तबला वादक रुपक पवार
रूपक पवार ह्यांना ‘तबला रूपक’ ह्या नावाने कोणी हाक जरी मारली तरी चालेल असे तेच हसत हसत पण नम्रपणे सांगतात. इतके ते तबला या वाद्याशी एकरूप झालेले आहेत!
पवारांचे मूळ गाव मापरवाडी. ते मूळ घराणे वाई तालुक्यातील (जिल्हा सातारा). मात्र रूपक यांचा जन्म डोंबिवलीत झाला. ते तेथेच लहानाचे मोठे झाले व तेथूनच त्यांची तबला क्षेत्रातील सुरुवातही झाली. त्यांचे शिशू वर्ग ते दहावीपर्यंतचे शिक्षण डोंबिवली पूर्व येथील आदर्श विद्यामंदिर शाळेत झाले. त्यांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना ताबडतोब चांगला जॉब मिळाला, पण त्यांनी फक्त एक महिन्यात ‘जॉब’ सोडला.
तबलावादन हे त्यांना वारसा हक्काने मिळालेले संचित आहे. त्यांचे तबला गुरू त्यांचे वडील पंडित सदाशिव पवार. तबलावादनाची आवड वा छंद या व्यतिरिक्त कोणतीही व्यावसायिक संधी नसताना त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय निव्वळ आत्मिक शक्तीच्या जोरावर घेतला. त्यानंतर त्यांचे संधी मिळेल तेव्हा आणि मिळेल तोपर्यंत फक्त तबलावादन हे सत्र सुरू झाले.
त्यांना नोकरी सोडल्याबरोबर काही दिवसांतच परदेशगमनाची (फ्रान्स) सुवर्णसंधी चालून आली. ते तेथूनच पुढे ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वीत्झर्लंड असे प्रदेश तबलावादनाच्या माध्यमातून पादाक्रांत करत गेले. त्यानंतर त्यांना भारतभर तबलावादनाची संधी मिळत राहिलेली आहे.