महाराष्ट्राच्या बेचाळीस भाषांचे लोकसर्वेक्षण
गणेश देवी यांच्या ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ ‘महाराष्ट्र’ या खंडात जवळपास बेचाळीस भाषा सर्वेक्षक व चर्चक यांचे प्रयत्न समाविष्ट आहेत. त्यांचे विभाग संपादक अरुण जाखडे यांनी महाराष्ट्रासंदर्भात भूमिका आणि पद्धत स्पष्ट केल्या आहेत. ते लिहितात, ‘महाराष्ट्राची भाषिक संस्कृती बहुआयामी आणि बहुविध आहे. ती दुर्मीळ होत आहे... या निमित्ताने ह्या प्राचीन भाषिक संस्कृतीचे, तिच्या परंपरेचे स्मरण झाले, नोंद करता आली.’ त्यांनी एकूण महाराष्ट्र भाषांचा हा दस्तऐवज आहे असे नोंदवले आहे. गणेश देवी यांनी या प्रकल्पाच्या निमित्ताने भारतीय भाषांचा दस्तऐवज वज्रलिपित केला आहे.
‘महाराष्ट्र’ या खंडात चार विभाग आहेत. पहिल्या विभागात (अ) मध्ये - मराठी आणि मराठीची रूपे, अन्य रूपे आणि सामाजिक उपरूपे यांसह मराठी प्रकाशने आणि अभिजात मराठीची वाटचाल समाविष्ट असून; अहिराणी, आगरी, कोहली, खानदेशी, चंदगडी, झाडी, तावडी, पोवारी, मालवणी, वऱ्हाडी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्वरी अशी मराठीची रूपे परिचित होतात. (ब) मध्ये - सिंधी आणि उर्दू या मराठीतर भाषांची रूपे पाहता येतात.