ज्ञानभाषा मराठीकडे
संत ज्ञानदेवांनी मराठी भाषेच्या संक्रमणाला प्रारंभ केला. संस्कृत ही भारताची ज्ञानभाषा म्हणून ओळखली जायची. त्यामुळे सर्व ज्ञान, तत्त्वज्ञान त्या भाषेत ग्रंथबद्ध होते. ती कोंडी फोडण्यासाठी ज्ञानदेवांनी ते ज्ञान लोकभाषेत प्रवाहित केले आणि ‘मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू’ केला. परंतु त्यानंतर ललित साहित्य वगळता इतर भाषांतील ज्ञान मराठी भाषेत आणून त्या भाषेला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला नाही. तो मान इंग्रजी भाषेने मिळवला. सर्व ज्ञानशाखांतील अद्ययावत ज्ञान त्या भाषेत बंदिस्त आहे. त्यामुळे ती भाषा अवगत करणे अपरिहार्य ठरते. ते ज्ञान मराठी भाषेत खुले केल्याशिवाय मराठी लोकांची भाषिक गुलामी संपुष्टात येणार नाही. ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात जसे कार्य केले तसे भाषिक कार्य सद्यकाळात करावे लागणार आहे. सर्वसामान्य माणसे त्यांच्या दैनंदिन लोकभाषेतूनच व्यक्त होत असतात. वारकरी पंथाने तसा अवसर त्यांना दिला. तसा प्रयोग सर्व ज्ञानशाखांत ‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ होताना दिसतो का? पारमार्थिक क्षेत्रात ते कार्य संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबांनी केले.