गावागावात शिक्षणप्रसार झाला तसे समाजसुधारणेचे वातावरण सर्वत्र तयार होऊ लागले; छोट्यामोठ्या प्रसंगातही मोठ्या सुधारणांची बीजे दिसतात. तशा कोल्हापूर परिसराच्या खेड्यांतील काही नोंदी –
गणापूर येथील कार्यकर्ते संजय सुळगावे यांनी एका वर्षी मला वटपौर्णिमेच्या समारंभासाठी बोलावले. मला शंका आली. पुरुषांनी महिलांना हळदीकुंकू देण्याची प्रथा सुरू झाली की काय? मी भीत भीतच शिंगणापूर गाठले. ते गाव कोल्हापूरपासून चार किलोमीटरवर आहे.
समारंभाच्या ठिकाणी तीन-चार फूट उंचीचे स्टेज होते. माईकवरून 'हॅलो-हॅलो' म्हणत सूचना दिल्या जात होत्या. महिला नटूनथटून समारंभस्थळाकडे येत होत्या. त्यांची मुले त्यांच्या मागून पाय ओढत चालत होती. मोठ्या मुलांनी ग्राऊंडवर पळापळीचा खेळ सुरू केला होता.
समारंभ सुरू झाला. पाच महिलांना माईकवरून नावे पुकारून स्टेजवर बोलावण्यात आले. पाचही महिला विधवा होत्या. त्या पाच वेगवेगळ्या जातींच्या होत्या.
ग्राऊंडच्या कडेने पाच खड्डे काढण्यात आले होते. आम्हाला तिकडे जाण्याची सूचना मिळाली. त्या महिलांच्या हस्ते वृक्षारोपण पाच ठिकाणी करण्यात आले. आम्ही त्या महिलांचे सत्कार तशा अभिनव पद्धतीने, वटपौर्णिमा साजरी झाल्यानंतर केले.
शिंगणापूरच्या कार्यकर्त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याच वेळी विधवेलाही मंगलप्रसंगी मान देण्याचा व सर्व जाती समान आहेत असा समतेचा संदेशही दिला गेला.