झाशीची राणी लक्ष्मीबाई
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. त्या एकोणीसाव्या शतकात ब्रिटीशांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी'विरोधात झालेल्या 1857 च्या स्वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या. त्यांनी त्या उठावात गाजवलेल्या शौर्यामुळे त्या क्रातिकारकांचे स्फूर्तीस्थान होऊन गेल्या.
लक्ष्मीबाई या मूळच्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या. धावडशी हे त्यांचे माहेर. त्यांचे माहेरचे नाव मणिकर्णिका तांबे असे होते. त्यांचा जन्म मोरोपंत तांबे आणि भगिरथीबाई तांबे या दांपत्याच्या पोटी १९ नोव्हेंबर १८३५ रोजी झाला. लक्ष्मीबाईंचे वडिल मोरोपंत तांबे दुसर्या बाजीराव पेशव्यांचे बंधु चिमाजी अप्पा यांचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत. लक्ष्मीबाई तीन-चार वर्षांच्या असताना त्यांच्यावर मातृवियोगाचे दुःख कोसळले. त्या पुढे ब्रह्मावर्त येथे दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या आश्रयास गेल्या.
नानासाहेब पेशवे बंधु रावसाहेब यांच्यासोबत ब्रह्मावर्ता येथील वाड्यात तलवार, दांडपट्टा व बंदुक चालवणे आणि घोडदौड असे शिक्षण घेत असत. लक्ष्मीबाईंनी त्यांच्यासोबत युद्धकला आत्मसात केली. सोबत मोडी अक्षर ओळख आणि लेखन-वाचन अशी विद्या अवगत केली. त्या सात वर्षांच्या असताना त्यांचा विवाह झाशी संस्थानचे अधिपति गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी १८४२ साली थाटामाटात पार पडला. त्यांचे नाव विवाहानंतर 'लक्ष्मीबाई' असे ठेवण्यात आले. कालांतराने त्या झाशीची राणी म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या.