यवतमाळचे सर्पमित्र श्याम जोशी
श्याम गोविंदराव जोशी म्हणजे यवतमाळमधील विशेष व्यक्ती आहेत. ते वयाच्या चौदाव्या वर्षांपासून सेहेचाळीस वर्षें सर्पांच्या राज्यात रमून गेले आहेत. जिल्ह्यात कोठेही साप निघाला तर ते बोलावल्या जागी जाऊन पोचतात. ते किंवा त्यांचे सहकारी यांच्या बरोबर सापाला पकडण्याची सगळी साधने हमखास असतात. ते विषारी किंवा बिनविषारी सापाला पकडून त्याला जंगलात सोडण्याचे काम करतात. यवतमाळ जिल्ह्यातील जंगलात नाना प्रकारचे साप आहेत. श्याम यांच्या या छंदाची सुरूवात अशी झाली, की श्याम शाळेत असताना यवतमाळात रामभाऊ देशपांडे नावाचे गृहस्थ साप मारण्यात प्रवीण होते. ते श्यामच्या घराजवळच्या झाडीत साप मारण्यास आले होते. देशपांडे साप मारत असताना श्यामने त्यांचे धोतर ओढले. तो म्हणाला, ‘सापाला मारू नका.’ तो त्याचा सहजोद्गार होता. तेव्हा रामभाऊंनी त्याला बाजूला ढकलले. शाळकरी श्याम पडला. रामभाऊंनी सापाला मारल्यावर त्याचा दहनविधी केला गेला. एका संस्थेने सगळ्यांना चहापाणी दिले. तेव्हा श्यामने ठरवले, की सापाला मारायचे नाही; तसेच, यवतमाळात एकही मृत साप दिसता कामा नये.