महागाव - रांगोळी कलेचे गाव
कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे! तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की खूप जुना इतिहास वाटावा! ‘रांगोळी’ ही कला प्रथा म्हणून त्या गावामध्ये जपली जाते. रांगोळी कलेचा पाया महागाव गावामध्ये 1980 साली घातला गेला. व्ही.बी. पाटील, आनंद सुतार, महंमद बागवान या कलावंतांची ती किमया. व्ही.बी. पाटील यांनी गावातील ‘बंड्या’ या व्यक्तीची रांगोळी साकारली, तर सुतार यांनी ‘सरस्वती देवी’ आणि बागवान यांनी ‘लँडस्केप’! पण ते त्यात विशेषज्ञ झाले आणि रांगोळी कलेच्या नव्या माध्यमाची महागावाला ओळख झाली. ही गोष्ट फक्त चाळीस वर्षांपूर्वीची - समकालात गोष्ट! आता आनंद सुतार हे निवृत्त शिक्षक आहेत. महंमद बागवान यांचा फोटोग्राफीचा स्टुडिओ आहे. व्ही. बी. पाटील हे शिक्षक आहेत.
गडहिंग्लजला लहान लहान अशा बारा-तेरा गल्ल्या होत्या – कुंभार गल्ली, मराठा गल्ली वगैरे. त्या सर्व गल्ल्या एकत्र होऊन मोठे गाव वसले. त्या गावाला ‘महागाव’ हे नाव पडले. गावाची लोकसंख्या वीस हजारांपर्यंत आहे.