मी ‘साहित्यकुंज' संघ स्थापन करून त्याअंतर्गत दर सहा महिन्यांनी नवोदितांसाठी ‘काव्य-लेख-कथा’ स्पर्धा आयोजित करत असे. त्यातील निवडक साहित्य घेऊन ‘साहित्यकुंज' अनियतकालिकाचे अर्धवार्षिकांक दर दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रसिद्ध करत असे. माझ्याकडे बरीचशी मुलेमुली त्यांच्या कथा, कविता वा लेख घेऊन येत. मी माझ्याकडे ‘विद्यार्थी साहित्य मेळावा’ दर तीन महिन्यांस आयोजित करत असे. आम्ही मेळाव्यात एकमेकांच्या साहित्यावर चर्चा करायचो.
एकेदिवशी, संध्याकाळी बेल वाजली. मी दरवाजा उघडला. बघतो तर समोर एक ठेंगणाठुसका, काळासावळा मुलगा उभा होता. त्याने मला बघितल्याबरोबर भीतभीतच बोलण्यास सुरुवात केली. ‘सर, मी गौतम गवई. नॅशनल हायस्कूलमध्ये बारावीत (आर्ट्स) शिकतो.’
‘ये.’ मी त्याला आत घेत म्हटले, ‘बस’, कसा काय आलास माझ्याकडे?’
‘सर, मी माझ्या कविता तुम्हाला दाखवण्यास आणल्या आहेत.’ तो म्हणाला.
‘ठीक आहे, दाखव तुझ्या कविता.’ मी खुर्चीवर बसत त्यालाही बाजूच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले.
त्याने त्याची कवितांची वही आनंदाने उघडून पहिली कविता माझ्यासमोर धरली. माझे लक्ष त्याच्या हातांवर त्यावेळी गेले. तो करत असलेल्या कामाचे घट्टे त्याच्या तळहातांवर पडलेले होते. मी तो काहीतरी जड काम करत असावा असा अंदाज केला. मी त्याला विचारले ‘तू काय करतोस? तुझ्या तळहातांवर हे कशाचे घट्टे पडले आहेत?’