यज्ञसंस्कार


_YadnyaSaunskar_1.jpgयज्ञ हा संस्कार भारतात वेदकाळापासून अस्तित्वात आहे. यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत उष्णता व ध्वनी यांच्या ऊर्जेचा उपयोग सर्वसामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा ह्यासाठी निर्माण झाल्याचे जाणवते.

सर्वसामान्य जनतेने यज्ञ अंगिकारावे म्हणून तो ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो, त्यासाठी ईश्वराची मंत्राद्वारे स्तुती करावी लागते अशी मांडणी करण्यात आली. निसर्गाने मानवाला जे जे उपयुक्त दिले ते अग्नीद्वारे ईश्वराला अर्पण करणे ही त्यामागील धारणा आहे. त्याकरता अनेक उपक्रम शोधले गेले आहेत. उदाहरणार्थ, जन्मानंतर नक्षत्रशांत व आयुष्य होम हे होम करण्यास सांगितले गेले आहेत. त्यानंतर धन्वंत्री होम, मृत्युंजय होम हेही चांगल्या प्रकृतीसाठी, अल्पायुषी होऊ नये ह्यासाठी केले जातात. मुंजी-लग्नातील लज्जा होम, गर्भदान संस्कार आणि नित्य आढळणारे वास्तुशांत, साठीशांत, सहस्र चंद्रदर्शन हे विधी ही यज्ञसंकल्पनेची रूपे होत. दुर्गा व चंडी होम, आत्मविश्वास वाढवण्यासाठी गायत्री होम, सकारात्मकता स्वभावात येण्यासाठी विद्याहोम इत्यादी सांगितले गेलेले आहेत. पण ते यज्ञ छोटे व प्रसंगानुरूप होत.

अग्निहोत्र - वैज्ञानिक दृष्टिकोन


_Agnihotra_VaidnyanikDrushtikon_2.jpgअग्निहोत्र ह्या प्राचीन यज्ञविधीने आधुनिक काळात काही जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. यज्ञाचे सर्व उद्देश अग्निहोत्रात सर्वसामान्य माणसाला लाभू शकतात. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याचे काम पुण्याचे डॉक्टर प्रमोद मोघे गेली पाच-सहा वर्षें करत आहेत. त्यांनी अग्निहोत्राचे परिणाम तपासून बघितले.

अग्निहोत्र हा वैदिक संस्कृतीतील रोज केला जाणारा विधी आहे. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी दहा मिनिटांत होऊ शकतो. अग्निहोत्रास सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळा उपयुक्त आहेत. अग्निहोत्रासाठी पुढील गोष्टी लागतात - 1. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र, 2. गायीच्या दुधाचे शुद्ध तूप - दोन चमचे, 3. गायीच्या शेणाच्या गोवऱ्या – चार तुकडे, 4. हातसडीचे आख्खे तांदूळ अंदाजे – चार ग्रॅम.

तांब्याच्या पात्रात गायीच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून, त्या पेटवून त्यामध्ये गायीच्या तुपात भिजवलेले तांदूळदाणे सूर्योदयाच्या वेळी पुढील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे.

मंत्र असे -

सूर्याय स्वाहा: । सूर्याय इदम् न मम ।।
प्रजापतये स्वाहा: । प्रजापतये इदम् न मम ।।

सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करणे असल्यास पुढील मंत्र म्हणावे -
अग्नेय स्वाहा: । अग्नेय इदम् न मम ।।
प्रजापतये स्वाहा: । प्रजापतये इदम् न मम ।।

हे सर्व आटोपल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसावे.