दिवाळी अंक मराठी संस्कृतीचे लेणे
दिवाळी अंक हे मराठी संस्कृतीचे गेल्या शतकातील लेणे आहे. ते जपले गेले पाहिजे हे खरे; मात्र सध्या अस्थिर सामाजिक–सांस्कृतिक परिस्थितीत ते कसे घडणार हा खरा प्रश्न आहे असे निरीक्षण दिनकर गांगल यांनी मांडले.
गेल्या वीस-पंचवीस वर्षांत काळ फार झपाट्याने बदलत आहे, नवनवीन माध्यमे लोकांसमोर येत आहेत, त्यामधील एक, पण आधीपासून रुढ असलेले माध्यम म्हणून वाचनाकडे पाहिले पाहिजे. मात्र गेल्या शतकात, १९५० ते १९८० च्या दरम्यान, मुद्रित साहित्याचे माध्यम सर्वात जास्त प्रभावशाली असताना दिवाळी अंक हे मराठी साहित्यामधील सर्वात मोठे आकर्षण असे. ठराविक दिवाळी अंक अगदी थोडक्या संख्येने का होईना सर्वदूर महाराष्ट्राभर पोचत. पारोळ्यासारख्या खेड्यातदेखील ‘सत्यकथे’चा एकादा वाचक असे. तो भेटला, की अपार आनंद होई. ते नेटवर्किंगच होते. पण ती एकात्म मंडळी होती.
साहित्याचा खप वाढला, परंतु वाचन मात्र कमी झाले अशी विसंगती सध्या अनुभवास येते असे सांगून त्यांनी दिवाळी अंकांच्या बहराचे दिवस आळवले. कित्येक लेखक दिवाळीसाठी म्हणून लेखनाच्या भट्ट्या लावत आणि तो कारखाना गणपतीच्या महिन्यापासून सुरू होई. ‘निवडक अबकडई’ पुस्तकात चंद्रकांत खोतने या ‘खाज असलेल्या’ संपादकांचे वर्णन केले आहे. पण त्यामधून माधव मोहोळकरांसारखे ‘संकोची’ लेखक लिहिते झाले - पुढे आले.