विलास व स्वाती पोळ – भारताचा अभिमान
प्राध्यापक (डॉ.) विलास गणपत पोळ यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी भारतीयांचा झेंडा जागतिक स्तरावर एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने फडकावला! प्राध्यापक पोळ यांनी आवर्तसारणीमधील (ऊर्फ पिरिऑडिक टेबल) सर्व मूलभूत रासायनिक घटकांची मांडणी जागतिक पातळीवर विक्रमी वेळेत केली.
विलास पोळ पर्ड्यू विद्यापीठ (इंडियाना- अमेरिका) येथे केमिकल इंजिनीयरिंग विभागात प्राध्यापकी करतात. शिवाय, ते भारतात इंदूरच्या आयआयटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम करतात आणि आयआयटीच्या पदवीच्या व पदव्युत्तर काही विद्यार्थ्यांना व संशोधकांना मार्गदर्शन करतात. त्यांची पत्नी डॉ. स्वाती पोळ यादेखील पर्ड्यू विद्यापीठात शास्त्रज्ञ या पदावर काम करत असून, त्यांनी गेली चार-पाच वर्षें गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची पुस्तके त्यांच्या मुलांना आणि पती विलास यांना भेट दिली. त्या उपक्रमातून विलास यांना आणि त्या दांपत्याच्या मुलांनाही ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या कथा वाचण्याची प्रेरणा मिळाली. विलास यांनी त्यांच्या मुलांबरोबर ती पुस्तके वाचली आणि रसायनशास्त्र व केमिकल इंजिनीयरिंग क्षेत्रात नवीन ‘करिष्मा’ करण्याचा निर्णय घेतला, उद्देश हा, की त्यांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना आणि जागतिक समुदायाला प्रेरणा मिळावी!