विष्णूचे उपासक - वैष्णव संप्रदाय (Vishnu Worshiper - Vaishnava sect)
विष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’ ग्रंथात आढळतो. तो वैदिक देव नव्हे. विष्णू या देवाचा उल्लेख ऋग्वेदात फक्त पाच सूक्तांत आहे. त्यावरून तो आर्य देवताकुलात प्रथम प्रतीचा देव नसावा. एकाच देवतेचा उल्लेख नारायण व विष्णू या दोन नावांनी महाभारत व पुराणे यांत केला गेला आहे. त्या देवाच्या उपासकांना भागवत, पांचरात्र (सृष्टीची उत्पत्ती पुरूष, प्रकृती, स्वभाव, कर्म आणि देव या पाच विषयांनी झाली आहे असे मानणारा पंथ), एकांतिक, सात्त्वत (विष्णू) आणि वैष्णव अशी नावे दिलेली आढळतात. वैष्णव असा उल्लेख महाभारताच्या बऱ्याच नंतरच्या भागात क्वचित आहे. त्यावरून वैष्णव पंथाला वैष्णव हे सर्वसाधारण नाव बऱ्याच नंतर, म्हणजे विष्णू या देवाला महत्त्व मिळाल्यानंतर प्राप्त झाले असावे. मृणाल दासगुप्ता यांच्या मते, भागवत हे नाव मूळ वृष्णिकुलाचे दैवत वासुदेव-कृष्ण यांच्या उपासकांनी धारण केले. ते नारायण-विष्णूच्या उपासकांपेक्षा वेगळे होते. श्रीमती जयस्वाल यांच्या मते, भागवत हा शब्द ‘भज’ (= वाटणी करणे) या धातूवरून आला आहे. ‘भग’ म्हणजे संपत्ती, वाटा अशा अर्थाचा शब्द ऋग्वेदात आहे. भारतीय संस्कृती कृषिप्रधान आहे. तीमध्ये धान्य (मुख्यत्वे भात) आपापसांत वाटून घेऊन समूहाने राहणाऱ्या समाजाला भागवत हे नाव मिळाले असावे.