छंदोमयी प्रसाद देशपांडे!
मी लेखक-कवी, गायक, संगीतकार, दिग्दर्शक, क्रीडापटू, समाजसेवक, कलाकार अशा मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या स्वाक्षरी गेल्या वीस वर्षांपासून जमवत आहे. मला वाचनाची आवड. त्यामुळे मी लेखकाला त्याच्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया पाठवत असे. काही लेखकांची उलट पत्रे येत. त्यातून माझ्या छंदाचा प्रवास सुरू झाला. मी माझ्या स्वतःच्या लेखनासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांचे विचार, मनोगते ऐकण्यासाठी व्याख्यानादी कार्यक्रमांना, नाटकांना जात असे. तेथेही त्यांच्या स्वाक्षरी जमवत गेलो.
मी त्या विविध व्यक्तींच्या जीवनाची -कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी नेटवर शोध घेत असे. मी त्या माहितीच्या आधारे त्या त्या व्यक्तींची संक्षिप्त जीवनचरित्रेदेखील संग्रहित करण्यास सुरूवात केली. मी त्या टिपणांसोबत त्या व्यक्तीचा फोटो आणि त्या व्यक्तीची स्वाक्षरी जोडली. अशा त-हेने माझ्या संग्रहास माहितीचा आधार लाभला. मी त्या संग्रहास 'जीवन संग्रहासह स्वाक्षरी' असे नाव दिले.
आमच्या नाशिकचे आणि साऱ्या महाराष्ट्राचे साहित्यदैवत तात्यासाहेब शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या स्मारकामध्ये साहित्यिक मेजवानीचे कार्यक्रम नेहमीच सुरू असतात. मी त्या सर्वाना तेथेही भेटून स्वाक्षरी जमवत गेलो. ते माझ्या संग्रहाचे वैशिष्ट्य ठरले.