माधव बर्वे – विषयवार वृक्षबागांचा अधिकारी माणूस
नाशिक जिल्ह्याच्या निफाड, कोठुरे हा भाग पाण्याने संपन्न आहे. गव्हाची, ऊसाची किंवा द्राक्षाची शेते सर्वत्र पाहून महाराष्ट्रातील दुष्काळाचे विचार मनातून निघून जातात.
निफाड तालुक्यात कोठुरे या गावी माधवराव बर्वे हे ब्याऐंशी वर्षांचे (2018 साली) तरुण, उत्साही, संशोधक वृत्तीचे शेतकरी राहतात. ते गेल्या पंचावन्न वर्षांपासून शेतीचे जणू व्रत परिपालन करत आहेत. ते सायकलीवरून शेतात जातात. बर्वे हे आध्यात्मिक वृत्तीचे, साधी राहणी असलेले, पण ज्ञानी, अनुभवसंपन्न असे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी रसायनशास्त्रात पदवी मिळवली, मात्र चांगली नोकरी मिळत असूनही त्यांनी घरच्या शेतीत काम करण्याचे ठरवले. ते शेतीत नवनवे प्रयोग करत आले आहेत. ते सेंद्रीय शेतीविषयी परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात. ते मुख्यत्वेकरून वृक्षलागवडीच्या निमित्ताने निरनिराळ्या राज्यांत भटकंती करतात. त्यांचे ते काम त्यांना महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून देते.