कराडचा विज्ञानवेडा ‘पुजारी’
यशवंतराव चव्हाण यांचा कराडमधील ‘विरंगुळा’ बंगला हे तीर्थस्थान बनून गेले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना व त्याचा विकास यांसाठी केलेले कार्य स्मरून लोक ‘विरंगुळा’ दर्शनास येतात. ‘विरंगुळा’ला भेट देण्यासाठी येणाऱ्यांची पावले आपसूकच ‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’कडे वळतात. चव्हाण यांची ‘दृष्टी’च जणू त्या केंद्रातून सद्यकाळात व्यक्त होत आहे!
आता, प्रवास उलट सुरू झाला आहे! केवळ महाराष्ट्रातून नव्हे, तर देशभरातून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विज्ञानवेडे संशोधक केंद्रात येऊ लागले आहेत आणि मग त्यांची पावले चव्हाण यांच्या ‘विरंगुळा’ बंगल्याकडे वळतात.
संजय पुजारी यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी केवळ विज्ञान आणि विज्ञानच दिसते! संजय यांना लहानपणी विज्ञानाचे वेड लागले आणि ते वाढतच गेले आहे.