राजुरी गावचे रोजचे उत्पन्न, वीस लाख ! (Rajuri)
राजुरी हे कोरडवाहू गाव आहे. ते पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात पूर्वेला आहे. तेथे वार्षिक चारशेपन्नास ते पाचशे मिलिमीटर पाऊस पडतो. शेती हा तेथील प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहे. तेथे खरीप आणि थोडासा रब्बी अशी शेतीपद्धत आहे. राजुरीचे क्षेत्रफळ दोन हजार दोनशे एकसष्ट हेक्टर आणि तेथील लोकसंख्या नऊ हजार चारशेअकरा आहे. कुटुंबाचा गुजारा शेतीतील अपुर्याट उत्पन्नावर होणे शक्यच नाही. गावातील प्रत्येक कुटुंबात मुंबई-पुणे शहरांकडे रोजगार कमावणारे सदस्य आहेत.
गंमत अशी, की गावात राजकीय प्रमुख पक्षांचे अस्तित्व आहे, तरी लोक मोठ्या प्रमाणावर कोणतीही राजकीय निष्ठा कठोर न ठेवता फक्त विकासाला मतदान करतात! सर्व पक्ष गावाच्या विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊन एक भूमिका घेतात. गावाची वैचारिक पार्श्वभूमी अशी, की ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा झाला तरी गावातील सर्व कुळांनी त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर मूळ जमीनमालकाला न्याय्य रक्कम देऊन केल्या; ही फार मोठी गोष्ट आहे!